कै. जयंतराव सहस्रबुद्धे श्रद्धांजली सभा

दिल्लीत झालेल्या भीषण अपघातानंतर नऊ महिने कडवी झुंज दिलेल्या जयंतरावांची प्राणज्योत २ जून २०२३ रोजी पहाटे तीनच्या सुमारास माळवली. छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्यभिषेक दिनी अर्थात हिंदू साम्राज्य दिनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनेक व्यक्ती जे प्रत्यक्ष जयंतरावांच्या सानिध्यात आले होते त्यांना जयंतरावांच्या आठवणींनी व्याकुळ केले होते. या सर्वांनाच जयंतरावांसोबतच्या आठवणींना उजाळा देता यावा यासाठी रा स्व संघ कोकण प्रांताने १२ जून २०२३ रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन दादर हिंदू कॉलनी येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या बी एन वैद्य सभागृहात केले होते.
ठिक ६.३० वाजता श्रद्धांजलीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली सर्वप्रथम डॉ सतिशजी मोढ हे जयंतरावांचे पिताश्री श्रीकांतजी सहस्रबुद्धे यांना व्यासपीठावर घेऊन गेले सोबत विनायकराव हे जयंतरावांचे बंधूंही होते. पुष्प अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली .
सुत्रसंचालक शिरीष केदारे यांनी जयंतरावांच्या कार्याचा आढावा घेतला मूळ गिरगावचे स्वयंसेवक , आई राष्ट्रसेविका समितीच्या सेविका , घरात संघमय वातावरण , Bsc Electronic पर्यंत शिक्षण , भाभा अनुसंधान केंद्र BARC येथे प्रकल्पात काम , १९९१ साली संघ प्रचारक म्हणून तासगाव तालुका प्रचारक, नंतर कोल्हापूर जिल्हा प्रचारक, सहसरकार्यवाह हो.वे.शेषाद्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले, गोवा विभाग प्रचारक , कोकण प्रांत प्रचारक आणि २००९ पासून विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री म्हणून जबाबदारी. भारतीय वैज्ञानिकांचे जीवन यावर सखोल संशोधन जयंतरावांनी केले.
डॉ सतिशजी मोढ,संघचालक कोकण प्रांत:-
सतीशजींनी आपले श्रद्धासुमन अर्पण करताना त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखवले. विज्ञान भारतीच्या कामात त्यांनी कसे झोकून दिले होते आणि ते त्यात किती समरसून गेले होते याची जाणीव उपस्थितांना करुन दिली.
माधव राजवाडे, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि विज्ञान भारतीचे सचिव:-
माधवजींनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की आम्ही बालपणापासूनच एकत्र, २०१० साली जयंतरावांनी मला विज्ञान भारतीच्या कामात घेतले. “त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्ही काम करतच राहू”, असे विज्ञान भारतीच्या वतीने त्यांनी प्रतिपादन केले.
दिलीपजी पै , प्रांत कार्यकारिणी सदस्य:-
दिलीपजींनी श्रद्धांजली अर्पण करताना जयंतजी २००१ ते २००९ सोबत असल्याने निर्णय घेणे सोपे होत होते, हे सांगताना नव्यानेच झालेल्या प्रांत रचनेत जयंतराव कोकण प्रांत प्रचारक म्हणून चोख भूमिका बजावत होते माझ्याकडे प्रांत सहकार्यवाह अशी जबाबदारी होती. याच कार्यकाळात एन्रॉन हा विषय झाला, स्वदेशी जागरण मंचाने प्रचंड विरोध केल्यानंतर आलेल्या आपल्याच विचारांच्या सरकारने एन्रॉनला मान्यता दिली आणि त्याचा परिणाम रत्नागिरीत काम ठप्प पडण्यावर झाला होता. मान.सरसंघचालक सुदर्शनजींचा प्रवास दापोलीत होणार होता,पण जयंतरावांमुळे हा विषय समाप्तीवर गेला. संघ वाढीच्या दृष्टीने मुंबईत १२५०० गणवेशधारी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण जयंतरावांच्या नियोजनामुळे सहज शक्य झाले. कोकण प्रांताने पुर्वांचलातील नागालॅंड राज्याची जबाबदारी स्वीकारली होती हा विषय जयंतरावांमुळेच होऊ शकला. अशी त्यांच्या कठीण परिस्थितीत सहज शांतपणे काम करण्याच्या हातोटीचा सर्वांना परिचय करुन देत श्रद्धांजली अर्पण केली.

संजय वालावलकर,दक्षिण गोवा विभाग कार्यवाह:-
जयंतराव १० वर्ष गोवा विभाग प्रचारक होते, गोव्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष ही याच काळात होते. गोव्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक व्हायची होती . मान.सरसंघचालक रज्जुभैया असणार होते.सरसंघचालकांच्या बैठकीसाठी फोंड्यात एखादे प्रशस्त मंदिर निवडावे असे ठरले.एक मंदिर सर्वांच्याच पसंतीला पडले पण तेथे काहीच संपर्क नव्हता. व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता असे मंदिर मिळणार नाही , संघकामासाठी तर नाहीच असे सांगितले. सर्वांनी विचार सोडून द्यायचे ठरवले परंतु जयंतरावांना हिच जागा बैठकीसाठी योग्य असल्याचे वाटत होते. त्यांनी मंदिर व्यवस्थापनाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला भेटून अखेर ते मंदिर बैठकीसाठी मिळवलेच. अशक्य ते शक्य करुन दाखविण्याची त्यांची हातोटी होती, अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली.
विजय जाधव,समतोल फाऊंडेशन :-
आज जो काही मी उभा राहिलो आहे ते जयंतरावांमुळेच.मामणोलीला आपले स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्र आहे त्याचे नावही त्यांनीच सुचवले आहे.अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहेत, लिहिणं कधीतरी,अशी श्रद्धांजली वाहिली.
रमेश देवळे:-
रमेशजींनी आपल्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांच्या साध्या, सरळ, मितभाषी सतत स्मितहास्य चेहऱ्यावर असणाऱ्या परंतु प्रसंगी धैर्य धाडस दाखवणाऱ्या जयंतरावांच्या स्वभावाचे पैलू उलगडत श्रद्धांजली वाहिली.
डॉ विवेक वडके,प्रांत कुटुंब प्रबोधन संयोजक:-
विवेकजींनी आपल्या भावना व्यक्त करताना गोव्यात आपल्या मुलीला केलेल्या सहकार्याबद्दलच्या आठवणी सांगताना, हा माणूस वेगळा आहे,योगी आहे, केवळ कर्मयोगी नाही तर राजयोगी आहे .विज्ञान भारतीच्या कामात अल्पावधीतच जयंतरावांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले , असे प्रतिपादन त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना केले.
जयवंत कोंडविलकर, मजदूर संघ :-
प्रचारक म्हणजे प्रेमाची खाण.आईवडील एकत्र केले तर प्रचारक होतो. मजदूर संघाच्या कामात मदत करत असतं त्यांच्या कामाचा भाग नसताना. मणिपूरला जयंतरावांनी अडचणीत कामं बाजूला ठेवून मदत केली, असे हे जयंतराव.अशी श्रद्धांजली वाहिली.

भुषण दामले प्रचारक प्रांत कार्यकारिणी सदस्य:-
जयंतराव हे प्रचारक म्हणून किती अनुकरणीय होते याची त्यांनी माहिती देतानाच आपणही त्यांच्या फॅन क्लब मधे आहोत हे सांगताना त्यांच्या सहज आणि स्वाभाविक वागण्याची,सगळं कसं नेटकं अगदी परफेक्ट असण्याबाबतची उदाहरणं दिली. परफेक्शनिस्ट म्हणजे काय हे जयंतरावांकडे बघून लक्षात येते. १३ कोटी रामनाम जपाचा संकल्प त्यांच्या प्रवासामुळे शक्य. झंझावाती प्रवास पण मनाने शांत निश्चल,अगदी सहज स्वाभाविक. बोलताना ते धीरगंभीर झाले होते.
प्रज्ञा सहस्रबुद्धे, जयंतरावांच्या वहिनी
जयंतरावांची वहिनी असणं हे सुभाग्यच.मरावे परी किर्ती रुपे उरावे म्हणजे काय हे अनुभवत आहे.त्यांच्या आठवणींमुळे संपूर्ण सभागृह सद्गतीत होऊन गेले. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी नुकतीच शिरिष पटवर्धन यांनी जयंतरावांवर केलेली कविता ऐकवली
विज्ञान वारकरी, निघाला वैकुंठी।
लगबग सुरु झाली, वैकुंठधामी।।
आलिंगन देण्या, लाडक्या भक्ताला।
वैंकुठीचा राणा, आतूर झाला।।
विज्ञान अध्यात्म,भिन्न जरी शब्द।
अभिन्न एकत्व, त्यांचे ठाई।।
जाणूनी हे मर्म, देह झिझवला।
राष्ट्रभाव मनोमनी, जागविला।।
प्रफुल्ल सहस्रबुद्धे,चुलतभाऊ:-
जयंतरावांचे काका म्हणजे माझे वडिल शरद सहस्रबुद्धे हे देखील हिंदू साम्राज्य दिनीच इहलोकीची सफर करण्यास निघून गेले हा योगायोग. काही काळ गोव्यात असताना जयवंतरावाच्या काटेकोर नियोजनाचा अनुभव त्यांनी प्रसंग सांगून जयंतराव कसा मिनिटा मिनिटाचा उपयोग संघकामासाठी करत होते याची जाणीव सर्वांना करुन दिली. विज्ञान भारतीचे कार्यक्रम समाजाभिमुख असायला हवेत,अशी त्यांची भूमिका होती.
डॉ अनिल काकोडकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ:-
” जयंतरावांनी मला विज्ञान भारतीच्या कामात घेतले.जिस्ट ( ग्लोबल इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ) ची त्यांची कल्पना मला भावली.भारतीय शास्त्रज्ञ आणि परदेशातील भारतीय शास्त्रज्ञ व समाज असा भारतीय समाजाला उपयोगी पडू शकेल हा काहीसा कठीणच विषय त्यांनी हाती घेतला.कोणत्याही कल्पनेचे कार्यान्वयन बरोबर होते आहे की नाही याकडे त्यांचा कटाक्ष असे. जी एम कॉर्प विरोधक आणि समर्थक यांच्यात त्यांनी चर्चा घडवून आणली ते ही स्वतःच्या संघटनेचा विरोध असताना. हे सहज शक्य नव्हते. सगळ्यांना एकत्र आणण्याचे धैर्य त्यांच्यात होते. इनर कोअर स्ट्रॉंग असल्याशिवाय हे होत नाही. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.” असे प्रतिपादन श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी केले.
अतुलजी लिमये, पश्चिम क्षेत्र प्रचारक
जयंतराव प्रांत प्रचारक असताना मी विभाग प्रचारक होते २००८ ते २००९ असा सहवास लाभला. मी मराठवाड्यातील घंट्यांवर चालणारा तर जयंतराव पक्के मुंबईकर मिनटा मिनिटांवर चालणारे. त्यांचा विशेष गुणविशेष म्हणजे he was perfectionist. छोट्या छोट्या गोष्टींचे detailing, वेळेच नियोजन भयंकर काटेकोरपणा, आहारावर नियंत्रण ( दांडगा आहार करु शकत असताना), उत्तम स्मरणशक्ती, बोलावं कसं , आज्ञा कशी द्यावी हे जयंतरावांकडूनच शिकावं .माणसांची समस्या हाताळण्याची हातोटी. जयंतरावांच्या जाण्याने संघाचीच नाही तर भारताचीच मोठी हानी झाली आहे.
“विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे” हे वैयक्तिक गीत प्रसाद घळसासी यांनी सादर केले
रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ कृष्ण गोपालजी यांनी आपला तीस वर्षांचा स्नेह असल्याचे सांगतानाच कार्यकर्त्यांप्रती सजग असणाऱ्या जयंतरावांची अनेक उदाहरणं सांगितली. डॉ हेडगेवार यांच्या आदर्श स्वयंसेवक या संकल्पनेतील अपेक्षित सर्वच गुण त्यांच्यात होते.ज्याला कधी क्रोध येत नाही, भिन्न भिन्न स्वभावाच्या लोकांमध्येही स्थिर रहाता येते आणि आत्मियतेचा भाव हा उत्तम कार्यकर्त्याचा मुख्य स्वभाव त्यांच्यात होता. प्राचीन भारतीय संशोधन जगापुढे आणण्याचा त्यांचा ध्यास होता. शाळा महाविद्यालयातूनच याची माहिती मिळावी यासाठी प्राध्यापक घडविण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
भरपूर विद्वान असूनही शांत रहाणे , विपरित परिस्थितीत शांत रहाणे, धैर्य राखणे हे ज्याला जमलं तो संघटन करु शकतो, असे होते जयंतराव ” हे सांगत असतानाच त्यांना गहिवरून येत होते. ते थांबले त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला . आपल्यापेक्षा वयाने छोट्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहणे फार कठीण काम असते हे त्यांनी नुकतेच केलेलं वक्तव्य जाणवत होतं. ते थांबले त्यांचे अस्पष्ट हुंदके शांत सभागृहाला पाणावून गेले. राम राम म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याला पुर्ण विराम दिला.

दोन मिनिटे मौन बाळगून सर्वांनी जयंतरावांना श्रद्धांजली वाहिली .
याप्रसंगी आमदार मंगलप्रभात लोढा ,राज पुरोहित ,अतुल शहा ही राजकीय मंडळी आवर्जून उपस्थित होती तसेच मुंबई महानगर व कोकण प्रांत रा स्व संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गिरगाव ते गोवा त्यांचे स्नेही, परिवारजन उपस्थित होते.