वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यातील सांस्कृतिक राष्ट्रदर्शन..
संस्कृती हा राष्ट्रीयत्वाचा भक्कम आधार असतो. परकीय सत्ता ही गुलाम देशाच्या संस्कृतीवर आघात करीत असते.जेणेकरुन त्या समाजाला आपल्या संस्कृतीचा विसर पडावा. अशा समाजावर परकीय सत्तेला जास्त काळ राज्य करणे सोपे जाते. राष्ट्र हे लोकांचे असते.लोकसंस्कृती ही राष्ट्राची ओळख असते. संस्कृतीचा प्रवाह जेवढा प्रवाहीत असेल तेवढे राष्ट्र प्रबल असते.हा प्रवाह अवरूद्ध झाला की राष्ट्र दुर्बल होते.असे राष्ट्र परकीय सत्तेशी लढू शकत नाही.
वंदनीय राष्ट्रसंतांच्या कार्याचा पूर्वार्ध हा संघटन बांधणी व स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाचा आहे. महापुरूषांचे जीवन,विचार व कार्य हे तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात घडत असते.देश पारतंत्र्यात आहे,स्वातंत्र्य आंदोलनाचा तो कालखंड. टिळक युगानंतर गांधीयुगाचा झालेला प्रारंभ. सत्य,अहिंसा व सत्याग्रह या गांधीजींच्या तत्वांचा जनतेवर पडलेला प्रभाव. या पाश्र्वभूमीवर वंदनीय राष्ट्रसंतांनी भारतीय समाजमनाची प्रकृती व स्वभाव लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीमधील प्रतीकांचा आधार घेऊन प्रबोधन केले व संघटन उभे केले.
1932 ला सत्याग्रहींसमोर राष्ट्रसंतांनी जे भजन सादर केले ते व पुढील भजने ही प्रेरणास्पद होती.प्राचीन भारतीय सांस्कृतिक राष्ट्राचे दर्शन करून देणारी होती.
प्यारा हिन्दुस्तान है,गोपालोंकी शान है।
वीरोंका मैदान इसमें, भक्तोंके भगवान है ।
आवो इसे जगायेंगे, भारतको बदलायेंगे ।
बालवीर उठो तुम तो , ऋषितुल्य संतान है॥
प्राचीन भारताचा परिचय करून देणारे हे भजन..
यहांपर भी हनुमान थे ,
अर्जुनसे बलवान थे ।
महाराणा प्रताप इसमें,
शिवाजी के प्राण थे ।।
शूर,वीर योध्दा या भूमीवर जन्माला आले. शक्तिशाली हनुमान ,अर्जुन ,महाराणा प्रताप व साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीला भेदून मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिन्दवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीचे. इतिहासातील प्रसंग त्या समाजाला शत्रूशी लढण्याची प्रेरणा देतात. वंदनीय राष्ट्रसंतांनी सामान्य माणसाला ब्रिटिशांविरुध्द लढण्यासाठी सिध्द केले. एकदा “स्व” जागृत झाला की जनता साम्राज्यवादी शक्तीशी प्राणपणाने लढते हे चिमूर,आष्टीच्या लढ्यातून दिसून आले.
गुलामगिरीत हरवलेला “स्व” समाजाला सत्वहिन करतो. परकीयांचा धर्म व चालीरीती समाज स्वीकारतो.आपले गतवैभव हा समाज हरवून बसतो. अशा स्वकीयांमधे राष्ट्रीय चेतना निर्माण करणे मोठे अवघड काम असते.विस्कळीत समाजाला संघटीत करण्यासाठी,त्याचे मनोबल वाढविण्यासाठी मध्ययुगीन कालखंडातील भक्तीआंदोलनाने फार मोठे कार्य केले.देवभक्ती सामाजिक ऐक्याचा भक्कम आधार आहे याची प्रचिती आली. तामिळनाडूतून निघालेल्या या प्रवाहाने संपूर्ण भारतवर्षाला प्रेरित केले. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज यांनी काढलेल्या आळंदी ते पंढरपूर वारीने 13 व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटात सामाजिक क्रांती घडवली.याचा मुख्य आधार “विठ्ठल नामाचा गजर” हाच होता.
वंदनीय राष्ट्रसंतांनी 1935 ला सालबर्डी येथे महायज्ञाचे आयोजन केले. हजारोंची उपस्थिती होती.आपली संस्कृती व परंपरा हा आधार हिन्दू समाजाला प्रचंड संख्येत एकत्र करतो याचे हे उदाहरण. पुढे आरती मंडळाची स्थापना व त्याचे श्रीगुरुदेव सेवा मंडळात केलेले रूपांतरण,ही संघटनेची मुहुर्तमेढ होती.
वंदनीय महाराजांच्या समाज जागरणाची माध्यमे भाषण,किर्तन व भजन ही आहेत.देवभक्ती, समाजभक्ती व राष्ट्रभक्ती चा संस्कार जनमाणसामधे रुजावा यासाठी हिन्दू संस्कृती मधील चांगल्या परंपरांवर कार्यक्रमांचे आयोजन करणे, चातुर्मासातील महाराजांची भाषणे गुलामगिरीच्या कालखंडात समाजाचे मनोबल वाढविणारी होती. रोजच्या सामुदायिक प्रार्थनेतून माणूस निर्माण करणे हे उद्दिष्ट दिसून येते. परमेश्वराच्या नामस्मरणाची गोडी, सामान्य उपासकाच्या मनाचा विकास,वसुधैव कुटुंबकम चा संस्कार हे सर्व उच्चतम जीवनासाठीचे आवश्यक गुण आहेत. निरंतर साधनेतून हे शक्य आहे याचा अनुभव अनेक आदर्श कार्यकर्त्यांच्या जीवनातून दिसून येतो.
1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनातील राष्ट्रसंतांचे योगदान हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. ग्रामीण भागातील जनतेचा हा लढा. चिमूर-आष्टी व पुढे संपूर्ण विदर्भातील अनेक गावांतील सामान्य माणसांच्या या आंदोलनाने संपूर्ण भारताला प्रेरणा दिली. जेंव्हा समाजाला “स्व” चा बोध होतो तेंव्हा तो गुलामगिरीच्या विरूद्ध लढण्यास सिद्ध होतो. वंदनीय महाराज भगवान श्रीकृष्णालाच या भूमीवर येण्याचे आवाहन करतात. राम,कृष्ण हे तर या राष्ट्राचे मानबिन्दू आहेत.भारताचे भावविश्व या दोन राष्ट्रपुरुषांनी व्यापून टाकले आहे.
कधी येशील मनमोहना,
पाहण्या भारत अपुला पुन्हा ।
समाजानेच विराट रूप धारण केले व ब्रिटिशांविरुध्द दंड थोपटले.
अति गुलाम जन जाहले,
येणेचि राष्ट्र नासले,तोडण्या येई बंधना ।।
परमेश्वराला केलेल्या विनंतीने जनताजनार्दन जागृत झाला. रामकृष्ण ,संत व ऋषिमुनींच्या या पावन भूमीला परदास्यातून मुक्त करणे हे ईश्वरी कार्य आहे. हा राष्ट्रधर्म आहे. हे जनतेने मानले होते. म्हणून तर महाराजांच्या आदेशावरून अनेक गावातील स्त्रीपुरूष आंदोलनात सामील झाले. राष्ट्र शक्तीचे दर्शन घडले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यातून घडलेल्या पहिल्या पिढीने स्वतःला समाज कार्यात झोकून दिले.महाराजांच्या प्रेरणेतून भूदान चळवळीत अनेक गुरुदेव भक्त सहभागी झाले.स्वतःची जमीन दान केली. आध्यात्मिक जीवन हे स्वतःच्या पलिकडचा विचारच नाही तर तसा व्यवहार घडवून आणते हे भूदान चळवळीत दिसून आले.
गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य रोज चालणारे आहे.रोज परमेश्वराची भक्ती व त्यातून मनुष्य निर्माण हा अखंड यज्ञ आहे.हे काम सोपे नाही.ही साधना आहे. काही सेवकांसाठी तर ती तपश्चर्या आहे.अशा अनेक गुरुदेव भक्तांनी स्वतःचे जीवनच या कार्याला वाहून दिले. गावागावात तयार झालेले भजनी मंडळ, वंदनीय महाराजांचे पुण्यतिथी महोत्सव, किर्तन, गोपालकाला, महाप्रसाद यामुळे धार्मिक व आध्यात्मिक जागरण नित्यनेमाने सुरू आहे. ग्राम सुधारणेचा व समरस समाज निर्मितीचा हा एक यशस्वी कार्यक्रम या प्रणालीने दिला आहे.
व्यक्ति धर्म, कुटुंब धर्म ,गाव धर्म, समाजधर्म।
बळकट होई राष्ट्र धर्म प्रगतिपथाचा ॥
हा मार्ग वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितला. हजारो गुरुदेव उपासक याच मार्गावरून अव्याहतपणे चालत आहेत.
जय गुरुदेव !
भारत माता की जय !!