शास्त्रज्ञ ९
भारतीय गॅस टर्बाइन तंत्रज्ञानाचे जनक एस एन रॉयचौधरी
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
विमानांचं हृदय म्हणता येऊ शकेल अशा गॅस टर्बाइन्सच्या निर्मितीमध्ये भारताला स्वयंपूर्णता मिळून देण्याच्या दिशेने आयुष्यभर कार्यरत राहिलेला अभियंता शास्त्रज्ञ म्हणजे एअर व्हाइस मार्शल शैलेंद्रनाथ रॉयचौधरी. (Sailendra Nath Roy Chaudhury) आयुष्याच्या अंतापर्यंत हेच ध्येय घेऊन ते कार्यरत राहिले.
आपल्या देशात, विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात, नवनवी तंत्रे विकसीत करण्यापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञानाच्या भारतीयीकरणाची आवश्यकता कितीतरी अधिक होती. त्याला सर्वाधिक महत्त्वही दिले जात असे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगदान हे प्रामुख्याने सामुहिक असते. मात्र, कधीकाळी पाश्चात्यांची मक्तेदारी असलेल्या तंत्रशास्त्रीय जगात योग्य समुहाचे नेतृत्त्व करीत विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसीत करण्याची क्षमता असलेले नेतृत्त्व हे सर्वगुणसंपन्न असते. एअर व्हाइस मार्शल शैलेद्रनाथ रॉयचौधरी (Sailendra Nath Roy Chaudhury) हे अशा प्रकारचे नेतृत्त्व होते. त्यांनी गॅस टर्बाइन तंत्रज्ञानाच्या जागतिक पटलावर भारताचे स्थान आपल्या कर्तृत्वाने उसवले आणि या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यासाठी मोलाचे योगदान दिले. हे सारं घडलं १९५० च्या दशकात एका तरुण हवाईदल अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात ज्याचा जन्म २ मार्च १९२३ रोजी झाला होता आणि त्याचे प्रशिक्षण ब्रिटिश हवाई दलात झाले होते.
त्यावेळी हिंदुस्थान एअरक्राफ्टस् लिमिटेड (एचएएल) या नावाने ओळखली जाणारी (Hindustan Aeronautics Limited) कंपनी म्हणजे ब्रिटन आणि अमेरिका यांचा भागीदारीतला विमाने बनविण्याचा व्यवसाय होता. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने तो ताब्यात घेतला आणि शैलेद्रनाथ रॉयचौधरी यांना त्याच्या एअर फोर्स विभागाचे नेतृत्त्व करण्यास सांगण्यात आले. या एअरफोर्स विभागात विमानांसाठी लागणारी गॅस टर्बाइन इंजिने संपूर्ण भारतीय तंत्राने बनविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलो. त्यावेळी कानपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये तत्कालीन पंतप्रधान आलं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षण मंत्री व्ही के कृष्णमेनन यांनी भरपूर रस घेतला. काम मोठं होतं आणि तुलनेने मनुष्यबळ कमी. रॉयचौधरी यांच्यासोबत अवघे दहा अभियंते आणि २० तंत्रज्ञांचा चमू देण्यात आला होता आणि या व्यवस्थेला नाव देण्यात आलं गॅस टर्बाइन रिसर्च सेन्टर (जीटीआरसी) लवकरच हे केंद्र बंगळुरूला हलवण्यात आलं आणि पुढे संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) भाग बनल्यानंतर त्याचं नाव गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेन्ट (जीटीआरई) असं करण्यात आलं.
रॉयचौधरी १९८१ मध्ये निवृत्त झाले तोपर्यंत डीआरडीओच्या या छोट्याश्या संस्थेमध्ये एकूण १६०० लोक काम करू लागले होते. १९७४ मध्ये रॉयचौधरी यांचा इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे फेलो म्हणून सन्मान करण्यात आला. लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचेही ते पहिले भारतीय फेलो होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठेची पारितोषिकेही मिळवली.
ग्रामीण भागांच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या जैवऊर्जा निर्मितीमध्ये त्यांना रस होता. अशा जैविक ऊर्जेवर एखादे छोटे गैस टर्बाइन चालवून ऊर्जा कशी निर्माण करता येऊ शकेल, हे ही त्यांनी दाखवून दिले होते.
अगदी उतारवयातही ते या क्षेत्रात कार्यरत होते. २०१६ मध्ये बंगळुरू येथे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
लेखक :- डॉ. भूपती चक्रवर्ती
(डॉ. भूपती चक्रवर्ती कोलकात्याच्या सिटी कॉलेजचे सेवानिवृत्त भौतिकशाख प्राध्यापक व शिक्षक संघटनेचे सरचिटणीस होते.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)