( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )
Inquisition…
धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पान आहे.नास्तिक लोकांना, चेटुक करणार्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे.
पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर ‘न भूतो न भविष्यति’ असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.
भारतात Inquisition क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा ‘ क्रूरकर्मा संत’ फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं.
goa inquisition..
इन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, ‘पाखंडी’ मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला.
हिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली.अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत!!!
गोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात खांद्यापासून उपटले जात. पोर्तुगालमधून एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्यांना जोर चढला होता. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले.
saptakoteshwar temple goa…
दिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले.जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले.इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा “महापराक्रम” केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील शिवलिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली.
आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे.
क्रमशः-