प.पू.गुरूदेव श्री स्वामी चिन्मयानंद जयंती !
आज परम पूज्य गुरूदेव,विश्व हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी चिन्मयानंदजींचा( swami chinmayananda) जन्मदिन !
स्वामी चिन्मयानंद हे बालवयांत अत्यंत मेधावी (बुद्धिमान्) विद्यार्थी होते. तरुणपणांत काही काळ त्यांनी पत्रकारिताही केल्याचे त्यांच्या चरित्रांतून वाचावयास मिळते. पुढील आयुष्यांत, मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश्य काय? या आणि आध्यात्मिक ज्ञानप्राप्तिच्या प्रबल जिज्ञासेतून त्यांनी हिमालयांत असे ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या शोधार्थ भ्रमण केले आणि तिथे स्वामी तपोवनजी यांचे शिष्यत्व स्वीकारून, सेवा आणि साधनारत होऊन ज्ञानसंपादन केले. पुढे त्यांनी संन्यासदीक्षा घेऊन त्या अर्जित ज्ञानाचे, लोकहितार्थ वितरण करण्यासाठी चिन्मय मिशन ही आध्यात्मिक ज्ञानप्रदायी संस्था स्थापन करून १९५२ ते १९९४ पर्यंत शेंकडों (कदाचित् हजारो !) ज्ञानवर्ग घेऊन लाखों लोकांना वेदांतातील, उपनिषदांतील आध्यात्मिक ज्ञानप्रकाश दाखवून प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला !
गुरूदेवांची प्रवचने इंग्लिश मधून होत असत. गुरूदेवांच्या वचनांचा अर्थ थोडा-फार लागेपर्यंत, त्यांचे पुढचे प्रतिपादन झालेले असायचे ; एवढा त्यांच्या प्रवचनाचा ओघ असायचा ! परम पूज्य गुरूदेवांनी, महाराष्ट्रांत प.पू.स्वामी पुरूषोत्तमानंद, प.पू.स्वामी तेजोमयानंद, कर्नाटकांत स्वामी ब्रह्मानंद, हिमाचल प्रांतात कार्यरत असलेले स्वामी सुबोधानंद यांसारख्या शिष्योत्तमांद्वारें या ज्ञानगंगेचा प्रवाह मराठी आणि हिंदी व अन्य भाषांमधुनही अधिक विस्तारला आणि त्यायोगें गेल्या ३०/४० वर्षांत लक्ष लक्ष जनसमूह गीतेतील ज्ञानप्राप्तिने पावन झाला !
प.पू.श्री.गुरूदेव या ज्ञानसत्रांना गीता ज्ञानयज्ञ असे संबोधत ! यांतूनच त्यांची या कार्यामागील प्रगल्भ दृष्टी दिसून येते ! आपल्या प्राचीन यज्ञसंस्कृतिचेही स्मरण किती आवश्यक आहे,त्याचेही सूचन या “ज्ञानयज्ञ” शब्दप्रयोगांतून आपोआप साध्य होते ! आज चिन्मय मिशनचा देश-विदेशांतील विस्तार पाहिल्यावर प.पू.श्री.स्वामी चिन्मयानंदांच्या विशाल कार्यकर्तृत्वापुढे आपण सहजच नतमस्तक होतो !
स्वामी चिन्मयानंदाची मूर्ति डोळ्यांसमोर आठवतांच, जणूं वेदव्यासांचाच पुनः आविर्भाव होऊन गेल्यासारखे वाटते ! किंवा स्वामी विवेकानंदच त्यांच्या रूपाने पुनः भारतीयांना कालसुसंगत मार्गदर्शन करून गेले असावेत की काय, असे वाटते ! त्यांच्या पुण्यप्रद आठवणींनी, चिंता-भीती दूर पळतात आणि मनाला नवा उत्साह प्राप्त होतो !!
लहानपणीं आईबाबांसमवेत चिन्मय मिशनच्या अनेक कार्यक्रमांत उपस्थित रहाण्याचा योग आला, त्याचाही संस्कार मनावर झाला, हे निश्चित !
प.पू.स्वामी चिन्मयानंदांना माझ्या वयाच्या १६ ते २३ या वर्षांत अगदी जवळून बघतां आले, त्यांची प्रवचने (कळण्याचे ते जरी वय नसले, तरी) ऐकतां आली, हा आयुष्यांतला अमृतयोगच म्हणायचा !
ॐ ज्ञानदात्रे नमः |
ॐ आंग्लभाषाविदुत्तमाय नमः |
ॐ तपोवन शिष्याय नमः |
ॐ श्री चिन्मय सद्गुरवे नमः |
लेखक:- नरेन्द्र मनोहर नवरे, मुलुंड, मुंबई.