विशेष मुलांसाठी लोणावळ्यात “संवाद शाळा” चालविणाऱ्या सौ. परमेश्वरी कौस्तुभ दामले
Happy Women’s Day to strong, intelligent, talented and simply wonderful women!
एक मूल सांभाळणे किती अवघड असते याची कल्पना एक माताच जाणो. पण, अनेक विशेष मुलांची आई होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कार्यरत असलेल्या एका ‘मुलखावेगळ्या ती’ ची कहाणी …
लोणावळा म्हटले की आपल्या नजरेसमोर एक रमणीय, मनमोहक दृश्य तरळून जाते. पण याच निसर्गरम्य लोणावळ्याच्या परिसरात दिव्यांग मुले मोठ्या प्रमाणावर आहेत याची आपल्याला कल्पना देखील नसते. विविध प्रकारची दिव्यांगता असणाऱ्या या मुलांच्या मर्यादा, गरजा आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांना शिक्षण देण्याची कोणतीच व्यवस्था या भागात नव्हती. ५० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शाळेपर्यंत ही मुले पोहोचण्याची शक्यता देखील नव्हती. विशेष मुलांच्या शिक्षणाची ही निकड ओळखून रोटरी क्लबचे अध्यक्ष कौस्तुभ दामले यांनी लोणावळ्यात जुलै १९९५ मध्ये ‘संवाद शाळा’ (samvad school lonavla) स्थापन केली.
दिव्यांग मुलांचा शोध घेणे, त्यांना योग्य असे प्रशिक्षण देणे आणि समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना स्वावलंबी बनवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ‘संवाद शाळा’ काम करू लागली. दोन मुलांच्या शाळेपासून आज ४०० विशेष मुलांना शिक्षण-प्रशिक्षण देण्यापर्यंत या शाळेचा विस्तार झाला आहे. ५ वर्षे रोटरी क्लबच्या माध्यमातून ही शाळा चालवली जात होती. त्यानंतर ‘संवाद’ नावाचा स्वतंत्र ट्रस्ट निर्माण करण्यात आला. कौस्तुभ दामले यांना त्यांच्या अर्धांगिनी सौ. परमेश्वरी दामले यांनी घर, मुले, संसार सांभाळत आणि आपला व्यवसाय बाजूला ठेवून ‘संवाद शाळे’च्या कार्यात पूर्णवेळ मदत करायला सुरवात केली.
आपलं मुल ‘विशेष’( special child) आहे हे मान्य करणे हे एक पालक म्हणून सोप्पे नसते! आई-वडील जोपर्यंत ते वास्तव स्वीकारत नाहीत तोपर्यंत अशा मुलांच्या शिक्षणाची गरज पूर्ण होवू शकत नाही. त्यामुळे आधी पालकांचे समुपदेशन करून त्यांना या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त करण्याचे मोठे आव्हान ‘संवाद शाळा’ सुरु केल्यावर दामले दाम्पत्यासमोर होते. मुलाला शाळेत पाठवण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे समजण्यासाठी पालकांनी किमान तीन महिने तरी आपल्या मुलाला शाळेत पाठवणे आवश्यक असते. दामले दाम्पत्याने हे आव्हान स्वीकारले. विशेष मुलांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून या मुलांना शाळेत घेऊन येण्यात दामले दाम्पत्याला यश आले.
सुरुवातीला कर्णबधिर मुलांसाठी शाळा भरू लागली. त्यानंतर मतिमंद, सेरेब्रल पाल्सी आणि इतर वेगवेगळया प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेली विशेष मुलेही या शाळेत येऊ लागली. शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या विशेष मुलांसाठी आवश्यक असलेले विशेष शिक्षण-प्रशिक्षण घेतलेले आहेत. एका शिक्षिकेने तर दोन विषयात बी. एड. केले आहे जी, कर्णबधिर मुलांना तसेच मानसिक संतुलन योग्य नसणाऱ्या मुलांना देखील शिकवू शकते. विशेष मुलांच्या समस्या वेगळ्या असतात म्हणून त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो, परीक्षा वेगळ्या पद्धतीने घ्याव्या लागतात. आपण अभ्यासापासून वंचित राहतोय असे एखाद्या मुलाला वाटू नये यासाठी काही वेळा वेगळा लेखनिक ठेवून त्याची परीक्षा घ्यावी लागते. शाळेतल्या मुलांना स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी देण्याची सोय शाळेतच आहे. तसेच समुपदेशन केंद्र देखील आहे.
गेल्या २७ वर्षात सुमारे २५० मुलांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यापैकी १६ मुले दहावी उत्तीर्ण झाली आहेत. यावर्षी ५ मुले इयत्ता १२ वी ची परीक्षा देत आहेत. इ. १२ वी चा अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण करण्याची विशेष सवलत शासनाने त्यांना दिली आहे.
विशेष मुलांना १६ वर्षांची होईपर्यंत त्यांना जमेल तेवढे शिक्षण द्यायचे आणि त्यानंतर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. ही मुले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील इतरांसोबत राहू शकतील त्यासाठी ‘संवाद शाळा’ प्रयत्नशील आहे.
पूर्णपणे विनाअनुदानित असलेली ‘संवाद शाळा’ समाजाच्या सहकार्यावर सक्षमपणे कार्यरत आहे. ‘संवाद शाळे’च्या यशासाठी पालकांचा पूर्ण विश्वास आणि मदत, शिक्षक आणि शिक्षकेतर सहकार्यांचे परिश्रम मोलाचे आहेत. यासाठी परमेश्वरीताईं कृतज्ञ आहेत.
स्त्री म्हणजे वात्सल्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लेखिका – शिल्पा निंबाळकर