CultureNewsSpecial Day

प्रखर धर्माभिमानी – यशवंतराव होळकर

yashwantrao holkar

भारताच्या इतिहासातील होळकरशाहीचा इतिहास हा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे. इंदूरच्या होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर संस्थापक होते. त्यानंतर अहिल्याबाईंचा सुवर्णकाळ येतो. त्यांच्यानंतर यशवंतराव होळकरांनी हा वारसा सांभाळला. इ. स. १६९३ पासूनचा हा इतिहास आहे.

यशवंतराव होळकर (yashwantrao holkar) यांचा काळ राजकीय धामधुमीचा होता. त्यांनी होळकरशाहीला बुडण्यापासून वाचविले. खरे तर पेशवाई इंग्रजांच्या ताब्यात जाण्यापासून वाचावी यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांच्याविषयी पेशवे आणि शिंदे याच्या मनात प्रचंड गैरसमज भरलेला होता. हे गैरसमज दूर न झाल्यामुळे यशवंतरावांना वेगळा लढा उभारावा लागला. मात्र एक पराक्रमी आणि रणधुरंधर सेनानी म्हणून इतिहासातील त्यांचे स्थान कायम आहे.

यशवंतराव होळकर हे सेनापती म्हणून जेवढे पराक्रमी होते, तेवढेच धर्माभिमानी म्हणूनही त्यांचे स्थान अद्वितीय आहे. हिंदू धर्माबद्दलचा त्यांचा अभिमान त्यांच्या पत्रव्यवहारात जागोजागी दिसून येतो.

परशुरामपंत प्रतिनिधी यांना लिहिलेल्या पत्रात यशवंतराव होळकर म्हणतात, ”आजपर्यंत हिंदु राज्य सर्वत्रांनीं एकदिल राहून चालविले. अलीकडे ज्याचे त्याचे दौलतींत गृहकलह होऊन राज्यास विपर्यास पडून हिंदूधर्म नाहींसा होण्यास मूळ झाले. याचें छेदन करण्यास सर्वंत्र एकदिल झाले पाहिजे. तसंच मूळाचें छेदन होऊन स्वधर्माचार पूर्ववतप्रमाणें चालून हिंदूंची कायमी राहील. इकडील क्रम जो आरंभिला आहे, हाच यावद्देह चालवावा, असें मनांत आहे. यांत परमेश्वर अनुकूल होऊन जें घडवील तें खरें. परंतु एकानेंच असा प्रकार करून सर्वत्रांनीं तमासे पाहून आपापली दौलत संभाळून असावें, यांतील परिणाम कसा, हें मनीं विचारून ज्यांत हिंदुधर्माची कायमी व परिणामास नीट तें करावें. याचा विचार तुम्हांसारख्यांनीं न केला, तरी दुसरे कोण करतील.”

6 जानेवारी १799 रोजी, यशवंत राव होळकर यांना हिंदू वैदिक विधींनुसार राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना मुघल राजाने राजकिय पदव्या बहाल केल्या आणि ब्रिटिशांनी त्यांना सार्वभौम राजा म्हणून मान्यता दिली.

यशवंतरावांनी नागपूरच्या व्यंकोजी भोसले यांना १५ फेब्रुवारी १८०६ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “मराठा राज्य परकीयांच्या ताब्यात गेले होते. त्यांच्या (परकीयांच्या) आक्रमकतेचा प्रतिकार करण्यासाठी, गेल्या अडीच वर्षांत मी एक क्षणही विश्रांती न घेता, रात्रंदिवस लढत सर्वस्वाचा त्याग कसा केला, हे देव जाणो. मी दौलतराव शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना समजावून सांगितले की परकीय वर्चस्व रोखण्यासाठी आपण सर्वांनी सामील होणे किती आवश्यक आहे. पण दौलतरावांनी मला अव्हेरले. परस्पर सहकार्य आणि सद्भावना यामुळेच आपल्या पूर्वजांना मराठा राज्ये उभारता आली. पण आता आपण सगळेच स्वार्थ साधक झालो आहोत. तुम्ही माझ्या पाठिंब्यासाठी येत आहेस असे मला लिहिले, पण तुम्ही तुमचे वचन पूर्ण केले नाहीत. जर तुम्ही ठरल्याप्रमाणे बंगालमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही ब्रिटीश सरकारला पंगू करू शकलो असतो. आता पूर्वीच्या गोष्टींबद्दल बोलून उपयोग नाही. जेव्हा मला सर्व बाजूंनी सोडलेले आढळले तेव्हा मी ब्रिटीश दलालांनी माझ्याकडे आणलेली ऑफर स्वीकारली आणि युद्धाची सांगता केली.”

यशवंतरावांच्या चरित्रात त्यांचा हा धर्माभिमान जागोजागी दिसून येतो. पहिले यशवंतराव होळकरांविषयी इतिहासकार गो. स. सरदेसाई यांच्या मते, ‘मराठेशाहीच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या पडत्या काळात यशवंतराव होळकर हा एक फार मोठा हिराच अल्पकाळात चमकून गेला आणि या हिऱ्याने आपल्या तेजाने त्या काळातील निबीड अधार किंचित काळ दूर सारला. त्याचवेळी त्याच्या तोडीचा सेनानायक मराठ्यांकडे दुसरा कोणी नव्हता. अंतःकरणाचा उदार, गरीबांचा कनवाळू, हाताखालच्या मंडळीस जीवापलीकडे जपणारा, स्वत:च्या सुखाविषयी अत्यंत निरिच्छ पण समरांगणी कर्दनकाळ असे यशवंतरावांसारखे पुरूष आपणास आपल्या इतिहासात क्वचितच दाखविता येतील. यशवंतरावाचे सर्व चरित्र इतके अद्भूत व हृदयंगम आहे की ते सर्व व्यवस्थित व साधार लिहिले जाईल.‘

साभार – विश्व संवाद केंद्र पुणे.

https://vskpune.org/item/ca9c267dad0305d1a6308d2a0cf1c39c#

Back to top button