शास्त्रज्ञ १७
सेंद्रीय रसायनशास्त्रज्ञ एस स्वामिनाथन

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
सेंद्रीय रसायनशास्त्रावरील परिसंवाद, व्याख्याने, शैक्षणिक व औद्योगिक संस्थांतील सहकार्य वाढीसाठी उपक्रम, तसेच जगभरातील वैज्ञानिक, प्राध्यापक व उद्योजक यांतील परस्पर सहकार्यासाठी प्रयत्न करणान्या नोस्ट’च्या स्थापनेत मोठी भूमिका बजावणारे एस स्वामीनाथन (s swaminathan) विज्ञानाच्या या शाखेप्रती संपूर्ण समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
भारतातील एक ख्यातकीर्त सेंद्रीय रसायनशास्त्रज्ञ म्हणून परिचित असलेल्या प्रा. सांबशिव स्वामिनाथन यांचे भारतातील आधुनिक विज्ञानाच्या प्रसारामध्ये मोठे योगदान आहे. मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) २० एप्रिल १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या काळी विज्ञान शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा फार ओढा नसताना त्यांनी विज्ञान हाच आपल्या कारकीर्दीचा आधार असेल, असे निश्चित केले. त्यानुसार १९४३ मध्ये अन्नामलाई विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये गेले. तिथे प्रा. पी सौ गुहा यांच्यासोबत संशोधन करून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. पुढे भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेतील इलेनॉइस विद्यापीठात प्रा. एच आर स्नायडर यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथून ओहिओ विद्यापीठात प्रा. एमएस न्युमन यांच्यासोबत त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केले.
१९५३ मध्ये भारतात परतल्यावर ते मद्रास विद्यापीठाच्या सेंद्रीय रसायनशास्त्र विभागात रुजू झाले. तिथे त्यांनी सेंद्रीय रसायनशास्त्रातील अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा विडा उचलला. १९६० मध्ये ते प्राध्यापक आणि विभागप्रमुख बनले आणि त्यानंतरच्याच काही वर्षांत मद्रास विद्यापीठाचा तो विभाग सेंद्रिय रसायनशास्त्रातील संशोधनासाठी सर्वाधिक पसंती असलेले केंद्र म्हणून विकसीत झाला.
नॉन अरोमेंटिक स्टिरॉइडस, रेण्वीय पुनर्रचना अलिसायक्लिक केमेस्ट्री, इंडॉल व संबंधित संयुगांचे रसायनशास्त्र आदी विषयांतील संशोधनात प्रा. स्वामिनाथन यांना मोठा रस होता आणि या क्षेत्रांच्या विकासात त्यांच्या संशोधनाचे मोठे योगदान होते. वायलंड मिश्चर कीटोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका कळीच्या रसायनाची निर्मिती करण्याचे तंत्र विकसीत करणाऱ्या आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये ते होते. अशाच प्रकारे अणूंची विशिष्ट रचना असणारे वेगवेगळ्या रसायनांचे रेणू तयार करण्याच्या पद्धतीही त्यांनी विकसीत केल्या होत्या.
स्वामीनाथन हे उत्तम शास्त्रज्ञ तर होतेच, पण व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात पारदर्शकतेचा आग्रह धरणारे आणि तसे वागणारे एक उत्तम मार्गदर्शकही होते. प्रा. टीआर गोविंदाचारी पुरस्कार (१९८०), सर पी सी रे पदक (१९८१), केमिकल रिसर्च सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार (२००१) इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची फेलोशिप आदी पुरस्कांनी त्यांना गौरविण्यात आले. १९८३ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ऑरगेनिक सिम्पोझियम ट्रस्ट (नोस्ट) च्या पाच संस्थापक विश्वस्तांपैकी ते एक होते. स्थापनेपासूनच या संस्थेच्या माध्यमातून सेंद्रीय रसायनशास्त्रावरील परिसंवाद, व्याख्याने, विज्ञान लोकप्रिय करण्यासाठीचे विविध उपक्रम, शैक्षणिक व औद्योगिक संस्थांतील सहकार्य वाढीसाठी उपक्रम, तसेच जगभरातील वैज्ञानिक, प्राध्यापक व उद्योजक यांतील परस्पर सहकार्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्वामीनाथन यांनी २००४ साली ऐंशीव्या वाढदिवसानंतर एका रसायनाच्या किचकट निर्मिती प्रक्रियेचे तपशील लिहून प्रसिद्ध केले. त्यांची ही ज्ञाननिष्ठा आणि आधुनिक विज्ञानाप्रती असलेले समर्पण येत्या पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देत राहील.
लेखिका :- आदिती देव
(आदिती देव या विज्ञान प्रसारमध्ये कार्यक्रम सहाय्यक असून विज्ञान लेखक आहेत, इ मेल)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)