श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त ५ भागांची विशेष मालिका (1-5)
यादवाच्या राजवटीखाली नांदणाऱ्या १२ व्या शतकातील महाराष्ट्रात अनेक संप्रदाय अस्तित्वात होते. त्यात जैन, बौध्द या हिंदुत्वातून विकसित झालेल्या विचारधारा, तसेच नाथ, महानुभाव, वीरशैव, वारकरी, दत्त, वैष्णव, अवधूत इत्यादींचा समावेश होतो. जो तो आपआपल्या सांप्रदायातील व्रताचरण निष्ठेने करित होता.एकूणच या काळातील महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेचा विचार केला तर ती धर्माधिष्ठित होती. असे म्हणण्यापेक्षा ती रूढी परंपरेला चिकटून होती. याच पार्श्वभूमीवर याच काळात म्हणजे १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी भाषेला ज्ञानभाषेचे स्थान देणारा एकेश्वरी भक्तीचा पुरस्कार करणारा, सामाजिक विषमता नाकारून सर्वांनाच मोक्षाचा समान अधिकार देणारा, सामाजिक विषमता नाकारुन सर्वांनाच मोक्षाचा अधिकार देणारा “महानुभाव” संप्रदाय उदयास आला.
चक्रधरस्वामींच्या (shree chakradhar swami) पुढाकाराने उदयास आलेल्या ह्या पंथाची पुढील वाटचाल भरभराटीची होती. ‘महानुभाव सोबतच या पंथाची महात्मा, अच्युत, जयकृष्णी, भटमार्ग, परमार्ग अशीही नावे आहेत. एकनाथांच्या काळापासून हा ‘मानभावपंथ’ (mahanubhav panth) या नावाने देखील ओळखला जातो.
‘महानुभाव याचा अर्थ “महान अनुभव: तेज: बलं वा यस्य सः महानुभावः” याप्रमाणे केला असता मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा पंथ हा महानुभाव पंथ असे म्हणता येईल.’
महानुभावांच्या वाङ्मयनिर्मितीने मराठी साहित्याला समृद्धी दिली. ‘मराठीत गद्य लेखनाच्या मुहूर्तमेढीचे श्रेय महानुभावांचे आहे. म्हाइंभटाने स्मरणशक्तीतून आणि सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेऊन लिहिलेले ‘लीळाचरित्र‘ हे चरित्रलेखनाचा आदर्श तर ठरलेच, पण उभ्या मराठी वाङ्मयाचा मानदंड बनून राहिले. नरेंद्र, भास्करभट्ट यांसारखे रसिक कवी, दामोदर पंडितांसारखे भाष्यकार, महदंबेसारखी मराठीतील कथाकाव्य लिहिणारी कवयित्री असे अनेक रचनाकार महानुभावीय प्रेरणेने प्रेरित होऊन लिहिते झाले. स्त्रियांनी रज:स्वला स्थितीत विटाळ पाळण्याची आवश्यकता नाही असे महदाइसेला सांगून चक्रधरांनी एक नवीन विचार जगापुढे मांडलेला दिसतो..
महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधार आणि तत्त्वज्ञ म्हणजेच श्री चक्रधर स्वामी. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. वैदिक परंपरेला छेद देऊन सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील समाज सुधारक होते.
चक्रधर स्वामींच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे…
चक्रधर स्वामींचे पूर्वायुष्य..
चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधीची माहिती लीळाचरित्राच्या या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे पाळण्यातील नाव “हरपाळदेव” असे होते.
युद्धात पराक्रम आणि समाजसेवा..
युवा झाल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद जडला. ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने (sri krishna) त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. महानुभावीयांच्या पंच अवतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक दुसरा मतप्रवाह देखील आहे.
लोकसेवेसाठी सर्वस्वाचा त्याग..
यानंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे, अशी सबब घरी सांगितली. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील “गोविंदप्रभू” दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. गोविंदप्रभूंनी त्यांना “चक्रधर” असे नाव दिले.
भटकंती आणि शिष्य..
गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डीपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या येळी या गावात चक्रधरस्वामींनी काही काळ घालवला. येळी येथे महानुभाव पंथीय मंदीर आहे. पुढे महाराष्ट्रभर एकट्यानेच त्यांनी भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही ते फिरले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले. त्यापैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा असा शिष्यपरिवार त्यांना लाभला.
समाज व धर्म सुधारणा..
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. सिंहस्थ यात्रेनिमित्ताने ते त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले. एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली, असे सांगितले जाते…
अशाही परिस्थितीत त्यांनी आपले संपूर्ण तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना रुचेल, समजेल अशा तत्कालीन मराठी भाषेत सांगितले. अखेरच्या काळात त्यांनी उत्तरापंथे प्रयाण कले. हिमालयात अजूनही ते विद्यमान आहेत, अशी त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे.
क्रमशः
संदर्भ :-
-लीळाचरित्र एक अभ्यास-व. दि. कुलकर्णी
-महानुभाव संशोधन- विष्णु भिकाजी कोलते
-श्री. चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र