
साधारणत: २००५ किंवा ०६ चे वर्ष असेल… शिवाजी उद्यान सायम् शाखेच्या वार्षिक उत्सवाला मान. जयंतराव उपस्थित होते. जयंतराव (jayantrao sahasrabudhe) प्रांत प्रचारक झाल्यापासून त्यांचा निवास हे पितृछाया कार्यालय असल्याने… त्यांनी आपलं नाव शिवाजी उद्यान सायम् शाखेच्या पटावर ठेवायला सांगितलं होतं… आणि तेव्हापासून त्या शिवाजी उद्यान शाखेच्या सर्व कार्यक्रमात सगळ्या कार्यकर्त्यांशी अगदी मिळून मिसळून राहत… म्हणजे असं वाटत असे की, ते त्या शाखेतलेच आहेत… कुठेही प्रांत प्रचारक आहेत असं जाणवत नसे… त्या काळातले कार्यवाह, मुख्य शिक्षक असलेले कार्यकर्ते आजही कामात आहेत… आणि त्या काळातला जयंतरावांचा सहवास ही त्यांची प्रेरणा आहे…
… तर त्या वार्षिकोत्सवाची घटना अशी आहे की… संध्याकाळी कार्यक्रम होता… तो रविवारचा दिवस होता… कार्यवाह विक्रम वालावलकर (आता ते भाग सहकार्यवाह आहेत) यांनी असं सुचवलं होतं की… शिवाजी उद्यान शाखेचा वार्षिकोत्सव हा जिथे जाहीर सभा होतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच आपण करायचा… अगदी स्टेज घालून… म्हणून एक छोटासं स्टेज टाकलं होतं… एक फुट उंचीचं आणि प्रमुख अतिथी म्हणून त्यावेळी स्पृहा जोशी… जीला ९ वीत असताना राष्ट्रपतींच्या हस्ते “बालश्री पुरस्कार” मिळाला होता… तिला अतिथी म्हणून बोलवल होतं… ती शिवाजी पार्क जवळच राहते…

मी त्या कार्यक्रमात विभाग कार्यवाह या नात्याने उपस्थित होतो… आणि आश्चर्य असं आहे की एकूण कार्यक्रमाची उपस्थिती स्वयंसेवकांची ६५ होती पण… बघणाऱ्यांची संख्या जवळपास ५०० च्या घरात होती… त्या दिवशी रविवार असल्यामुळे शिवाजी पार्कवर फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते…
कार्यक्रम सुरू झाला… ठरवलेली सगळी प्रात्यक्षिकं झाली… ३ शिशुचं खेळाचं प्रात्यक्षिक झालं… निवेदकाने असं म्हटलं की… ३ दिवसांपूर्वी हे शिशु शिक्षकांच्या मागे लागले आणि म्हणाले की… आमचंही प्रात्यक्षिक व्हायला पाहिजे… असं म्हणून त्या ३ शिशुंनी खेळाचं प्रात्यक्षिक केलं… मान. जयंतरावांचं भाषण झालं… स्पृहा जोशीचं देखील भाषण झालं… स्वाभाविकच आहे की या सगळ्या कार्यक्रमाचा प्रभाव स्पृहा जोशीच्या भाषणात होता…
कार्यक्रम संपल्यानंतर जी घटना आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे… कार्यक्रम संपल्या संपल्या २ महिला आपल्या बालकांना हाताला धरून मुख्य शिक्षका जवळ आल्या आणि… एकीने विचारलं… याचा प्रवेशाचा फॉर्म कुठे मिळतो?… स्वाभाविकपणे उत्तर मिळालं की फॉर्म नसतो… नंतर दुसरीचा प्रश्न होता की… याची फी किती आहे?… त्यालाही स्वाभाविक उत्तर आलं की… फी पण नाही… आणि नंतर त्या दोघींच्या तोंडी उस्फूर्तपणे वाक्य ते असं होतं की… फी पण नाही आणि फॉर्म पण नाही… तरी पण तुम्ही एवढे चांगले शिकवता…

असा तो जो त्या कार्यक्रमाचा परिणाम जनतेवर झाला होता तो विलक्षण होता… आणि त्याचं सर्व श्रेय मला असं वाटतं की ते जयंतरावांना जातं… कारण जयंतरावांनी या कल्पना सगळ्या कार्यकर्त्यांकडून घडवून आणल्या होत्या…
आज सकाळी जेव्हा मी स्वप्निल शेलारना फोन केला तेव्हा… त्यांनी असं सांगितलं की… घरी आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांशी गप्पा व्हायच्या… घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी गप्पा मारत असताना… ते त्या व्यक्तीला गाव विचारायचे आणि तुमचं कुलदैवत काय विचारायचे… आणि मग ती चर्चा सुरू व्हायची… व्हायचं काय की या गोष्टीमुळे आपलेपणा वाढायचा… की हा माणूस आपल्या कुलदेवतेसंबंधात… आपल्या गावासंदर्भात चौकशी करतोय… आणि त्याला जी काही माहिती आहे ती देखील सांगतोय… यातून कार्यकर्त्याच्या घरच्यांशी एक अतूट ऋणानुबंध तयार व्हायचा…
जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
लेखक ;- बा. भ. बोरकर
(संजीवजी परब यांनी कथन केलेल्या स्मृतीगंधाचे स्वैर शब्दांकन)