शास्त्रज्ञ १२
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रेडिओ खगोलशास्त्रज्ञ एम के दासगुप्ता
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
सिग्नस ए या आकाशगंगेचा आणि पर्यायाने एका कृष्णविवराचा अगदी तरुण वयातच शोध लावणारे प्रा. मृणालकुमार दासगुप्ता (m k dasgupta) भारतातील आघाडीचे रेडिओ खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातातच. पण, जगभरातील अनेक रेडिओ खगोलशास्त्र संशोधन संस्थांचे नेतृत्व करणारे अनेक विद्यार्थी त्यांचा संशोधनाचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवीत आहेत.
मृणाल कुमार दासगुप्ता (जे त्यांच्या विद्याथ्र्यांच्या वर्तुळात एमकेडीजी या टोपणनावाने ओळखले जात) हे भारतातील रेडिओ खगोलशास्त्रातील अग्रणी संशोधक. प्रख्यात खगोलतज्ज्ञ प्रा. हॅनबरी ब्राउन यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठात पीएचडी करीत असताना १९५३ मध्ये अगदी तरुण वयातच त्यांनी या क्षेत्रात आपल्या संशोधनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईल असे मोलाचे योगदान दिले. अगदी दूरवरच्या तारका समुहांतून येणाऱ्या रेडिओ लहरींचा छडा लावणारे उपकरण दासगुप्ता आणि त्यांचे सहकारी रॉजर जेनिसन यांनी तयार केले. त्या उपकरणाद्वारे कॅसिओपीआ आणि सिग्नस ए अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन तारकासमुहांतून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास त्यांनी सुरू केला. कॅसिओपिआकडून प्राप्त होणाऱ्या रेडिओ लहरी अगदी अपेक्षेनुसार होत्या. मात्र, सिग्नस ए कडून प्राप्त होणाऱ्या लहरींमुळे तिथे रेडिओ लहरींचे दोन स्रोत असल्याचे लक्षात येत होते. त्यातूनच पुढे कृष्णविवराचा शोध लागला. त्यामुळे सिग्नस ए या दुहेरी रेडिओ आकाशगंगेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
मृणाल यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी आता बांगलादेशात असलेल्या बारिसालमध्ये झाला आणि ढाक्यातील सेंट जॉर्ज विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते दहावीमध्ये असताना कोलकात्याचे प्रा.शिशिरकुमार मित्रा त्यांच्या शाळेत व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्याने मृणाल भोतिकशास्त्राकडे ओढले गेले. ढाका विद्यापिठातून त्यांना १९४६ साली एमएससी पदवी मिळाली. दुर्दैवाने एखाद्या स्वप्नाळू विद्यार्थ्यासाठी तो काही चांगला काळ नव्हता. भारताची फाळणी झाली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासह कोलकात्यात स्थलांतरित व्हावे लागले. हा साराच काळ खूप खडतर होता. मात्र, इथे त्यांना प्रा. मित्रा यांच्या सहाय्यकाचे काम मिळाले. प्रा. मित्रा यांनी या नव्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता हेरली आणि त्यांना इंग्लंडमध्ये पीएचडीकरिता फेलोशिप मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
दासगुप्ता १९५४ मध्ये भारतात परतले तेच मुळी इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ फिजिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स (institute of radio physics and electronics ) या संस्थेमध्ये प्रा. मित्रा यांच्या हाताखाली प्राध्यापक म्हणून. दासगुप्ता यांनी पुढे ही संस्था देश- विदेशात नावारुपाला आणली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यातल्या अनेकांनी पुढे जगभरात अनेक देशांतील संशोधन संस्थांचे व वेधशाळांचे नेतृत्त्व केले. विज्ञान लेखनात त्यांना खूप रुची होती. त्यांनी बांग्ला भाषेत अनेक लेख लिहिले आणि आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर कार्यक्रमही केले. २८ नोव्हेंबर २००५ रोजी मृत्यू होईपर्यंत ते सातत्याने कार्यरत होते.
लेखक:- – डॉ. भूपती चक्रवर्ती
(डॉ. भूपती चक्रवर्ती कोलकात्याच्या सिटी कॉलेजचे सेवानिवृत्त भौतिकशास्त्र प्राध्यापक व शिक्षक संघटनेचे सरचिटणीस होते.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)