शास्त्रज्ञ १५
समर्पित अवकाश शास्त्रज्ञ आरआर डॅनियल
२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
टाटा मुलभूत विज्ञान संस्थेच्या जडणघडणीमध्ये अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ म्हणून प्रा. रंजन रॉय डॅनियल ओळखले जातात. अत्यंत मृदुभाषी तरुणांशी चर्चेला उत्सुक असा हा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेतील संशोधनाच्या नव्या दिशा शोधण्यात कायम आघाडीवर असे.
प्रा. रंजन रॉय डॅनियल (Ranjan Roy Daniel) हे एक वैश्विक किरणांच्या भौतिकीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होते. त्यांना प्रा. होमी भाभांच्या सहवासात दशकभरापेक्षा जास्त काळ संशोधनाचे भाग्य लाभले होते. डॅनियल १९४७ मध्ये टाटा मुलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) दाखल झाले. ते संस्थेच्या प्राथमिक बांधणीचे दिवस होते. प्राथमिक संशोधनाचे क्षेत्र अजून ठरायचे होते आणि संशोधनवृत्तीही विकसीत व्हायची होती. त्यांनी अगदी अल्प काळात स्वतःला तयार केले आणि संस्थेला आवश्यकता होती तशा प्रकारचे नेतृत्त्व दिले. टीआयएफआर अलम्नाय असोसिएशनचे ते एक सर्वाधिक सन्माननीय सदस्य होते.
रंजन रॉय डॅनियल यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२३ रोजी तमिळनाडूतल्या नागरकोइल शहरात झाला. तिथल्या स्कॉट ख्रिश्चन स्कूल आणि नंतर चेन्नईच्या लॉयला कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाची बीएससी पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते बनारस हिंदू विश्वविद्यापीठात गेले. तिथे त्यांनी १९४६ मध्ये एमएससी पदवी मिळवली.
स्वातंत्र्यानंतर लवकरच भारत सरकारने तरुण संशोधकांना परदेशी विद्यापीठांत जाऊन संशोधन करण्यास मदत करण्याच्या हेतूने एक निधी तयार केला होता. या शिष्यवृत्तीसाठी डॅनियल यांची निवड झाली. त्यांनी ब्रिटनमधील ब्रिस्टॉल येथील नोबेल विजेते प्रा. सी जी पॉवेल यांच्या प्रयोगशाळेची निवड केली.वैश्विक
कणांवर त्यांनी संशोधन केले आणि प्रा. डोनाल्ड हिल पर्किन्स यांच्या मार्गदर्शनानुसार प्रबंध सादर केला. १९५३ मध्ये वैश्विक कणांसंदर्भातील मूलगामी संशोधनासाठी त्यांना ब्रिस्टॉल विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली.
त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये अनेक विषयांवर विपूल लेखन केले. त्यातून खगोल भौतिकी तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख तयार झाली. त्यांच्या शिस्तबद्ध आखीवरेखीव कामाने त्यांच्या सहकाऱ्यांनाही प्रेरणा मिळत असे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आणि अनेक शास्त्रज्ञांना डॉक्टरल रिसर्चसाठी मार्गदर्शन केले.
आपल्या प्रयोगशाळेत संशोधनाच्या नव्या दिशा धुंडाळण्याला डॅनियल यांनी नेहमीच प्राधान्य दिले. वातावरणाच्या वरच्या स्तरांचा अभ्यास करण्यासाठी बलून रिसर्च फॉसलिटी त्यांनी सुरू केली. १९९२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थांचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. तसेच त्यांना वेणु बाप्पू पुरस्कारही देण्यात आला. १९७० च्या दशकात पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
प्रा. आर. आर. डॅनियल १९८८ मध्ये औपचारिकपणे सेवानिवृत्त झाले. पण, तरुण संशोधकांना मार्गदर्शन करण्यात ते कायम कार्यरत राहिले. प्रदीर्घ आजारानंतर २७ मार्च २००५ रोजी त्यांचे देहावसान झाले. ते एक अगदी मृदुभाषी सत्पुरुष होते. तरुण संशोधकांशी चर्चेसाठी ते सदैव उत्सुक असत. नव्याने स्थापन झालेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सल्लागार म्हणून त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरांवर प्रभावी विज्ञान शिक्षणाच्या त्यांच्या कल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मोठा प्रयत्न केला. टीआयएफआरमध्ये असताना त्यांच्याशी संवादाचा आनंद मी अनेकदा घेतला आहे.
डॉ. सुधाकर आगरकर
(डॉ. सुधाकर आगरकर हे मुंबईतील टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे निवृत्त प्राध्यापक असून निवृत्तीनंतर ठाण्यातील व्हीपीएम अकॅडमीचे प्राध्यापक व अधिष्ठाता आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)