शास्त्रज्ञ ८
नाणावलेला गणितज्ज्ञ प्रा. हरीष चंद्र
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
भूमितीपासून( geometry) नंबर थिअरीपर्यंत अनेक ठिकाणी उपयुक्तता असलेला बिजगणितातील( algebra) समस्यापूर्तीतून निघालेला नवा सिद्धांत देणारे, मुळचे भौतिकशास्त्रज्ञ असलेले पण नंतर गणितज्ज्ञ (mathematician) म्हणून नावाला आलेले प्रा. हरीष चंद्र यांच्या या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना आजही जगभर ओळखले जाते.
प्रा. हरीष चंद्र (harish chandra) यांनी सुरुवातीला मूलकणांच्या सिद्धांतावर काम करायला सुरुवात केली होती. मात्र, १९४९ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्राची कास सोडली आणि ते गणिताकडे वळले. अनंत-आयामी प्रतिनिधित्व हा त्यांच्या रुचीचा विषय बनला आणि त्यांनी त्यातून भूमितीपासून नंबर थिअरीपर्यंत अनेक ठिकाणी ज्याचा उपयोग होऊ शकेल असा नवा सिद्धांत प्रसवला.
हरीष चंद्र यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९२३ रोजी उत्तर प्रदेशात कानपूर येथे सत्यवती सेठ आणि चंद्र किशोर या दाम्पत्याच्या पोटी झाला. चंद्र किशोर स्थापत्य अभियंता होते. कानपूरमधील प्राथमिक शिक्षणानंतर हरीष चंद्र यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९४३ मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. नंतर ते बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षणासाठी गेले. तिथे होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील विविध समस्यांवर स्नातकोत्तर संशोधन सहायक म्हणून त्यांनी काम केले.
बंगळुरूमध्ये असतानाच चंद्र यांनी विविध शास्त्रीय नियतकालिकांत शोधनिबंध लिहिण्यास सुरुवातही केली. त्यांनी काही शोधनिबंध भाभांसोबतही लिहिले ज्यांचा थेट संबंध ब्रिटिश सैद्धांतिक भौतकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक यांच्या काही निरीक्षणांशी होता. त्यामुळे मग भाभा आणि चंद्र यांचे अलाहाबादमधील गुरू के एस कृष्णन यांनी त्यांना केंब्रिजमध्ये जाऊन डिरॅक यांच्यासोबत काम करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार केंब्रिजला जाऊन डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली हरीष चंद्र यांनी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.
केंब्रिजमधील वास्तव्याच्या काळातच ते भौतिकशास्त्रापासून दूर जाऊ लागले आणि गणिताकडे त्यांचा ओढा वाढला. ब्रिटीश गणिती जॉन एडनसर लिटिलवुड आणि अमेरिकी गणिती मार्शल हॉल यांच्या व्याख्यानांना ते नियमीतपणे हजेरी लावू लागले. एकदा त्यांनी वुल्फगांग पॉल ह्यांना त्यांच्या व्याख्यानादरम्यान त्यांची एक चूक दाखवून दिली. पुढे ते आयुष्यभराचे मित्र बनले. चंद्रा यांचे पीएचडीसाठीचे संशोधन पूर्ण झाले आणि १९४७ मध्ये ‘लॉरेन्ट्स ग्रुपचे अनंत अपरिवर्तनीय प्रतिनिधित्व’ या विषयातील संशोधनासाठी त्यांना पदवी देण्यात आली. पीएचडी पूर्ण होताच ते अमेरिकेला गेले. तेथे १९४७-४८ दरम्यान प्रिन्स्टन येथे डिरॅक यांच्यासोबत चंद्र यांनी त्यांच्या सहाय्यकाचे काम पार पाडले. १९४९-५० दरम्यान हार्वर्ड विद्यापीठात आणि १९५० ते ६३ दरम्यान न्युयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांनी कारकिर्दीला निर्णायक वळण देणाऱ्या रिप्रेझेन्टेशन ऑफ सेमी सिंपल लाय ग्रुप्स या बिजगणितातील समस्येवर काम सुरू केले.
चंद्रा यांनी १९५२-५२ दरम्यान मुंबईतील टाटा मुलभूत संशोधन संस्थेत असताना ललिता काळे यांच्याशी लग्न केले. या दांपत्याला दोन मुली होत्या, पुढे १९६३ नंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स्ड स्टडीजमध्ये काम करताना अनेक पुरस्कार मिळवले. त्यात रिप्रेझेन्टेशन ऑफ सेमी सिंपल लाय ग्रुप्स संदर्भातील त्यांच्या संशोधनासाठीचा १९५४ चा अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचा कोल पुरस्कार, १९७४ चे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे श्रीनिवास रामानुजन पदक, दिल्ली (१९७३) व येल (१९८१) विद्यापीठांच्या मानद पदव्या हे प्रमुख पुरस्कार आहेत.
चंद्र १९७३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो बनले. १९८१ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे फेलो बनले आणि १९७५ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीने त्यांना फेलोशिप बहाल केली. वयाच्या साठाव्या वर्षी प्रिन्स्टन विद्यपीठातील एका आठवडाभराच्या परिषदेनंतर त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
लेखक :- बी श्रीकुमार
( बी श्रीकुमार हे विज्ञान प्रसारच्या स्कोप इन तमिळ या उपक्रमाचे समन्वयक असून विज्ञान लेखक आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)