शस्त्राघाता शस्त्रच उत्तर…

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे…
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे…
भारताच्या सैन्य इतिहासाचा विचार करता, माडगूळकरांची वर उल्लेख केलेल्या दोन ओळी अतिशय समर्पक ठराव्या. भारतीय सैन्याने युद्धकौशल्य आणि नीतिमत्तेचा मेळ घालून नेहमीच प्राणपणाला लावून भारतमातेचे संरक्षण केले आहे.
भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून मिग २९ के (MiG २९K) या विमानाने रात्रीच्या किर्र अंधारात आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) लँडिंग करुन इतिहास रचला आहे. भारतीय नौदलाने या विमानाच्या रात्रीच्या लँडिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचं भारतीय नौदलाने स्पष्ट केलं आहे.
रात्रीच्या वेळी विमानवाहू जहाजावर विमान उतरवणे नौदलासाठी आव्हानात्मक मानले जाते. कारण विमानवाहू वाहक ४०-५० किमी/ताशी वेगाने पुढे जात असते आणि वैमानिकांना जेटच्या वेगाशी ताळमेळ राखणे अत्यंत आवश्यक असते.
यापूर्वी देखील तेजस विमानाने आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरण्याची कामगिरी केली होती, मात्र तेजस विमानाचं लँडिंग हे दिवसा करण्यात आलं होतं. याशिवाय याचवर्षी २८ मार्च रोजी कामोव-३१ हेलिकॉप्टरही रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर उतरवण्यात भारतीय नौदलाला यश आले होते.
मिग-२९ के लँडिंगबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आयएनएस विक्रांतवर मिग-२९ के पहिल्या रात्रीच्या लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी भारतीय नौदलाचे अभिनंदन करतो. ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विक्रांत क्रू आणि नौदलाच्या वैमानिकांच्या कौशल्य, दृढता आणि व्यावसायिकतेची साक्ष आहे.”
INS विक्रांत पहिली स्वदेशी विमानवाहू नौका :-

INS विक्रांत ही भारतात बांधलेली, स्वदेशी पहिली विमानवाहू नौका आहे. ही नौका केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (cochin shipyard ltd-CSL) मध्ये बांधण्यात आली होती. या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव भारतातील पहिल्या विमानवाहू वाहक INS विक्रांतच्या नावावरून ठेवण्यात आले. ४५,०००टनाची INS विक्रांत २०,००० कोटी रुपये खर्चून बांधली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ती नौदलात सामील झाली होती.
MiG-29K विमानाची वैशिष्ट्ये:-
MiG-29K हे चौथ्या पिढीचे हायटेक विमान आहे जे नौदलाच्या हवाई संरक्षण मोहिमेत अतिशय प्रभावी आहे. MiG-29K जेट हे INS विक्रांतच्या फायटर फ्लीटचा भाग आहे. MiG 29K लढाऊ विमान हे अत्याधुनिक विमान आहे, जे कोणत्याही हवामानात उडू शकते. ते आवाजाच्या दुप्पट वेगाने (ताशी 2000 किमी) उडू शकते. ते स्वतःच्या वजनापेक्षा आठपट जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहे. ६५,०००फूट उंचीवर ते उडू शकते.
MiG-29K हे अतिशय बलाढय़ लढाऊ विमान आहे. यात अत्याधुनिक विमानवेधी, जहाजवेधी क्षेपणास्त्रे, अचूक लक्ष्यभेद करणारे बॉम्ब आणि आधुनिक प्रणालीसह इतर शस्त्रास्त्रे आहेत.
मिग-२९ या विमानाची शस्त्रात्र वाहक क्षमता अपग्रेड केल्यानंतर आता दुप्पट झाली आहे. हवेत इंधन भरणे, हवेतून जमिनीवर लक्ष्य भेदणे, विमानाचा दर्शनी भाग, डिजिटल ऑडिओ अशा विविध प्रकारच्या सुधारणा या विमानात करण्यात आल्या आहेत.
‘आत्मनिर्भर भारता’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानास यशस्वी करण्यासाठी लष्कराने नेहमीच साथ दिली आहे. लष्कराच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त ऑर्डर्स या भारतीय कंपन्यांना देण्यात येतात. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणे सहज शक्य आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (hindustan aeronautics limited) १९४२ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय हवाई दल तसेच लष्कर आणि नौदलासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि एव्हीओनिक्सचे उत्पादन, डिझाइन आणि निर्मितीबरोबरच भारतीय लष्करी विमानांसाठी ओव्हरहॉलिंग, अपग्रेडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच अतिरिक्त पुरवठा अविरतपणे करत आहे.हेलिकॉप्टर निर्मितीच्या क्षेत्रात, एचएएलने सुरुवातीला चेतक, चिता, लान्सर, चीतल आणि चेतन अशा हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि पुरवठा तर केलाच, त्याबरोबरीने नंतर त्यांच्या प्रगत आवृत्यांवरही काम केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ची निर्मिती, जे तिन्ही सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले गेले.
भारतीय उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, सैन्य सामग्री आयात करणारा देश अशी ओळख पुसून काढत सैन्य सामग्री उत्पादक देश व निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण होतेय. तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप, इनोव्हेशन या गोष्टींच्या बळावर भारत आत्मनिर्भर होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रगती करत आहे.
राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपविता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशात संशोधन व विकास याला चालना मिळत असून, लष्करात देखील त्यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशील लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदी क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे.

सैन्यातील प्रशासकीय बदल, नवीन शस्त्रास्त्रांची क्षेपणास्त्रांची आयात, सैन्यात महिलांना निर्माण झालेली समान संधी, ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत असलेले सुरक्षा धोरण, दरवर्षी वाढत असलेली सुरक्षा उपकरणांची निर्यात त्याचबरोबर आंतरिक सुरक्षेबाबत सुसज्जता यांसारख्या अनेक प्रगत हालचालीमुळे भारताच्या संरक्षण धोरणाची दखल आज जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
उरी-पुलवामासारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि चीनच्या गलवान खोरे किंवा अरुणाचल प्रदेश येथील घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने त्यांना समजेल अशा भाषेतच उत्तर दिले आहे आणि देत राहणार हे निश्चित.
नुकत्याच सुदानच्या यादवीत तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने मध्यरात्री सुदानची राजदानी खार्टुम जवळ ४० किलोमिटर अंतरावरील एका ओबडधोबड धावपट्टीवर रात्रीच्या मिट्ट काळोखात हवाईदलाने विमान उतरवून भारतीय नागरिकांची सुटका केली होती . त्या घटनेची आठवण यावी असा हा भीम पराक्रम आहे.विशेष म्हणजे या धावपट्टीपर्यंतचा रस्ता २००५ साली भारतानेच बनवला होता.

भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक प्रगतीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी प्रबळ सैन्यव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नव्याने उदयास येत असलेल्या बहुध्रुवीय सत्तेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याच गतीने जर आपला सैन्यविकास सुरू राहिला तर, स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तिशाली सेना म्हणून आणि हे भारतराष्ट्र “विश्वगुरू” (vishwaguru) म्हणून नक्कीच उदयास येईल यात तीळमात्र शंका नाही..
भारतीय नौदलाला मनःपूर्वक शुभेच्छा !