मत्स्य जयंती
नुकत्याच एका कला दालनात के.. के. हेब्बर यांचे एक चित्र पाहिले. मासा आणि मनुष्य.
एखादी कलाकृती तयार करताना, मग ते चित्र असो वा कविता असो, त्या कलावंताला त्यांच्या मनातले व्यक्त करायचे असते. पण ती बघताना प्रेक्षकांना आणि ऐकताना श्रोत्यांना काय वाटते ते कदाचित वेगळे असू शकते. तसेच काहीसे ह्या चित्राच्या बाबतीत मला वाटते. विश्वाच्या पसाऱ्यात केंद्रभागी एक काळा गोल आहे. त्याच्यात नावेत बसलेला एक माणूस आहे. माणूस आणि नाव यांच्या तुलनेत कितीतरी महाकाय असलेला एक मासा आहे आणि माणूस त्या माशाला पकडतो आहे. पण ते जाळे नाहीये तर काठी सारखे दिसणारे काही तरी आहे. मग तो भाला टोचतोय आहे का? की ते सरळ दिसणारे आहे ते माशाला बांधलेले आहे आणि तो मासाच त्या माणसाची होडी ओढत नेतो आहे? त्याला वाचवतो आहे?
फार फार पूर्वीची गोष्ट आहे. प्रलय झाल्यावर त्या प्रलयापासून माणसाला वाचवणारा एक महाकाय मासाच होता.
तेव्हापासून आजपर्यंतचा खूप मोठा प्रवास झाला आहे हा. उद्धार करणारा ते शिकार होणारा असा माशाचा प्रवास आणि माशाकडून उद्धरला जाणारा ते मासे पकडणारा, त्यांची शिकार करणारा असा माणसाचा प्रवास.
तसा तर मासा मानवी संस्कृतीशी अगदी पहिल्यापासून जोडला गेलेला आपल्याला आढळतो. लहान मुले चित्र काढायला शिकतात. तेव्हा सर्वात आधी काढतात त्रिकोणी डोंगर, मग एक गोल सूर्य, मग नागमोडी रेषांचे पाणी. बोटांना हे प्राथमिक आकार काढायचे वळण लागले की मग मुले जरा अवघड आकार काढू लागतात. त्यामूळे नंतर ह्या चित्रात येतात मराठी चारच्या आकारातील पक्षी आणि एक लंब गोल, त्याला मागे त्रिकोण असे असलेले मासे !! मराठी हिंदी बालगीतातून लहान मुलांना मासे माहिती झालेले असतात. अगदी चैत्र महिन्यात दारापुढे काढल्या जाणाऱ्या चैत्रांगण रांगोळीत देखील मासे असतात.
महाराष्ट्राचे लोकदैवत असलेला पंढरीचा विठोबा कानात मकर कुंडले घालून युगानुयुगे उभा आहे. मकर याचा प्रथमदर्शनी अर्थ मगर असा असला तरी मकर म्हणजे मासा असाही एक अर्थ आहे आणि विठ्ठलाच्या कानातली कुंडले ही मत्स्याकृतीची आहेत.
साहित्याचा विचार केला तर महाकवी कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतल मध्ये माशाची खूप मोठी भूमिका आहे. मोठी म्हणजे लांबीच्या दृष्टीने मोठी नव्हे कथानकाच्या दृष्टीने मोठी भूमिका आहे. दुष्यंताने शकुन्तलेला आपली खूण म्हणून दिलेली शकुंतलेची अंगठी पाण्यात पडते. शकुंतलेला दुर्वासांनी शाप दिलेला असतो की ज्याच्या चिंतनात मग्न आहेस आणि म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलेस. तो तुला ओळखणार देखील नाही. पण मग ते उःशाप देखील देतात की तू त्याला अंगठी दाखवलीस तर तो तुला ओळखेल. पण शकुंतलेची अंगठी तर पाण्यात पडून गेलेली असते आणि ती नसल्यामुळे दुष्यंत तिला ओळखत नाही. पाण्यात पडलेली ती अंगठी एका माशाने गिळलेली असते. नंतर ती एका कोळ्याला सापडते आणि तो दुष्यन्ताला आणून देतो आणि मग दुष्यंताला सगळे आठवते. असे कथानक आहे. हेमिंगवेच्या’ ओल्ड मॅन अँड द सी’ मध्ये देखील ओल्ड मॅन इतकाच मासा देखील प्रमुख भूमिका निभावतो!
सिनेसृष्टीत मासे वारंवार आलेले आढळतात. अगदी सर्वात नवा उल्लेख करायचा म्हणजे अवतार – २, द वे ऑफ वॉटर’ मधला अगदी वेगळाच आणि अतिशय बुद्धिवान मासा टुलकून त्याच्या मेंदूतून काढलेले द्रव्य माणसाला अमर बनवणारे असते. फाइंडिंग निमो मध्ये तर कितीतरी मत्स्यकुळे होती. हिंदीतल्या चित्रपटांत म्हणायचं तर सर्व लहान मुलांना आवडलेला अजूबा सिनेमा आणि आईसारखी माया करणारा डॉल्फिन मासा आठवतो.
विविध संस्कृतीत मासा
हिंदू (hindu) धर्मात मनूला माशांनी वाचवण्याची कथा तर आपण नंतर विस्ताराने पाहणार आहोतच. मासा हे केवळ भारतीय संस्कृतीतच नाही तर इतर संस्कृतीत देखील आपल्याला प्रतीक म्हणून वेगवेगळ्या धर्मग्रंथात, धार्मिक चिन्हात वापरलेले आढळतात. चिनी संस्कृतीत मासा हे समृद्धीचे प्रतीक मानतात. शांती, स्थिरता आणि वैभवाचे प्रतीक म्हणजे कोई मासा.. विपरीत परिस्थितीवर जिद्दीने मात करणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे हे माशाचे प्रतीक शिकवते. माशाला ग्रीक शब्द ichthys आहे. त्याचे इंग्लिश मध्ये भाषांतर केले तर त्याचा अर्थ होतो जीझस देवाचा पुत्र. ख्रिश्चन धार्मिक कथांमध्ये माशांचा उल्लेख आढळतो. – मासे असंख्य अंडी देतात. त्यामुळे मासा हे प्रजोत्पादनाचे आणि भाग्याचे प्रतीक मानला जातो.
इस्लाम धर्मात मासा हे चिरंतन आयुष्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. एका माशावर बसून पालखीत मार्गदर्शक जातो आहे असे इस्लामी धर्मग्रंथात दाखवले जाते.
बुद्ध धर्मात बुद्धाच्या आठ पवित्र चिन्हांपैकी दोन सोनेरी मासे हे एक चिन्ह आहे. निर्भयतेने आणि आनंदाने जगण्याची शिकवण हे मासे देतात.
निरनिराळ्या ठिकाणी गुहातून सौंदर्याचा प्रतीक म्हणून मासे कोरलेले आपल्याला आढळतात… प्राणी शास्त्रातील वर्गीकरणातील जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी अशा प्रगतीच्या स्तरांवर मासे हे सर्वात पहिल्या स्तरावर आढळतात.
दशावतारांची संकल्पना
भारतीय संस्कृतीतील दशावतारांची संकल्पना उत्क्रांतीवर आधारलेली आहे असे मानले तर तिथे देखील विष्णूने घेतलेला पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार होय.
त्यानंतरचे अवतार हळूहळू प्रगत होऊ लागलेले आपल्याला आढळतात. मुळात हिंदू संकल्पनेनुसार अवतार होतात ते संकटातून पृथ्वीचे आणि मानवाचे रक्षण करण्यासाठी.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
सज्जनांचे रक्षण आणि धर्माचे सामर्थ्य पुनःप्रस्थापित करण्यासाठी मी येतो असे गीतेत सांगितलेच आहे.
कोणते आहेत हे अवतार?
मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की.
ह्या दशावतारांच्या जन्मतिथीचा उल्लेख देखील आढळतो. मत्स्य चैत्र शुद्ध तृतीया, कूर्म- – वैशाख पौर्णिमा, वराह- भाद्रपद शुद्ध तृतीया, नरसिंह- वैशाख शुद्ध चतुर्दशी, वामन- भाद्रपद शुद्ध द्वादशी, परशुराम – वैशाख शुद्ध तृतीया, राम – चैत्र शुद्ध नवमी, कृष्ण -श्रावण ,वद्य अष्टमी, बुद्ध- आश्विन शुद्ध दशमी आणि कल्की- श्रावण शुद्ध षष्ठी अशा त्या जन्मतिथी आहेत.
तर काही पुराणातील वर्णनानुसार;-
जलजी वनजौ खर्व : त्रिरामी सकृपोऽकृपः
अवतारा दशै वै ते कृष्णस्तु भगवान स्वयं ।
दहा अवतार असे आहेत. जलज- पाण्यात उत्पन्न होणारे दोन अवतार, हणजे मत्स्य आणि कासव – कूर्म, वनज – जंगलात निर्माण होणारे दोन अवतार म्हणजे वराह आणि नृसिंह. खर्व – वामन. त्रिरामी म्हणजे तीन राम – परशुराम, दाशरथी राम आणि बलराम. आता सकृपोऽकृपः म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर कृपायुक्त अवतार म्हणजेच सकृप आहे बुद्ध आणि कृपाहीन अवतार म्हणजे अकृप आहे कल्की.
आधीच्या वर्णनापेक्षा बलराम इथे वेगळा आहे हे तर झालेच. पण कृष्ण नाही असे कसे? तर त्याचे उत्तर आहे ह्याच श्लोकाच्या अंतिम चरणात की कृष्ण हेच स्वतः भगवान असून त्याच्यापासून सर्व अवतार निर्माण झाले आहेत.
मत्स्य कूर्म वराहस्य नरसिंहोऽश्च वामनः
रामो रामश्च कृष्णश्च बुध्दः कल्किश्च ते दश:
पद्म पुराण आणि इतर पुराणात हेच वर्णन दिलेले आढळते.
दशावतार वैज्ञानिक संकल्पना
मगाशी आपण वाचले की अवतार आपल्याला प्रगतीचे टप्पे दाखवतात. ह्या सृष्टीची प्रगती, मानवाची प्रगती दाखवतात. प्रगती कशाच्या संदर्भात ? तर गुणांची उत्क्रांती आणि विकास इथे अभिप्रेत आहे. अगदी वैज्ञानिक तत्वांवर आधारलेली अशी ही शृंखला आहे.
सृष्टीचा प्रारंभ जलचर प्राण्यांपासून झाला असे म्हणतात. मासा त्या सृष्टिप्रारंभाचे प्रतीक आहे. कारण मासा पाण्यात राहतो. पृष्ठवंशी प्राण्यांमधल्या पहिल्या वर्गाचे प्रतिनिधित्व तो करतो. पाण्याबाहेर तो जिवंत राहू शकत नाही.
त्या नंतरचा अवतार आहे जमीन आणि पाणी दोन्हीवर जगू शकणारे उभयचर कूर्म.. पृष्ठवंशी प्राण्यांतील दुसरा वर्ग. थोड्या प्रगत युगाचे प्रतिनिधित्व कासव करते. ते पाण्यात राहिले तरी जमिनीवर पण जिवंत राहते. त्यानंतरचा अवतार आहे वराह. जीवसृष्टी आणखी प्रगत झाल्याचा पुरावा. केवळ जमिनीवर जगू शकणाऱ्या प्राण्यांचे युग सुरू झाले हे दर्शविणारा प्रतिनिधी म्हणजे वराह.
यानंतर बाकी सर्व प्राणी विकसित झाले. सर्वात शेवटी आला मानव तोच मानव की जो सध्या केवळ बुद्धीच्या जोरावर आपणच सर्व सृष्टीचे राजे आहोत, सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे मानून त्यांचे शोषण करतो तो मानव. खरे तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण ह्या पृथ्वीतलावर सर्वात शेवटी आलो आहोत.
मानव आत्ताच्या अवस्थेत येण्याआधी उत्क्रांतीचे अनेक टप्पे पार करावे लागले. तेच आपल्याला ह्या अवतारांत देखील दिसते. प्राणी आणि मनुष्य दोन्ही असलेला नरसिंह अवतार. ह्या रूपानंतर मानव तयार झाला खरा पण तो अजून लहान चणीचा, बुटका होता. तो वामनावतार वामन रूप हे प्रगत मानवाचे प्राथमिक रूप आहे. मग आला परशुराम अवतार. २१ वेळा जुलुमी आणि दुष्ट शासकांपासून पृथ्वी मुक्त करणारा आणि परशु धारण करणारा परशुराम. शूरवीर मानवरूप. त्यापुढचे दाशरथी राम रूप म्हणजे मर्यादापुरुषोत्तम राम. सर्वच बाबतीत आदर्श असे मानवरूप. कृष्ण हा पूर्णावतार तर बुद्ध म्हणजे दया, करून, अहिंसेचे मूर्तिमंत रूप. शत्रूवर देखील कृपा करणारे असे हे रूप. पण जगाला जशास तसे हे न्याय दाखवणारे, शत्रूंशी लढताना त्यांच्यावर कृपा न करता शत्रूला नामोहरम करणारे रूप म्हणजे कल्की.
अवतार प्रयोजन
संकटातून वाचवण्यासाठी अवतार घेतले असे म्हणाले तर ती संकटे कोणती होती हे पाहायला हवे.
पुराणांतील कथांचे दाखले अनेकदा दिले जातात. त्यावरून लक्षात येते की मत्स्यावतार शंखासुराला मारण्यासाठी झाला. प्रलय झाला तेव्हा मनूचे आणि पर्यायाने र क्षा करण्यासाठी झाला.
देव व दैत्य सागरमंथन करत होते तेव्हा रवी म्हणून मंदार पर्वत घेतला होता. पण तो समुद्रात बुडायला लागला. त्या मंदार पर्वताला आधार देण्यासाठी कूर्मावतार झाला. पृथ्वी पाण्यात बुडू लागली तेव्हा पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी आणि ती बुडण्याची कारण ठरलेल्या हिरण्याक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी वराह अवतार झाला.
हिरण्यकश्यपू ह्या दैत्याचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंहावतार झाला. तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वामनावतार झाला. जुलुमी दुष्ट क्षत्रिय राजांचा नाश करणारा परशुरामावतार, रावणराज्य नष्ट करून धर्माचे रामराज्य प्रस्थापित करणारा रामावतार, दुष्टांचा वध करण्यासाठी कृष्णावतार यज्ञात दिले जाणारे बाली, युद्धात होणारी हिंसा ह्यांचा अतिरेक थांबवण्यासाठी बुद्धावतार आणि जो अजून व्हायचा आहे तो कल्कीचा अवतार.
मत्स्यावतार
ह्या अवताराविषयी, शतपथ ब्राह्मण आणि तैतरीय संहिता ह्या दोन ग्रंथांचे संदर्भ आढळतात. हा अवतार नक्की कधी झाला ह्याविषयी वेगवेगळी तिथी दिलेली आढळते. एक तिथी आहे चैत्र शुद्ध तृतीया आणि वराहपुराणानुसार आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी मत्स्यावतार झाला. ज्याच्यापासून वेदांचे रक्षण करण्यासाठी मत्स्यावतार झाला असे मानले जाते त्याची देखील दोन वेगवेगळी नावे आढळतात. कुठे हयग्रीव तर कुठे शंखासुराचे नाव आहे.
कश्यप पत्नी दिति ही दैत्यांची माता. हयग्रीवासुर हा तिचाच मुलगा. त्याने ब्रम्हदेवाकडून वेद पळवून नेऊन समुद्रात लपवून ठेवले. हयग्रीव हा जमीन, पाणी, आकाश तिन्हीमध्ये संचार करू शकायचा असे कथा सांगते.
हयग्रीवाचा वध करून वेदांचे रक्षण करण्यासाठी, त्यांना पाण्यातून बाहेर काढून ब्रम्हदेवाला परत सोपवण्यासाठी पाण्यात लीलया वावरणाऱ्या मत्स्याचे रूप घेतले.
मनू आणि मासा
अजून एक कथा अशी की एकदा राजा मनू नदीच्या तीरावर तर्पण करीत असताना त्याच्या हातात एक लहान मासा आला. तो मासा मनुला म्हणाला की मला वाचव. माझे रक्षण पालन पोषण कर. ह्या बदल्यात मी तुला वाचवेन व संकटातून पार करेन. राजाला आश्चर्य वाटले. हा इतका लहान मासा आपल्याला कसा वाचवणार? तेव्हा मासा पुढे म्हणाला, येणाऱ्या काळात मोठा जलप्रलय होणार आहे. त्यात सर्व सृष्टी नष्ट होईल. वाहून जाईल. तेव्हा मी तुला राजाने विचारले,” ते कसे?”
तेव्हा मासा म्हणाला, तू एक नाव तयार कर. त्या नावेत अन्नधान्य बीजरूपात तसेच सर्व स्वेदज, अंडज, उद्भिज इत्यादी जीव सोबत घे. प्रलयाच्या वेळी नावेत बस. नाव त्या प्रलयात आपला तोल सावरू शकणार नाही. म्हणून ती नाव तू माझ्या शिंगाला बांध. मी तुला सुरक्षित स्थळी घेऊन जाईन.”
मग मनूने तो मासा कमंडलूत ठेवला. तो मोठा झाला. त्याला कमंडलू पुरेसा होईना तेव्हा एका लहान घड्यात ठेवला. पण लवकरच तो मासा आकाराने वाढला आणि घड्यात मावेनासा झाला. मग त्याला विहिरीत ठेवले. तिथेही तो मोठा झाला. मग सरोवरात, नंतर नदीत आणि तिथेही त्याला जागा पुरेनाशी झाल्यावर समुद्रात सोडले.
मग माशाच्या सांगण्याप्रमाणे एक नाव तयार केली. सर्व अन्नधान्यांचे बीज नावेत ठेवले. काही काळाने जेव्हा प्रलय झाला तेव्हा मनूने नावेत बसून ती नाव माशाच्या शिंगाला बांधली. माशाने ती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. अशा रीतीने मत्स्यावतारात सृष्टीचे रक्षण केले गेले.
मनूच का?
प्रश्न असा पडतो की मनूच का निवडला गेला ह्या कामासाठी? तर कथा सांगते की मनूने अनेक वर्षे तप केल्यावर जेव्हा त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले तेव्हा खरे तर त्याला स्वतः साठी मोक्ष, परम पदाची प्राप्ती असे काहीही मागता आले असते. पण मनू हा उत्तम राजा व उत्तम माणूस होता. उत्तम राजाचे लक्षण असते की तो स्वतः आधी नेहमी प्रजेचा विचार करतो, तेव्हा वैयक्तिक कोणतेही मागणे न मागता मनूने असे मागितले की जेव्हा प्रलय काळ येईल, तेव्हा मी पृथ्वीवरील सर्व जीव समूहांचे रक्षण करण्यास समर्थ असावे. ब्रह्मदेवांनी त्याला तथास्तु म्हणून वर दिला आणि म्हणूनच मत्स्यावतारात सर्व जीवसमूहाचे रक्षण करण्यासाठी आणि नावेत बसण्यासाठी राजा मनू ची निवड झाली.
तात्पर्य
ह्या कथा ऐकल्या आणि त्यावर विचार केला की लक्षात येते जेव्हा ज्ञान झाकोळले जाते. त्यावर अंधाराचे आवरण आपोआप किंवा जाणूनबुजून घातले जाते जसे हयग्रीवाने वेद लपवले होते तसे, तेव्हा जिथून हल्ला झालेला असेल तिथेच जाऊन, तसेच लढून ज्ञानाला वाचवायला लागते. ज्ञानावरचे आवरण दूर करावे लागते. वेद समुद्रात लपवले गेले तर समुद्रात जगू शकेल असाच अवतार घेऊन वेदांचे रक्षण केले गेले.
दुसरे लक्षात येते की प्रयत्न सोडून चालत नाही. नदीत गेल्यावर मोठा झाला की मासा आपोआप समुद्रात जाईल, त्याला पोहता येतेच असे म्हणून मनू स्वस्थ बसला नाही. त्याने त्याला समुद्रात नेऊन सोडले. तेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, तर कोणत्याही शक्यता गृहीत न धरता स्वतः पूर्ण प्रयत्न करत राहा.
संकटातून सुटायचे असेल तर पूर्वतयारी आवश्यक असते. प्रलय होईल तेव्हा बघू काय करायचे ते असे म्हणून चालत नसते, तेव्हाही चालले नव्हते. आधीच तयारी म्हणून नाव तयार केलेली होती. वाचवायचे होते ते अन्नधान्य तसेच प्राणी नावेत ठेवलेले होते.
दूरदृष्टी संकटाला लहान न लेखणे, पूर्वतयारी व वेळ येईल तेव्हा पूर्ण तयारीनिशी आत्मविश्वासाने संकटाला सामोरे जाऊन विजयी होणे हे ह्या कथेचे तात्पर्य वाटते.
स्वतःच्या स्वार्थापुढे जो जाऊ शकेल तोच दुसऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो हे देखील मनूच्या असा सर्वांचे रक्षण करता यावे ह्या वर मागण्याने अधोरेखित होते.
मत्स्य जयंती (matsya jayanti)
मत्स्य जयंती चैत्र शुद्ध तृतीयेला साजरी केली जाते. ह्या दिवशी उपास केला जातो. मत्स्यावतारातील विष्णूची पूजा केली जाते. त्या निमित्ताने व्रतस्थ आचरण घडते. दान धर्म केला जातो. मत्स्यावताराची प्रतिमा काही ठिकाणी पूर्ण मत्स्यरूपात दिसते तर कधी खालचा भाग मत्स्य रूपात आणि वरचा भाग मानवी रूपात अशी दिसते. मानवी रूपाला चार हात दाखवलेले असतात आणि त्या हातांत विष्णूची आयुधे असतात. मत्स्य जयंती हे व्रत आहे. उपासना आहे आणि म्हटले तर उत्सव देखील आहे.
मत्स्य यंत्र
ह्या मत्स्यावतारातील विष्णुमूर्ती प्रमाणेच एक मत्स्य यंत्र देखील काहीजणांच्या पूजेत आढळते.
अत्यंत अवघड रचना असलेल्या ह्या यंत्राची समकेंद्री पाकळ्यांची रचना आहे. त्या पाकळ्यांच्या संख्येवरून ते कशाचे प्रतीक आहेत ह्याचे संकेत आहेत. यंत्र म्हणजे विविध आकृती जसे बिंदू त्रिकोण, चौकोन इत्यादी आकार वापरून केलेली रचना. एखादी विशिष्ट रचना हे त्या त्या देवतेचे प्रतीक मानले जाते व त्याची पूजा केली जाते.
एखादी पूजा तुम्हाला करायची असेल तर त्या साठी देहशुद्धी आणि चित्तशुद्धीचे संस्कार आपल्या धर्मात सांगितले आहेत.
मध्यंतरीच्या काळात विस्मृतीत गेलेले हे मत्स्यजयंतीचे व्रत आणि उत्सव आता अनेकांच्या लक्षात येते आहे.
व्रते का केली जातात?
पण एकूणच व्रते कशासाठी केली जातात? व्रतं पुण्यं व्रतं भाग्यम, व्रतं तप व्रतं सर्वार्थ साधनं देवेशपूजनं असे आपल्याकडे मानले जाते. व्रताने दृढनिश्चय, संयम, संकल्प, भक्ती श्रद्धा ह्यांचा विकास होतो. व्रतांचे कायिक, वाचिक, मानसिक असे प्रकार आहेत. व्रत आचरत असताना क्षमा, सत्य, दया, दान इत्यादी गुणांची जोपासना करायची असते. व्रत आचरताना स्नान करणे, मर्यादित अन्न घेणे, मद्यपान व मांसभक्षण निषेध इत्यादी आचार आणि काही पथ्ये तर सांगितलेले असतातच. पण त्या शिवाय असहाय, अनाथ, अपंग, संकटग्रस्त लोकांना अन्नदान असेही सांगितलेले आहे. ही व्रते म्हणजे उपासनाच आहे..
उपासना
उपासना हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. कोणी, कशी, कधी कोणाची उपासना करायची ह्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेला कदाचित हा एकमेव धर्म असेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या रुचीनुसार, उपलब्ध असलेल्या साधन आणि वेळात उपासना करू शकते. संतमाहात्मे आचरतात ती उपासना सामान्य जणांसाठी आदर्श असली तरी नेहमी शक्य असतेच असे नाही. तेव्हा सामान्य जण स्थलकालसापेक्ष अशी उपासना आचरतात.
स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पैसा, प्रतिष्ठा, सुख ह्यांच्या पलीकडे जाऊन आत्मसाक्षात्कारासाठी उपासना करावी असे हिंदू धर्म मानतो. उपासनेला कर्म आणि ज्ञान ह्यांच्यामधील सेतू मानलेले आहे. उपासना श्रद्धा जागवते तसेच शास्त्र समजून घेण्याची प्रेरणा देखील जागवते.
कर्म, उपासना आणि ज्ञान हे आपल्या धर्माचे तीन प्रमुख स्तंभ मानले आहेत. शुद्ध कर्म आपल्याला कोणताही दंभ नसलेल्या उपासनेचा मार्ग दाखवते.
उपासना सामूहिक असेल तर त्या निमित्ताने एक संघटित शक्ती निर्माण होते. एकात्मतेचा अनुभव येतो. सर्वानाच आनंद आणि उत्साह मिळतो. ह्या सामूहिक शक्तीचा उपयोग अर्थातच चांगल्या कामासाठी करायचा अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे.
मत्स्य जयंती- व्रत आणि बरेच काही
पूजा, उपास, दानधर्म त्या निमित्ताने एकत्र येणे हे होतेच. सामूहिक शक्तीचा अविष्कार पडतो. सर्वाना आनंद मिळतो हे तर मत्स्य जयंतीला होईलच. पण मत्स्य जयंतीच्या व्रताच्या आणि उत्सवाच्या विषयी बोलायचे तर आजच्या काळाला अनुसरून आपण त्यात भर घालू शकतो. एक सामाजिक उत्सव म्हणून देखील साजरा करू शकतो. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता असेल, सागरी सीमेची सुरक्षा असेल, मत्स्य पालन आणि संवर्धन असेल, कितीतरी चांगल्या गोष्टी ह्या निमित्ताने होऊ शकतील.
राष्ट्राय स्वाहा
शेवटी जे काही आपण करणार ते राष्ट्राय स्वाहा अशीच आपली भावना असते ना?
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, “पूर्वपरंपरा, मातृभूमी आणि भाषा यांच्या अभिमानाने एकरूप झालेला समाज म्हणजे राष्ट्र होय. या राष्ट्राविषयी मनात असलेली निष्ठा, त्याच्या यशासाठी केले जाणारे आपले सर्वतोपरी प्रयत्न, राष्ट्राविषयी मनात असलेला सेवाभाव म्हणजे राष्ट्रभक्ती. राष्ट्रासाठी तन-मन धनाच्या माध्यमातून केलेली पूजा ही राष्ट्रभक्ती आचरणे ही देखील आचरण्याजोगी उत्तमातील उत्तम उपासना आहे. या उपासनेचे फल आहे अखंड, अक्षय, निर्व्याज अशी आनंदप्राप्ती, पूर्वजांच्या ऋणातून अंशतः मुक्ती आणि पुढील अनंत पिढ्यांची तृप्ती.”
लेखिका: वृंदा टिळक, ठाणे.
संदर्भ :-
- भक्तिकोश – चतुर्थ खंड भारतीय उपासना – डॉ. शंकर अभ्यंकर.
- मत्स्य पुराण प्र. न. जोशी
- मत्स्य पुराण का.अ. जोशी/ पां. रा. ढमढेरे.
- विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in/