News
गुढी पाडवा – फक्त मराठी नव्हे, सकल हिंदू समाजाचे नववर्ष
- चैत्र शु. १ म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढी पाडवा म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. माध्यमे व वृत्तपत्रांत याचा उल्लेख सर्रास मराठी नववर्ष असा केला जात आहे. महाराष्ट्रात या सणाचे आगळे महत्त्व आहे, पण म्हणून हा काही “फक्त” मराठी जनांचा सण नव्हे, तर तो हिंदूंचा सण आहे. अखिल हिंदू समाजाचा सण असेच त्याचे स्वरूप आहे.
- चैत्र शु. १ म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा दिवस म्हणून संपूर्ण भारतात महत्वाचा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने याच शकाची (किंवा कालगणनेची) विशेष महती आहे. इ. स. ५०० नंतर संस्कृतात लिहिलेल्या ज्योतिषविषयक सर्व ग्रंथांमध्ये शक संवत् किंवा शक संवत्सर हाच उल्लेख आढळतो. हा काळ महाराष्ट्राच्या ज्ञात संस्कृतीपेक्षा निश्चितच जुना आहे. त्याचीही व्याप्तीही मोठी आहे.
- हिंदू संस्कृतीतील अनेक पवित्र गोष्टी चैत्र प्रतिपदेला घडल्या आहेत. म्हणून हाच शक रूढ झाला. याच काळात वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे अनेक उत्सव या नूतन वर्षारंभीच्या दिवसापासून सुरू होतात. हिंदूंच्या पवित्र साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मानण्यात आला आहे.
- या दिवशी सर्व कुटुंबवत्सल लोक आपल्या घरासमोर गुढ्या व तोरणे उभारतात. मंगलस्नानादि विधि आटोपल्यावर कडुलिंबाचीं पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांच्यासह भक्षण करण्याचा प्रघात आहे. यामुळे आरोग्य, बल बुद्धि व तेजस्विता यांची प्राप्ती होते असे आयुर्वेदात म्हटले आहे. या सर्व गोष्टी संपूर्ण हिंदू समाजाशी संबंधित आहेत, केवळ मराठी जनांशी नव्हे.
- सातवाहन हे कुलनाम असलेल्या ३० राजांनी आंध्र देशात राज्य करून इतरत्र राज्यविस्तार केला. त्यांच्यापैकी नक्की कोणत्या सातवाहनाने कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चित सांगता येत नाही. इतकेच नाही तर ही कालगणना कोणी, केव्हा व कशी सुरू केली, त्याचा शक राजे किंवा शालिवाहन यांच्याशी केव्हा आणि कसा संबंध जोडला गेला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
- शक संवत् असा उल्लेख असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ हा चालुक्य वल्लभेश्वराचा असून त्याची तिथी ४६५ शक संवत् (इ. स. सुमारे ५४३) आहे. प्राचीन राजांपैकी बदामीच्या चालुक्यांच्या लेखांत
शकानामपि भूभुंजा समासु’ व
शकनृपतिराज्याभिषेकसंवत्सरेषु’ असे उल्लेख आहेत. हे लेख शके ५५६ व ५०० या काळातील आहेत. त्याच्याही आधीच्या त्यांच्याच एका लेखात शकवर्ष असा उल्लेख आहे. - वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिका आणि बृहत्संहिता या ग्रंथांत ४२७ शककाल असा उल्लेख आहे. मात्र बृहत्संहिता या ग्रंथात शकेन्द्रकाल या शक-भूपकाल असाही उल्लेख आहे. राजा विक्रमादित्यांनी जेव्हा शक राजाला मारले तेव्हापासून ही कालगणना सुरू झाली, असे बृहत्संहितेवरील टीकेत (इ. स. सुमारे ९६६) उत्पल मुनी म्हणतात. या सर्व गोष्टी मराठी जनांसोबतच महाराष्ट्राबाहेरील हिंदू समाजाशी संबंधित आहेत.
- कुशाणवंशीय कनिष्क, हुविष्क व वासुदेव हे महापराक्रमी राजे होते. त्यांचे अनुक्रमे ३ ते २४, २८ ते ६० व ७४ ते ९८ पर्यंत काळाचा उल्लेख असणारे लेख सापडले आहेत. या तिघांपैकी कनिष्क हा महाप्रतापी राजा असून त्याच्याच लेखांत सर्वांत प्राचीन काळाचे उल्लेख आहेत. त्यामुळे कालगणना कनिष्कानेच सुरू केली असावी, असे मराठी विश्वकोशात म्हटले आहे. कनिष्क हा निश्चितच मराठी राजा नव्हता. मग गुढी पाडव्याला मराठी नववर्ष कसे बरे सुरू होईल.
- सातवाहन वंशातील एखाद्या राजाने शकावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू आला असावा, अशी लोकधारणा आहे. सातवाहन राजे हे आंध्र राजघराण्यातील. सध्या आंध्र प्रदेशातील अमरावती जिल्ह्यात असलेले धरणीकोट (प्राचीन नाव धान्यकटकम) ही सातवाहनांची मूळ राजधानी. मात्र गौतमीपुत्र व शतकर्णी (सातकर्णी) आणि पुलुयामी यांनी महाराष्ट्रात आपले राज्य स्थापन करून पैठण ही राजधानी निश्चित केली. याच सातवाहनाचे अपभ्रष्ट रूप म्हणजे शालिवाहन हे होय. इ. पू. २३० ते इ. स. २२७ म्हणजे जवळपास ५०० वर्षे या घराण्यांतील राजांनी सत्ता गाजविली. गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या मुखाजवळ त्यांचे वसतिस्थान होते. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होत असलेले वर्ष हे मराठी जनांसोबतच संपूर्ण हिंदूंचेही नववर्ष आहे.
- शालिवाहन शक हा कलियुगाची ३,१७९ वर्षे झाल्यानंतर सुरू झाला, असे मानले जाते. केरळ व तमिळनाडूचा काही भाग वगळला तर संपूर्ण दक्षिण भारतात आणि काही ठिकाणी उत्तरेतही ही कालगणना चालते. एवढेच नव्हे तर कंबोडियामध्येही ही कालगणना प्रचलित आहे. जावा (इंडोनेशिया) येथील न्यायालयांमध्ये काही शतकांपूर्वीपर्यंत हीच कालगणना मान्य होती.
- सध्याच्या शक वर्षात ७८ मिळविले म्हणजे इसवी सन येतो आणि १३५ मिळविले म्हणजे विक्रम संवत येतो. दक्षिणेतील शिलालेख-ताम्रपट, पोथ्या-पुस्तके व कागदपत्र यांत सामान्यपणे याच वर्षाचा निर्देश आढळतो. एवढेच नव्हे तर पंचांगे तयार करणारे ज्योतिषी, करणग्रंथांत मुख्यतः याच्याच पायावर ग्रहगणिताची उभारणी करीत असल्याने, आपल्या पंचांगांत याचा उपयोग करतात.
- अशा रितीने उगम अज्ञात असला तरी या कालगणनेने भारतासह जगाच्या काही भागांवर प्रभाव टाकला आहे, हे दिसून येते. चैत्राचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा ही गुढी पाडवा म्हणून आपण साजरी करून नववर्षाचे स्वागत करतो. सनातन भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारीच ही घटना होय.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुढी पाडवा हा जर मराठी नववर्षाचा सण असेल तर ख्रिश्चन, मुस्लिम, यहुदी इत्यादी धर्मीय मराठीभाषकांनीही तो उत्साहाने साजरा करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. गुढी पाडव्याला ज्या शोभायात्रा निघतात किंवा जे कार्यक्रम होतात, त्यांमध्ये प्रामुख्याने हिंदूंचाच सहभाग असतो. याचाच अर्थ गुढी पाडवा हा सण मराठी जनांच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी तो मराठी नव्हे त हिंदू नववर्षाचाच आरंभ होय.