एखाद्या कुटुंबात ‘आई’ किंवा ‘वडील’ दोघांपैकी एक जरी नसेल, तरी त्या कुटुंबावर किती संकटे येतात आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर किती प्रतिकूल परिणाम होतो, याची भारतीय समाजाला जाणीव आहे. तरीही अशी कल्पना केली, की एखाद्या देशात वडील नसलेली अर्ध्याहून अधिक कुटुंबे होऊ लागली आहेत, तर आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण ही परिस्थिती सद्य स्थितीत ओढवली आहे बलाढ्य अश्या अमेरिका देशात.
2021 मध्ये एका संस्थेने केलेल्या संशोधनानुसार अमेरिकेत वडील नसलेल्या कुटुंबांची संख्या 24.7 मिलियन (2.4 कोटी) इतकी झाली आहे, जी अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 33% टक्के आहे. अमेरिका सध्या या कौटुंबिक – सामाजिक समस्येमुळे प्रचंड तणावात आहे. अमेरिकेतील लोकांसमोर ही गंभीर समस्या उभी राहिली आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होतच आहे. केवळ अमेरिकाच नाही तर एकूण पाश्चात्य देशात कमी अधिक प्रमाणात ही समस्या वाढीस लागली आहे. अमेरिकेची ही व्यथा डेव्हिड ब्लंकेनहॉर्न या लेखकाने ‘fatherless america’ या पुस्तकातही विस्तृतपणे मांडली आहे.
पाश्चात्य देशात पूर्वी पती-पत्नी शेवटपर्यंत एकमेकाची साथ देण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु आधुनिकता, वोकिजम (उदारमतवाद), ट्रान्सजेंडिजम, सेक्युलॅरिझम, भोगवाद, स्वार्थलोलुप जीवनशैली, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अतिरेक आणि कुटुंब म्हणून असलेली कर्तव्याची जाण दिवसेंदिवस कमी होत गेल्यामुळे अमेरिकेत आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणामुळे अमेरिकन कुटुंबात घटस्फोटाचे व कुटुंबापासून आई वडिलांची फारकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 1960 पासून बाप विरहित कुटुंबांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली.
संशोधनात समोर आलेले काही तथ्य:
- अमेरिकेत वर्तमान स्थितीत 24.7 मिलियन (33%) मुले अशी आहेत ज्यांना वडील नाहीत.
- वडील नसलेल्या कुटुंबांच्या संख्येत 1960 पासून 25 टक्क्याने वाढ झाली.
- 85% मुले गुन्हेगारी गतिविधित समावेश.
- चारपट गरिबी व हलाखीचे जीवन.
- 70 टक्के मुलांना शाळा सोडावी लागली.
- अश्या कुटुंबातील मुली अल्पवयीन असतानाच गर्भवती झाल्याचे आठपट अधिक प्रमाण आहे.
- 85 टक्के मुलांमध्ये स्वभावदोष निर्माण झाले.
- 2019 मधील एका माहितीनुसार 7 कोटी वडिलांना ‘अबसेंट फादर’ ठरवण्यात आले आहे.
- अविवाहित माता 43.7 (2010)
- अनैतिक संबंधातून (विवाह न होता) जन्माला आलेली मुले 17.27 लाख (40.6%)
अमेरिकेत ही कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्यास अनेक तज्ज्ञांनी ‘घटस्फोट’ (divorce) हे कारण सांगितले आहे. परंतु ते एकमेव कारण नाही. एखाद्या संस्कृतीत विकृती शिरू लागल्यावर असे घातक परिणाम होतात. पाश्चात्य देशांमध्ये पूर्वीपासून कुटुंब पूरक संस्कृतीचा अभाव आहे. विवाहबाह्य संबंध व विवाहपूर्व अनैतिक संबंध यासारख्या सामाजिक विकृती तथाकथित उच्च जीवनशैलीचीच्या नावाखाली स्वीकारल्या गेल्या. शेकडो वर्षापासून वाढत गेलेल्या सामाजिक विकृती व दोषांचे फलस्वरुप म्हणून आज अमेरिका “बाप नसलेला देश” होत चालला आहे. अश्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या अनौरस संततीचे प्रमाण आणि विवाहपूर्वीच माता झाल्याचे वाढलेले प्रमाण सुद्धा या समस्येला जबाबदार आहे.
पाश्चात्य जग अश्या कौटुंबिक–सामाजिक समस्यांना सामोरे जात असताना सर्वांची दृष्टी भारतीय संस्कृतीकडे वळताना दिसत आहे. हजारो वर्ष प्राचीन संस्कृती असलेला आणि अनेक विदेशी आक्रमण होऊनही आपले अस्तित्व अबाधित ठेवणारा भारत सर्वांसाठी जिज्ञासेचा विषय झाला आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रंप यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असलेल्या विवेक रामास्वामी यांनी माध्यमांना मुलाखत दिली. ते म्हणाले, “अमेरिकन भारताप्रमाणे समाजात कुटुंब, समाज व देशभक्तीच्या मूल्यांना सहज निर्माण करणे माझा उद्देश आहे. अमेरिकेत सेक्युलॅरिझम हीच मूळ समस्या आहे. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली वोकिजम, ग्लोबलिजम, ट्रान्सजेंडिजम मानणारा वर्ग तयार झाला आहे.” जगातील अनेक समस्यांचे समाधान भारतच आहे, असे जग मानू लागले आहे हे त्याचे ज्वलंत उदाहरण…
भारतात आजही एखादं विधिवत लग्न झालं की त्याकडे ‘सामजिक दायित्व’ म्हणून पाहिले जाते. व्यक्तिगत संस्कारसाठी भारतीय जीवन पद्धतीत जीवनाचे चार भागात (आश्रम) विभाजन करण्यात आले आहे. त्यास आपण ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अश्या चार आश्रमांच्या नावाने ओळखतो. त्यापैकी गृहस्थाश्रम हा व्यक्तीच्या जीवनाचा असा भाग मानला जातो, ज्याद्वारे व्यक्तीची वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्राची उन्नती अवलंबून असते. पती पत्नीचे बंधन हा करार नसून ते सात जन्माचे बंधन आहे असे मानले जाते. विवाहबाह्य संबंध तर भारतीय समाज व्यवस्थेला मान्यच नाही. कितीही संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती आली तरी घटस्फोट किंवा विभक्त होण्याचा निर्णय केला जात नाही. भारतीय समाजाने आपली हजारो वर्षांची संस्कृती जपल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण केवळ 1 टक्के इतकेच आहे. हेच प्रमाण स्वीडनमध्ये 58.9, अमेरिका 58.8, रशिया 43.3 , युके 42.6, जर्मनी 39.4, इस्राईल 14.8, सिंगापूर 17.2, जपान 1.9 व श्रीलंकेमध्ये 1.5 आहे.
भारतीय सनातन संस्कृती शास्त्रोक्त व कल्याणकारी असल्यामुळे अनेक विदेशी आक्रमण होऊनही भारताची कुटुंब व्यवस्था ढासळली नाही. परंतु भारतासमोरील आव्हानेही कधी संपलेली नाहीत. वर्तमान काळ तसाच आव्हानांचा काळ आहे. भारतीय समाजात वाढत चाललेले पाश्चात्य अंधानुकरण, सेक्युलॅरिझमची लागण, वोकिजम, व्यक्तिकेंद्रित स्वभाव, नात्यांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, विसंवाद, भोगवाद, विभक्त होणारी कुटुंबे, आत्यंतिक स्वैराचार, व्यक्ती स्वातंत्र्याच्या चुकीच्या धारणा अश्या विविध कारणांमुळे कुटुंब व्यवस्थेवर आघात होत आहेत. तसेच भारतीय संस्कृतीवर समलिंगी विवाह, ट्रान्सजेंडिजम (कृत्रिम लिंगबदल), लिव्ह इन रिलेशनशिप अश्या विकृतींच्या आक्रमणामुळे भारतीय कुटुंब व्यवस्था आणि संस्कृतीवर विघातक परिणाम होत आहेत.
‘कुटुंब’ हा राष्ट्राचा पाया असतो. त्याला खिळखिळा करण्यासाठी काही समाजविघातक शक्ती कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी आधुनिकता व उच्च विचारांच्या नावाखाली उत्तेजन देत आहेत. त्यांनी अमेरिकेत जे करून दाखवले तेच भारतात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण सर्वत्र डोळसपणे बघावे. इतकेच...
लेखक – कल्पेश जोशी.
साभार :- विश्व संवाद केंद्र, देवगिरी