अलौकिक आद्य शंकराचार्य
विस्मृतीत गेलेल्या वेदांताला (advaita vedanta) भारतीय समाजजीवनाच्या केंद्रस्थानी आणण्याचे क्रांतिकारी कार्य आद्य शंकराचार्य यांनी केले. त्याला विरोध करणाऱ्या तत्कालीन धर्म मार्तंडांना शास्त्राच्या अनेक कसोट्यांवर नम्रपणे पराभूत करून त्यांनी वेदांताचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. देशाच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना करून हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान सूर्य चंद्र असेपर्यंत प्रवाही राहील अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आचार्यांनी कालातीत कार्य केले. आद्य शंकराचार्य जयंती निमित्त त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा आढावा या लेखात घेतला आहे.
‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रमणारे. अध्यात्मरुपी तेजाच्या ज्ञानरूपी प्रकाशात रमणारे लोक जेथे राहतात ती भूमी म्हणजे भारत. परंतु कालचक्राच्या ओघात या अध्यात्म सूर्याला ग्रहण लागून संपूर्ण देश अज्ञानाच्या अंध:कारात बुडाला होता. नीती आणि धर्म याला कोणीही वाली उरला नव्हता. ‘जाहला मतमतांचा गलबला येक येकासी मानेना.’ अशी परिस्थिती झाली होती हा काळ इ.स.पूर्व सहा ते इ.स. पूर्व आठ असा असावा. भगवद्गीतेचा संदेश समाजमनाच्या पटलावरून विस्मृतीत गेला होता. बुद्धदेवांनंतर महायान पंथ थेरावादापासून विभागला गेला होता. त्यामध्येही पुष्कळ उपपंथ तयार झाले होते. नीती मूल्यांची घसरण सर्वत्र झाली होती. त्यात भर म्हणून बुद्धीजम मध्ये तंत्रमार्ग, वज्रयान, सहजयान मंत्रयान, कालचक्रयान याची भर पडली होती.
सनातन वैदिक धर्मातही अनागोंदी माजली होती. वेदांतामधील समत्वाचा विसर पडला होता. आस्तिक शास्त्रांमधील सांख्य,योग आणि न्याय वैशेषिशंक श्रुतींचा नाममात्र आधार घेत स्वतःच्या तर्काला अनुकूल अशा स्वतंत्र विचार पद्धतीचा प्रसार करत होते. वेदांमधील कर्मकांडाचा भाग घेऊन पृथ्वी आणि स्वर्गातील भोगाना अंतिम म्हणून त्यानुसारच पूर्व मीमांसक आपल्या उपासना पद्धती चालवत होते. बुद्धांच्या अनुयायांचा वैचारिक गोंधळ, टोकाचा त्याग, पाखंडी लोकांचा स्वैराचार, वेदांता मधील अभ्युदय आणि निःश्रेयस यातील ओढाताण या गदारोळात सर्वसामान्य माणूस ‘मम धर्मस्य क:’ अशा प्रश्नात सापडला होता.
धर्म आणि तत्त्वज्ञान या बाबतीत संपूर्ण देशभरात जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर आद्य शंकराचार्य यांचा जन्म झाला. केरळ मधील ए्र्नाकुलम जिल्ह्यात कालडी गावामध्ये आर्यांबा व शिवगुरु या दाम्पत्याच्या पोटी एक बालक जन्माला आले. वैशाख शुद्ध पंचमी हा तो दिवस होता. शंकर असे या बालकाचे नाव निश्चित करण्यात आले. हा बालक अत्यंत तेजस्वी आणि कुशाग्र होता. गावातील पाठशाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यावर वेदाभ्यासासाठी कुमार शंकराला गुरुकुलात पाठवण्यात आले. गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यावर सोळा वर्षाचा शंकर पुन्हा आपल्या घरी परतला.
शंकरने विवाह करून गृहस्थाश्रमाचे पालन करावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र संन्यास घेऊन वेदांताचा, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करावा अशी मनीषा शंकर यांच्या मनामध्ये दृढ होती. अखेर आईने संमती दिल्यावर शंकर यांनी संन्यास घेतला आणि ते गावाबाहेर पडले. काही काळ त्यांनी केशवदेवांच्या आश्रमात राहून व्याकरणाचा अभ्यास केला. तिथून ते नर्मदा काठावर गेले. त्याकाळी नर्मदेच्या पर्वतराजीमध्ये अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. यामध्ये यतिराज गोविंदपाद देखील होते. त्यांच्याकडून योगाभ्यास शिकण्याची शंकर यांची इच्छा होती. एका गुहेमध्ये गोविंदपाद अनेक वर्षापासून तपश्चर्या करत होते. शंकर यांनी या गुहेमध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि तेथे सुललित स्तोत्र गायन केले. यावेळी गोविंदपाद समाधी अवस्थेतून बाहेर आले. त्यांनी पुढील काही वर्षे शंकर यांना योग विद्या शिकवली. त्यानंतर त्यांनी शंकर यांना काशीला जाण्याची आज्ञा केली. गोविंदपाद पुन्हा समाधी अवस्थेत गेले आणि त्यांनी देह त्याग केला.
काही संन्यासी शिष्यांना घेऊन शंकर काशीमध्ये आले. आता ते आचार्य शंकर या नावाने ओळखले जाऊ लागले. काशीमध्ये त्यांनी अनेक पंडित धर्म मार्तंड यांच्याशी वेदांतावर चर्चा केली. आचार्य शंकर यांची बुद्धिमत्ता, ज्ञान यामुळे अल्पावधीत त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. एके दिवशी नदी घाटावरून येताना आचार्यांना समोरून एक चांडाळ येताना दिसला. त्यांनी त्या चांडळला बाजूला जाण्यास सांगितले. यावेळी चांडाळ म्हणाला, बाजूला काय जावे ? देह की आत्मा. संस्कृत मध्ये त्याने आचार्यांशी आत्मा, देह, ब्रह्मतत्त्व याविषयी संवाद साधला. आचार्यांनी वाकून त्या चांडाळला नमस्कार केला. मात्र वर पाहताच तो चांडाळ नाहीसा झाला होता. या प्रसंगातून ईश्वरी संकेत आल्याचे आचार्यांना जाणवले. आपल्या शिष्यांसह बद्रिकाश्रमात जाऊन ब्रह्मसुत्रावरील भाषेचे लेखन करायचे असे त्यांनी ठरवले आणि एका शुभ दिनी काशीतून प्रस्थान केले.
ऋषिकेश येथे राहुन आचार्य शंकरांनी ब्रह्मसुत्रावरील भाषण लिहिले. तेथून ते काश्मीरमध्ये गेले. त्यांच्या या भ्रमण मार्गात त्यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. दुभंगलेल्या मूर्ती बदलल्या. गावातील लोकांना पूजा विधीचे ज्ञान दिले. देशोदेशीच्या धर्म मार्तंड यांची चर्चा करून वेदांताच्या चर्चेत त्यांचा पराभव केला.
अद्वैत हेच सत्य आहे, हे श्रीशंकराचार्यांनी सिद्ध केले; म्हणजे, ”सर्वव्यापी, निर्गुण, निराकार ब्रम्ह सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे. त्याच्या शक्तीने मायामय जगत उत्पन्न झाले आहे, जीवात्मा हा त्या ब्रम्हाचा अंश आहे आणि खरे ज्ञान झाल्यावर जीवात्मा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो.” हाच त्याचा अर्थ एका संस्कृत श्लोकार्धात श्रीशंकराचार्यांनी सांगितला.
” ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः l ”
मध्यार्जुनाच्या शिवमंदिरात भर सभेत श्रीशंकराचार्यांनी हा सिद्धांत मांडला. ‘अद्वैत (advaita vedanta) हेच सत्य आहे.’ असे त्यांनी सांगितले त्यावेळी लोकांची खात्री पटली. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला.
महिष्मती नगरातील आचार्य मंडनमिश्र यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैनासु्द्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. मंडनमिश्राचा पराभव होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी शारदादेवी शंकराचार्यांना म्हणाली, की आपण माझ्या अर्ध्या अंगाचा पराभव केला आहे. माझा पराभव करून दाखवा तर तुम्ही खरे विजेते ठराल. अखेर आचार्यांनी शारदा देवीचा देखील पराभव केला. त्यानंतर मंडनमिश्र यांनी आचार्य शंकर यांची भूमिका मान्य केली.
सर्वत्र प्रवास करून त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. त्यांचे तत्त्वज्ञान हे भौतिक सुखदुःखाच्या कल्पनेपलीकडे असलेल्या आनंदाचा ठेवा आहे. आपले कार्य अखंडित चालू राहावे म्हणून पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथपुरी, उत्तरेस बद्रीकेदार व दक्षिणेस शृंगेरी येथे त्यांनी केवलअद्वैत तत्वज्ञानाची पीठे स्थापन केली. पंचायतन-पूजा श्रीशंकराचार्यांनी सुरु केली. आचार्यांनी शिव, विष्णू, चंडी, सूर्य इ. देवतांना उद्देशून ‘दक्षिणामूर्ती’, ‘हरिमीडे’, ‘आनंदलहरी’, ‘सौंदर्यलहरी’ इ. स्तोत्रे रचली. ‘शिवापराधक्षमापन स्तोत्र’, ‘शिवभुजंगम स्तोत्र’, ‘भवान्यष्टक’, ‘देव्यपराधक्षमापन स्तोत्र’, ‘देवीभुजंगम स्तोत्र’ अशी कितीतरी सुरेख, प्रासादिक, दीर्घ शिव-शक्ती स्तोत्रे त्यांनी रचली.
आचार्यांचे महत्तम जीवनकार्य
सर्व शास्त्रे, धर्मग्रंथ, संत, अवतार यांचे जीवनकार्य म्हणजे सुखाचा शोध घेणाऱ्या जीवांना सुखाची प्राप्ती करून देणे. त्यासाठी प्रथम सुखाची ओळख करून द्यावी लागते म्हणजेच नेमके सुख म्हणजे काय आणि ते कसे प्राप्त होईल ? याचा शाश्वत मार्ग सांगणे. आचार्यांनी वेदान्ताने प्रतिपादित केलेला सुखाचा शाश्वत मार्ग सर्व मानवजातीकरता मोकळा करून दिला. मानवाचे खरे स्वरूप आनंदच आहे परन्तु त्याची विस्मृती त्याला झाली आहे. जसे की एखादा मनुष्य आपला लौकिक धनाचा ठेवा घरातच विसरतो आणि इतरत्र त्याचा शोध घेत रहातो. तशीच परिस्थिती मानवाची झाली आहे. आणि हे धन प्राप्त करण्याचा एकच मार्ग म्हणजे त्याला ते धन जेथे आहे तेथे घेऊन जाण्यासाठी ‘स्मृती’ किंवा ‘आठवण’ करून देणे. आणि यासाठी साधन आहे ‘ज्ञान’ आणि ‘विचार’. योग्य रितीने केलेला विचार या आनंदाचे ज्ञान करून देतो नव्हे नव्हे माणसाला कायमचा आनंदी बनवतो. त्यायोगे मनुष्य ‘आनंदाच्या प्राप्तीसाठी’ कर्म न करता ‘आनंदी होऊन’ या जगात रहातो. हे उपनिषदांचे सार आचार्यांनी आपल्या भाष्यांतून जगापुढे मांडले. हेच त्यांचे खरे जीवनकार्य होय.
लेखक :- श्री.सुहास लिमये (संत साहित्याचे अभ्यासक)