ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
३७ वे नॅशनल गेम्स गोवा २०२३ (National Game Goa) पणजी, सांगे तालुक्यातील नेत्रावळी येथील बाबू गावकर ( babu gaonkar) या युवकाने या वर्षी जूनपूर्वी साधी बंदूक हाती घेतली नव्हती, लेझर गन म्हणजे काय हे त्याला ठाऊकही नव्हते. मात्र या २२ वर्षीय खेळाडूने आपल्या मेहनतीने, परिश्रमाने सगळ्यांना अचंबित केले आहे. मॉडर्न पेंटॅथलॉन खेळातील लेझर रन प्रकारात बाबू गावकर वेगाने धावलाच, त्याचवेळी अचूक नेमबाजीही केली आणि सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
फोंडा येथील क्रीडा संकुलात गुरुवारी सुवर्णपदक जिंकल्यानंतर बाबू गावकर याने सीता गोसावी हिच्यासह लेझर रन प्रकारातील मिश्र रिलेत गोव्याला रौप्यपदक जिंकून दिले, नंतर महिलांच्या सांघिक प्रकारात नेहा गावकर, सीता गोसावी, योगिता वेळीप यांच्या संघाने ब्राँझपदक जिंकले.
आधी कष्ट मग फळ..
बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे.चौथीपर्यंतचे शिक्षण नेत्रवली येथे झाले. त्यानंतर तो नेत्रावलीपासून जवळपास २५ किमी अंतरावर असलेल्या मलकापान गावात आपल्या मामाच्या घरी ५वी ते ७वी पर्यंत युनियन स्कूल संगुमेत गेला आणि पुन्हा नेत्रावलीत आला आणि आठवी ते दहावी संघ परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या दुर्गामाता वसतिगृहात त्याने शिक्षण घेतले. केपे सरकारी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेला बाबू गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील १५०० मीटर शर्यतीतील माजी सुवर्णपदक विजेता आहे.
बाबू याचे वडील अर्जुन गावकर हे ट्रॅक्टर मॅकेनिक असून त्यांची स्वतःचे गॅरेज आहे. शिवाय ते बागायती शेतकरी आहेत. आई अपर्णा गृहिणी असून बहीण अर्पिता शिक्षण घेते. पालकांचे त्याला पूर्ण पाठबळ लाभले.
आईने सांगितले की, संधी मिळेल तेव्हा तो नेत्रवलीत डोंगराकडे धावत जातो. तो दररोज डोंगरावर धावण्याचा सराव करतो.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाचे नोडल अधिकारी नीलेश नाईक यांनी बाबूची प्रशंसा केला. ते म्हणाले, ‘‘जूनमध्ये गोव्यात विविध तालुक्यांत आम्ही चाचणी घेतली. सांगे तालुक्यातील बाबूमध्ये आम्हाला मॉडर्न पेंटॅथलॉन खेळासाठी आवश्यक असलेले कौशल्य दिसून आले.गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेने बाबूसाठी लेझर गन विकत घेतली. या गनची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. सरावासाठी संघटनेकडून गन मिळविणारा तो पहिला खेळाडू ठरला.
मार्गदर्शक पाठीशी नसतानाही…
बाबू म्हणाला, ‘मी धावण्याचे कोणतेही शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले नाही. धावणे एवढेच माहीत होते. राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी होताना सेनादलाच्या धावपटूंना पाहिले. त्यांच्याकडून धावण्याबाबत माहिती घेतली, त्या जोरावर स्वतःच्या शैली व कौशल्यात बदल करत गेलो.नंतर मी सेनादलाच्या धावपटूंनाही पराभूत केले. लेझर गन कधी हातात घेतले नव्हते. नीलेश नाईक सरांनी तसेच कीर्तन वैझ सर यांनी प्रोत्साहन दिले. अल्पावधीत नेमबाजीत कसब आत्मसात केले. आता राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे खूप आनंदित आहे. मेहनतीला गोड फळ मिळाले.’
तीन महिन्यांतच लक्ष्य भेद..
सुवर्णपदक जिंकल्यानंतर बाबू गावकरने सांगितले, की ‘‘एवढी मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा गोव्यात होत असल्याने मला उत्तम कामगिरी करायची होती. वयाच्या तेराव्या वर्षीपासून मी मिनी मॅरेथॉन, क्रॉस कंट्री शर्यतीत धावत आहे. धावण्याच्या पुष्कळ शर्यती जिंकल्या, पण मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाबाबत मला विशेष माहिती नव्हती. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त गोवा मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेने निवड चाचणी घेतली. तेव्हा मी या चाचणीत सहभागी झालो, मात्र मी कधी बंदूकही हातात घेतली नव्हती. प्रशिक्षक नीलेश नाईक सर, कीर्तन वैझ सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.मॉडर्न पेंटॅथलॉन संघटनेनेही मला प्रोत्साहन दिले. मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ मी आत्मसात केला.’’
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बाबू गावकरचे अभिनंदन केले आहे.
विश्व संवाद केंद्र कोकण प्रांतांतर्फे बाबू गावकरचे हार्दिक अभिनंदन तसेच उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा..