सामाजिक समरसता मंच, समरसता साहित्य परिषद किंवा भटके विमुक्त विकास परिषद या सर्व कामांची वैचारिक प्रेरणा डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर(babasaheb ambedkar)या थोर पुरुषांकडून आपण घेतलेली आहे.
समरसतेच्या आजच्या विकसित संकल्पनेच्या मुळाशी या महापुरुषांचे विचारधनच आहे. त्यातील एक सूत्र असे आहे की, जोपर्यंत समाजातील तळागाळातील माणूस आत्मगौरवाने उभा राहत नाही, तोपर्यंत हा देश उभा राहणार नाही. केवळ या थोर पुरुषांमुळे देश मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा स्तर मोठा व्हावा लागतो. सर्वसामान्य माणसाच्या मनात आत्मविश्वास, आत्मगौरव असावा लागतो. आपल्या समाजाविषयी आणि राष्ट्राविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात पराकोटीचे प्रेम असायला पाहिजे.
या दृष्टीने पाहिल्यास डॉ. बाबासाहेबांचे या संदर्भातील योगदान महाप्रचंड आहे. माझ्या मते, त्यांचे राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठे काम कोणते असेल तर त्यांनी समाजातील सर्वात खालच्या श्रेणीत असलेल्या माणसाला जागे केले. हजारो वर्षे हिंदू समाजातील अस्पृश्य जाती सामाजिक रचनेत अगदी तळाशी होत्या, त्यांना सामान्य नागरी अधिकार, सामाजिक अधिकार, राजकीय अधिकारदेखील नव्हते. सामाजिक गुलामीत ते पिचत पडलेले होते. बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी अस्पृश्यांनादेखील अस्पृश्यता हे सामाजिक पाप आहे, याची जाणीव नव्हती. त्याचप्रमाणे सवर्णांनाही त्याबद्दल काही वाटत नव्हते. रूढींचे पालन करणे हाच सनातन धर्म आहे, अशी सर्व समाजाची भावना झाली होती.
सामाजिक गुलामीत जगणाऱ्या माणसाला शेकडो वर्षांच्या सामाजिक गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रवृत्त करणे, त्याला लढण्यास उभा करणे ही सामान्य गोष्ट नाही. १९२० पूर्वी राष्ट्रजीवनात समाजाच्या तळागाळातील माणूस आणि जातव्यवस्थेच्या उतरंडीतील शेवटच्या पायरीवरचा माणूस कोठेच नव्हता. त्याला बरोबर घ्यायलाच कोणी तयार नव्हते. २०१६ म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांत परिस्थितीमध्ये मूलगामी परिवर्तन झाले आहे. आज वंचित समाजातील व्यक्ती राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्रिपद भूषवू शकते. विद्यापीठाची कुलगुरू होते. उद्योग क्षेत्रात उद्योजक म्हणून सन्मानाने वावरते. साहित्य, संगीत, कला, सिनेमा, नाट्य ते आर्थिक संस्था, विदेशातील राजदूत अशा सर्व पदांवर तळागाळातील माणूस पोहोचला आहे. राष्ट्रापासून वंचित असणाऱ्या कोट्यवधी लोकांना डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्रजीवनात सहभागी करून घेण्याची व्यवस्था उत्पन्न करून जी राष्ट्रसेवा केली आहे, त्याचे मोल करता येणार नाही.
या राष्ट्राचा फार गंभीरपणे आणि अत्यंत सखोलपणे बाबासाहेबांनी विचार केल्याचे लक्षात येते. माझ्या मते बाबासाहेबांचे भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भातील सर्वात मोठे योगदान कोणते असले, तर त्यांनी राष्ट्रवादाला चौथी मिती जोडली. जन, भूमी, संस्कृती हे तीन घटक राष्ट्रवादाची जगन्मान्य त्रिमिती आहेत. तेवढ्याने राष्ट्र बनत नाही, हे बाबासाहेबांनी पटवून दिले आहे. ही चौथी मिती आहे, सार्वत्रिक बंधुभावनेची. हे बंधुभावनेचे तत्त्व नसले तर समाज दुभंगलेलाच राहणार आणि त्यामुळे राष्ट्र दुर्बळ राहणार. जेव्हा राज्यघटना अंतिमतः तयार झाली तेव्हा जी उद्देशिका निर्माण झाली, त्यात बंधुभावना हा शब्द बाबासाहेबांनी योजलेला आहे. ती बंधुभावना कायद्याने देता येत नाही. कायदा हा संरक्षणात्मक असतो, तो कोणत्याही हक्काच्या सार्वत्रिक रक्षणाची हमी देऊ शकत नाही.
https://x.com/VSKKokan/status/1070603766544515073?t=517UxDkLUrKLL9Banset0A&s=08
व्यक्तीला जे अधिकार मिळाले आहेत. उदा. स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणाची हमी बंधुभावनेची मानसिकता देऊ शकते. बाबासाहेबांच्या सर्व विचारांची मुळे आपल्या भारतीय जीवनदर्शनात आहेत.
भारताचा इतिहास सांगतो की, जेव्हा जेव्हा भारताची केंद्रसत्ता दुर्बळ झाली, तेव्हा तेव्हा भारत परकीय आक्रमणाचा शिकार झाला आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती बाबासाहेबांना नको होती, म्हणून त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राने सर्व सत्ता हाती घेण्याची व्यवस्था राज्यघटनेत करून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेबांना प्रबळ केंद्रसत्ता तर हवी, परंतु त्याच वेळी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रादेशिक आणि भाषिक अस्मिता प्रबळ असतात. त्या दाबून टाकता येत नाहीत आणि चिरडून टाकण्याची तर कल्पनाही करता येत नाही. व्यापक राष्ट्रीयतेच्या संदर्भात त्याचा योग्य विकास होणे गरजेचे आहे. बाबासाहेब अनेक वेळा एडमंड बर्कचे वाक्य उद््धृत करीत – “सत्ता देता येते, पण शहाणपण देता येत नाही.’ बाबासाहेबांची महानता यात आहे की, त्यांनी राज्यांना सत्ता दिली आणि केंद्राला शहाणपण दिले.
आपली राज्ये अनेक बाबतींत स्वायत्त आहेत; परंतु ती सार्वभौम नाहीत. सार्वभौम भारत आहे. बाबासाहेबांनी देशाला एक चलन दिले. एक नागरिकत्व दिले. सर्वांना समान राजकीय, आर्थिक, सामाजिक अधिकार दिले. आम्हाला खऱ्या अर्थाने भारत ही संकल्पना दिली. आज जी युवा पिढी उभी राहत आहे, ती बाबासाहेबांच्या संकल्पनेतील संपूर्ण भारताचा विचार करणारी पिढी आहे.
डॉ. बाबासाहेबांनी मूर्त स्वरूपातील राष्ट्रराज्याची संकल्पना आपल्यासमोर मांडली आहे. केवळ भौगोलिक सलगता आणि सांस्कृतिक एकता यानेच राष्ट्र होत नाही. याचा अर्थ या गोष्टी नसल्या तरी चालतील असे नाही, त्या तर हव्याच आहेत; परंतु राष्ट्राचा प्राण राष्ट्राच्या भावनिक एकतेत असतो.
आम्ही एक आहोत – मग आमची भाषा कोणतीही असो, आमचा उपासना पंथ कोणताही असो; पण आम्ही एक राष्ट्र आहोत, ही भावना महत्त्वाची आहे. बंधुभावनेचे तत्त्व यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. बाबासाहेबांनी निर्माण केलेली राज्यघटना आपल्याला लोकशाही देते. भारत ही संकल्पना देते, एक सशक्त राज्य रचना देते. ही सर्व रचना सामाजिक न्यायाच्या मजबूत पायावर उभी करते. राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचे हे योगदान अलौकिक स्वरूपाचे आहे.अशा या महापुरुषास कोटी कोटी प्रणाम !!!
लेखक :- रमेश पतंगे
https://divyamarathi.bhaskar.com/news/dms-ramesh-patange-article-on-dr-5236552-nor.html