साईनाथ (sainath) नरोटे हत्या प्रकरणातील सूत्रधार कुख्यात माओवादी कमांडर बिटलू मडावी( bitlu madavi) याचा गडचिरोली(gadchiroli) पोलिसांच्या C 60 कमांडो पथकाने खात्मा केला असून यासोबतच इतर दोन जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पेरमीली दलम कमांडर कुख्यात नक्षलवादी(naxalwadi) बिटलू मडावीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाला यश आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये पेरमीली दलम कमांडर कुख्यात बिटलू मडावी याच्यासह व्हीसी वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला.
काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची(mpsc) तयारी करणाऱ्या रा.मर्दहूर तालुका भामरागड येथील साईनाथ नरोटे या तरुणाच्या हत्याप्रकरणात बिटलू मुख्य आरोपी होता. तर वासू याची नुकतीच डीव्हीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ तारखेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जनजातीय युवकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.साईनाथ हा एक गरीब होतकरु विद्यार्थी होता व तो मागच्या तीन वर्षापासून गडचिरोली येथेच राहुन शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित लिपीक, तलाठी, पोलीस भरती तसेच अन्य स्पर्धा परीक्षेची तो तयारी करीत होता.
सध्या नक्षलवाद हा गडचिरोली जिल्ह्यातील ठराविक, अतिदुर्गम भागापुरता मर्यादीत राहीला असून सदर भागातील तरुणांनाच ते मुद्दाम लक्ष करत आहेत, नक्षलवादी हे एखाद्या निरपराध व्यक्तींची हत्या करुन परीसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते आदीवासी जनतेची दिशाभुल करुन स्वतःचा हेतु साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात.असाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी जनजातीय तरुण साईनाथ चैतु नरोटी हा पोलीसांचा खब-या म्हणुन काम करीत आहे म्हणून हत्या करून केला आहे.
साईनाथ नरोटे या तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये १६ मार्चला देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडवे मुरा गावडे या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.साईनाथ ची सर्व माहिती नक्षलवाद्यांना देण्याचे काम देविदास गावडे यांनी केले होते. सदर घटनेपूर्वी तो लोकांना साईनाथ बाबत गावात विचारपुस करीत होता .तसेच त्यांनी हत्येच्या दिवशी नक्षलवाद्यासोबत हजर राहून गुन्ह्यात सहकार्य केले आहे.
काल साईनाथ नरोटे हत्येतील मुख्य सूत्रधार असलेला कुख्यात माओवादी कमांडर बिटलू मडावी याला गडचिरोली पोलिसाच्या C 60 कमांडो पथकातील जवानांनी यमसदनी धाडले आहे.
गडचिरोली पोलिस प्रशासनाचे यासाठी कौतुकच आहे.पण यामध्ये साईनाथ नरोटे तरुणाच्या पिडीत कुटुंबाला सरकार तर्फे तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी.
गडचिरोली जिल्ह्यातील गरीब जनजातीय बांधवांची नक्षलवाद्यांनकडून हत्या केली जाते तेव्हा या भागातील विविध राजकीय पक्षांचे नेते व येथे कार्यरत असलेल्या विविध एनजीओ दुर्दैवी हत्येची घटना घडते त्यावेळी किंवा नंतर पण नक्षलवाद्यांच्या विरोधात साधं निषेध व्यक्त करत नाहीत की त्या पिडीत कुटुंबीयांची भेट पण घेत नाहीत.
लेखक :- अशोक तिडके.