शास्त्रज्ञ १४
अभियांत्रिकी शिक्षणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व शंकर लाल

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
अभियांत्रिकी (engineering )हे कृतीतून शिकण्याचे शास्त्र असले तरी, ते शिकवण्यासाठी पुस्तके व अन्य साहित्य लागतेच. आयुष्यभर अशा शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीचा ध्यास घेतलेल्या शंकरलाल यांनी आपले प्रभावी व्यक्तिमत्त्व, संभाषण कौशल्य आणि अनेक भाषांचे ज्ञान या बळावर या शास्त्रात आणि त्याच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीत मोठी भर घातली.
यंत्र अभियांत्रिकी हा कोणत्याही देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक असतो. नवनवी उत्पादने तयार करण्याकरिता यंत्र अभियांत्रिकीची पार्श्वभूमि असलेले अभियंता गरजेचे असतात. अशा तरुणांना अभियांत्रिकीचे प्रशिक्षण देण्यासाठीही विशेष व्यवस्था गरजेची असते. अशी व्यवस्था निर्माण करणारे तरुण अभियंत्यांना शिकविण्यासाठीची संसाधने निर्माण करणारे प्रा. शंकर लाल (shankar lal)हे एक बुद्धिमान व सर्जनशील व्यावसायिक होते. २४ जून १९२३ रोजी जन्मलेल्या लाल यांनी १९४४ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून एअरोडायनॅमिक्स या विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि १९४९ मध्ये ते लंडन विद्यापीठातून एमएस व १९५५ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडी झाले. घन यांत्रिकी (सॉलिड मेकॅनिक्स) आणि स्थितीस्थापकत्त्व (इलॅस्टिसिटी) हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.
परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाल यांनी १९५९मध्ये तेव्हाच्या रुरकी विद्यापीठातील (आता आयआयटी रुरकी) यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजीनिअरिंग) विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनास सुरुवात केली. १९६४ ते ६७ आणि १९७२ ते ७८ या काळात ते या विभागाचे विभागप्रमुखही झाले. त्यांच्याच कारकिर्दीत येथे औद्योगिक अभियांत्रिकी विभाग (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनिअरिंग) आणि उत्पादन औद्योगिक अभियांत्रिकीमधील बीटेक पदवी अभ्यासक्रम यांची सुरुवात झाली.
रुरकी आयआयटीमधील या अनुभवानंतर प्रा. लाल १९७८ मध्ये आयआयटी मिळाले होते.. खरगपूर येथे संचालक म्हणून रुजू झाले. आपले मोहक व्यक्तिमत्त्व आणि उत्तम संवादकौशल्ये यांच्या बळावर विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचारीवर्ग या सर्वांत ते अल्पावधित लोकप्रिय बनले. त्यांच्या वर्गात बसणे हा आनंदाचा भाग असे, असे त्यांचे विद्यार्थी सांगतात. ते बहुभाषाकोविद होते. बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्त्व होतेच, पण संस्कृत, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, उर्दू, फ्रेंच आणि स्पॅनिश या भाषांमध्येही ते सहजपणे संवाद साधू शकत असत.

आयआयटी खरगपूरची जबाबदारी त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या काळात घेतली आणि अगदी अल्पावधीतच संस्थेचे स्वरूप संपूर्णपणे पालटून टाकले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत त्यांनी आमुलाग्र बदल केले आणि अनेक विभागांत नवे अभ्यासक्रम सुरू केले. सहकारी प्राध्यापकांनी आपापल्या तज्ज्ञतेच्या विषयांवर पुस्तके लिहावीत असा त्यांचा आग्रह असे. त्याकरिता त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार रून आयआयटी खरगपूर- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस अशी प्रकाशनांची नवी मालिकाच सुरू केली.
खरगपूर येथील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर प्रा. लाल रुरकी विद्यापीठात परतले आणि १९८३ साली निवृत्त होईपर्यंत तेथेच अध्यापन करीत राहिले. अर्थात, निवृत्तीनंतरही प्रा. लाल विद्यार्थी आणि सहकाऱ्यांना मार्गदर्शन करीतच राहिले. रुरकी आणि अमेरिकेतही अनेकदा त्यांना सर्वोत्तम शिक्षकाचे पारितोषिक मिळाले होते.
अध्यापनकायांव्यतिरिक्त सोसायटी फॉर हीट अँड मास ट्रान्स्फर चे उपाध्यक्ष ( १९७६-७८), इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअर्सचे अध्यक्ष (१९८२-८३), इंडियन सोसायटी ऑफ थिअरटिकल अँड अप्लाइड मेकॅनिक्सचे अध्यक्ष (१९८१-८२), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे फेलो, लंडन येथील रॉयल एरोनॉटिकल सोसायटीचे फेलो, लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजीनिअर्सचे फेलो, आदी पदे त्यांनी भूषविली. भारतातील विज्ञान व अभियात्रिकी संदर्भातील घोरणे निश्चित करण्यासाठीच्या अनेक समित्यांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले. शिक्षणसंस्थांच्या प्रशासनात त्यांना मोठी रुची होती. त्यामुळे अलाहाबाद येथील मोतिलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्था आणि श्रीनगर येथील क्षेत्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक मंडळावर त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या या सान्या कार्याची स्मृती म्हणून आयआयटी रुरकी येथे नुकतेच्या त्यांच्या नावे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. २५ सप्टेंबर १९९१ रोजी अमेरिकेत असताना प्रा. लाल यांचे निधन झाले.
लेखक :- सुमिता मुखर्जी
(सुमिता मुखर्जी या विज्ञान प्रसारमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत )
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)