
हिंदू समाज खूप भाबडा आहे. उदार आहे. सहिष्णू आहे. स्वा. सावरकरांनी या त्याच्या गुणांना एक शब्द वापरला आहे. सद्गुण विकृती !
भूतकाळात, मागील इतिहासात या सगळ्याची फळे भोगून ही आम्ही काही शिकत नाही किंवा तात्कालिक भावनांचा भर ओसरल्यावर इतिहासातील चुका करण्यास पुन्हा सिद्ध होतो. हेच आमचे वैशिष्ट्य बनले आहे.
‘वास्को द गामा’ च्या भरकटलेल्या जहाजाला केरळ च्या किनाऱ्यावर सुरक्षित घेवून येणारा दर्यावर्दी व्यापारी हिंदूच होता. पुढे या वास्को गामा ने आणि झेवियर नावाच्या पायाने गोव्यात धार्मिक हिंसाचाराचा जो नंगानाच घातला, मंदिरांचा जो विध्वंस केला हे आम्ही विसरून गेलो आणि या झेवियर ला सेंट करून त्याच्या नावाने असलेल्या शाळेत, कॉलेज मध्ये आमच्या मुलांना पाठवत राहिलो आणि आम्हीच आम्हाला अहिंदू करत राहिलो. भारताचा शोध वास्को द गामाने लावला असे धडे गिरवत राहिलो.

मदर तेरेसा नामक पुतना मावशीला सेवेचे दुसरे रूप मानून तिच्या धर्मप्रसाराची कामे, अन्य बेकायदेशीर व्यवहार यावर पांघरूण घालत राहिलो.
इंग्रजांच्या सरकारी कवचाखाली मिशनरी काम फोफावत गेले. एकीकडे भोळ्या भाबड्या वनवासी बांधवांना सेवेचे रूप घेवून त्यांच्या श्रद्धा अस्थिर करायच्या, शहरी भागात शिक्षण आणि अन्य ecosystem वापरून हिंदूंना अश्रद्ध, असामाजिक अहिंदू बनवणे अशा दुहेरी डावपेचात हिंदू समाज सापडला आणि त्याचे गंभीर परिणाम आज सर्वत्र आपण बघत आहोत.
बायबल या ग्रंथाचा अभ्यास नसताना त्यातील निवडक प्रकरणं समोर ठेवून हे सेवेच्या नावाखाली धर्मांतरे करत असताना, असामाजिक संवेदन हीन हिंदू समाज नकळत आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अशा पद्धती स्वीकारत गेला ज्याची पाळेमुळे ख्रिश्चन तत्वात होती. यातील प्रमुख दोन गोष्टी ज्या ठळक पणे दिसतात त्यामध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि नववर्ष साजरा करण्याची पद्धत !
काल गणनेची शास्त्रीय हिंदू पद्धत अस्तित्वात असताना आम्ही ती सोडून दिली. आमचे शाळेपासून सगळे वेळापत्रक बदलले. चैत्र महिन्यात सृष्टी नवीन रूप धारण करते त्यावेळी नववर्ष सुरू करण्याची हिंदू मान्यता आहे पण ३१ डिसेंबर ला रात्री धुमाकूळ घालत , रोषणाई करत आम्ही कधी स्वतः ला धन्य मानायला लागलो ते आम्हाला कळलेच नाही.

औक्षण करून, दीप प्रज्वलन करून वडीलधाऱ्या मंडळी ना नमस्कार करून आशीर्वाद घेण्याची पद्धत सोडून आम्ही मेणबत्त्या विझवणारे, उष्टे केक भरविणारे नतदृष्ट बनलो, ही शोकांतिका आमची झाली.
या दोन्ही गोष्टी कधी काळी शहरी भागापर्यंत मर्यादित होत्या. टीव्ही, त्यात ही रंगीत टीव्ही, जाहिराती आणि चित्रपट या माध्यमातून गल्लोगल्ली, घरोघरी, खेडोपाडी हे उपचार पसरले. जोडीला इंग्रजी माध्यमाच्या convent शाळा. नकळत पप्पा, मम्मी, डॅडी, मॉम हे शब्दप्रयोग आणि मेणबत्त्या विझवत केक कापणे हे स्टेटस सिम्बॉल बनले. एकीकडे व्यक्तिगत मोक्षासाठी तथाकथित धार्मिक परंपरा जपणारे आम्ही सामजिक दृष्ट्या गतीने अहिंदू होत गेलो.
हा सगळा प्रपंच मांडण्याचे कारण म्हणजे नाताळ सण जवळ येतो आहे आणि या निमित्ताने ठिकठिकाणी सांता क्लॉज डोकावू लागला आहे. आता पासून सामाजिक माध्यमात हा सांता झळकू लागला आहे आणि त्याला झळकण्या साठी निरागस पणें मदत करणारे आमचे भोळे भाबडे हिंदू बांधवच आहेत. आता काही दिवसांनी हॉटेल मध्ये स्वागतासाठी तो उभा राहिलेला दिसेल ! कपड्यांच्या दुकानात त्याचा वेष परिधान केलेले पुतळे आणि जिवंत माणसे दिसतील. आई वडील खास त्याची माहिती आपल्या मुलांना माहिती देतील. ठिकठिकाणी त्या खास टोप्या विक्रीला येतील. शाळेत स्नेहसंमेलन असतील त्यात वेशभूषा स्पर्धा असतील त्यात आम्ही आमच्या निरागस मुलांना सांता आणि मदर तेरेसा बनवून स्वतः धन्य होवून जाऊ.

यात काही चुकते आहे असे वाटले तरी बोलायचे कसे ? आपण मागासलेले, प्रतिगामी ठरू. कारण एकूणच या इको सिस्टिम ने श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची विभागणी तुम्ही कोणत्या देवाला मानता या नुसार करून टाकली. वासुदेव, वाघ्या मुरळी, गोंधळी, भारुडी हे परंपरागत लोककला सादर करणारे, जीवन मूल्यांची आठवण करणारे कलाकार अंधश्रद्धा चे प्रतीक ठरवत आम्ही नाकारले. त्यांच्या कला मारल्या. त्यांचा उदरनिर्वाहाचे साधन संपवले आणि दुसरीकडे सांता मात्र आम्ही उचलून धरत असा कोणी तरी देवदूत तुम्हाला सुखी करण्यासाठी येतो आहे हे मात्र वैज्ञानिक श्रध्देने प्रतीक बनवले.
आमचे तीर्थ, प्रसाद म्हणजे अंधश्रद्धा पण तेच पाद्री मंत्र म्हणून देत असलेला पाणी म्हणजे येशूचा वैज्ञानिक चमत्कार ! आम्ही केलेली देवाची प्रार्थना, उपवास ही अंधश्रद्धा पण रविवारची चर्च मधील प्रार्थना म्हणजे येशूचा विज्ञानवादी आविष्कार. पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्या गॅलिलिओला तुरुंगात पाठवणारा संप्रदाय विज्ञानवादी आणि ग्रहांच्या स्थितीवर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कधी असणार ? हे सांगणारा हिंदू धर्म मात्र अवैज्ञानिक !

आमच्या लोककला मध्ये शिरणारा विकृत पणा रोखण्याचे सोडून त्याला प्रोत्साहन देत आम्ही आमचेच हसे करून घेतले. सगळीकडे अत्याचार होण्याचे ठिकाण मंदिर, अत्याचार करणार कोण ? तर शेंडी ठेवलेले पुजारी आणि या असहाय अत्याचारित महिला, मुले यांना आसरा कोण देणार तर हमखास चर्च चा पाद्री.
अनाथ बालकांना बेवारस सोडणारे हिंदू आई बाप पण अनाथ गृहे ( ऑर्फन ) चालवणारे मात्र ख्रिश्चन पाद्री.
हे सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी यात चित्रित होत असताना आम्ही बघत राहिलो आणि त्याचा सुप्त मनशक्ती वर होणाऱ्या परिणामातून आमच्याच विरुद्ध आम्ही विमर्श कधी प्रस्थापित करत गेलो हे आम्हाला कळलेच नाही.
हे सर्व आता थांबवायची गरज निर्माण झाली आहे. मध्य युगात वावरणाऱ्या एकेश्वर वादी पंथानी संपूर्ण मानव सृष्टीचे नुकसान केले आहे. या पंथातील तत्वज्ञानाचे सार म्हणजे survival of the fittest हे आहे. त्याला उत्तर जर सर्वे भवंतू सुखिनः असेल तर आपल्या समाजाला पुन्हा हिंदुकरण करावे लागेल.

हिंदू समाजाला वैयक्तिक मोक्षा बरोबर पुन्हा ओम् सहना भवतू, सह नौ भुनक्तु याची आठवण करून द्यावी लागेल त्यासाठी भोगवादी परंपरा सोडाव्या लागतील, सांता नाकारावा लागेल ! आपण त्यात किती यशस्वी ठरतो हे काळ ठरवेल. त्यासाठी स्वतः पासूनच सुरुवात करावी लागेल.
लेखक : रवींद्र मुळे.