
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,(Rashtriya Swayamsevak Sangh) संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूर रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन(hedgewar smruti mandir) परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आज सकाळी झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी मा. रामदत्तजी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले.
देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना मा. रामदत्तजी म्हणाले,‘कष्टातही आनंदाच्या अनुभूतीला साधना म्हणतात. संघ शिक्षा वर्ग या प्रकारच्या अनुभूतीची साधना आहे. ज्याप्रकारे शेतकरी स्वत:च्या शेतात बीजारोपण करतो, त्याचप्रमाणे संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करण्यात येते. रेशीमबागची ही पवित्र भूमी डॉ. हेडगेवार आणि गुरुजी गोळवलकर यांची तपोभूमी आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी इतर प्रांतातून आलेल्या किमान दोन स्वयंसेवकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायला हवेत. त्यांच्या प्रांतातील समस्यांची माहिती करून घ्यावी.

स्वयंसेवकांनी समाजातील प्रश्नांची चर्चा करणारे होण्याऐवजी समाधान शोधणारे व्हायला हवे. संघ शिक्षा वर्गात राहत असताना संघाच्या स्वभावालादेखील समजावे लागेल. स्वत:चे वैयक्तिक मत संघमतात विलीन करणे शिकावे लागेल; हाच संघटनाचा गुणधर्म आहे. स्वयंसेवकांनी समाजात कार्य करताना अग्रेसर होत नेतृत्व करणारे बनावे लागेल. लवकरच संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, या पार्श्वभूमीवर संघ शिक्षा वर्गात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांनी येत्या दिवसांत कार्यविस्तारा संदर्भात आपली भूमिका काय असावी, याबाबत विचार करायला हवा. संघ आणि समाजाचे विचार एकरूप होईस्तोवर आपल्याला कार्यरत राहावे लागणार आहे.’ याप्रसंगी सहसरकार्यवाह मुकुंदजी, अवध प्रांत संघचालक तसेच वर्ग सर्वाधिकारी कृष्ण मोहन जी उपस्थित होते.

यंदाच्या वर्गात एकूण ६८२ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. वर्गाचे पथसंचलन २१ मे २०२३ रोजी सायंकाळी होईल. तर वर्गाचा समारोप १ जून २०२३ रोजी होणार आहे.
रा. स्व. संघ, संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्ष अधिकारी परिचय
पालक अधिकारी – श्री रामदत्तजी, सह सरकार्यवाह
मा. सर्वाधिकारी – मा. कृष्ण्मोहनजी, प्रांत संघचालक, अवध प्रांत
वर्ग कार्यवाह – श्री. एन. तिप्पे स्वामीजी, कार्यवाह, दक्षिण मध्य क्षेत्र
मुख्य शिक्षक – श्री. ए. सी. प्रभूजी, शा. प्रमुख, द तामिळनाडू प्रांत
सह मुख्य शिक्षक – श्री. अतुल देशपांडेजी, प्रचारक, गुवाहाटी विभाग
बौद्धिक प्रमुख – श्री. नरेंद्र शर्माजी, शारीरिक प्रमुख, पंजाब प्रांत
सहबौद्धिक प्रमुख – श्री. उदय शेवडेजी, बौद्धिक शिक्षण प्रमुख, कोकण प्रांत
सेवा प्रमुख – श्री. शिवलहरीजी, क्षेत्र सेवा प्रमुख, राजस्थान क्षेत्र
व्यवस्था प्रमुख – श्री. भालचंद्र किटकरू, सहकार्यवाह, अजनी भाग (नागपूर)
सह व्यवस्था प्रमुख – श्री. नरेंद्र बोकडेजी, व्यवस्था प्रमुख,लालगंज भाग (नागपूर)