East or West “आकाश” is the best..
India demonstrates unmatched ‘Astrashakti’ as ‘Akash’ unit neutralises four targets in one go a global first
Thumbnail वरून आपल्या लक्षात आलंच असेल आज पर्यंत अमेरिका, रशिया, चीन, जापान या बलाढ्य,धनाढ्य देशांना देखील जमलं नाही ते आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या तुमच्या-माझ्या प्राणप्रिय भारतराष्ट्राने करून दाखवले आहे.
भारतानं जगाला दाखवली ‘स्वदेशी’ची शक्ती..
स्वदेशी आकाश क्षेपणास्त्राने (Akash Missile) एकाच वेळी चार लक्ष्ये भेदण्यास यश मिळवले असून ही उत्तुंग कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
आंध्र प्रदेशातील सूर्यलंका हवाई दलाच्या स्थानकावर अस्त्रशक्ती २०२३ सराव दरम्यान स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या अग्निशमन क्षमतेचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. भारतीय हवाई दलानं (IAF) आयोजित केलेल्या सराव दरम्यान एका क्षेपणास्त्र प्रणालीनं एकाच वेळी चार मानवरहित हवाई लक्ष्यांना भेदलं.भारतीय हवाई दलानं 12 डिसेंबर रोजी सूर्य लंका एअर फोर्स स्टेशनवर है प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं. चाचण्यांबाबत स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारताने स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची मारक क्षमता दाखवली, जिथे एकाच वेळी चार मानव रहित हवाई लक्ष्य भेदण्यात आली.
Surface-to-air missiles (SAMs) स्वदेशी आकाश शस्त्र प्रणालीची रचना डीआरडीओनं केली आहे. ही स्वदेशी वेपन सिस्टीम खरेदी करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी ऑर्डर दिली आहे. ही यंत्रणा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांद्वारे सातत्याने अपग्रेड केली जाते. ‘आकाश वेपन सिस्टीम (AWS) ही लहान श्रेणीची ‘सरफेस टू एअर हवाई संरक्षण प्रणाली’ आहे. ही सिस्टिम शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून मोठ्या क्षेत्राचं संरक्षण करण्यास सक्षम आहे.
‘आकाश‘ ऑटोनॉमस किंवा ग्रुप मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेटू शकते. ही संपूर्ण शस्त्र यंत्रणा मोबाईल प्लॅटफॉर्मवर तैनात आहे. ही प्रणाली लक्ष्य शोधण्यापासून ते मारण्यापर्यंतची प्रक्रिया अतिशय वेगानं पार पाडते. विशेष म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. तसेच ती रेल्वे किंवा रस्त्याने देखील वाहूनही नेली जाऊ शकते.
आत्मनिर्भर भारत..
भारताची संरक्षण (Defence) क्षेत्रातील निर्यात १४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. ही आकडेवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षातील आहे.संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत देशातील खासगी क्षेत्राचा वाटा ७० टक्के तर सरकारी कंपन्यांचा वाटा ३० टक्के आहे.
अमेरिका, फिलिपिन्ससह इतर देशांना भारताने संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. वाजवी दर आणि उत्तम दर्जा या दोन कारणांमुळे भारताच्या संरक्षण उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी वाढू लागली आहे.
आशिया आणि आफ्रिका खंडातील देश हे लवकरच भारतीय संरक्षण उत्पादनांची मोठी बाजारपेठ ठरणार आहेत. जो भारत संरक्षण क्षेत्रात मोठी आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता.. तोच भारत संरक्षण क्षेत्रात आता हजारो कोटी रुपयांची निर्यात करू लागला आहे. पुढील काही वर्षांत संरक्षण क्षेत्रातील निर्यात नवनवे उच्चांक गाठेल यात कोणाचेही दुमत नाही.
भारतीय उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, सैन्य सामग्री आयात करणारा देश अशी ओळख पुसून काढत सैन्य सामग्री उत्पादक देश व निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण होतेय. तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप, इनोव्हेशन या गोष्टींच्या बळावर भारत आत्मनिर्भर होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत आत्मविश्वासाने प्रगती करत आहे.
“Protection and security are only valuable thing in the world” – Mao Zedong
राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपविता येत नाही किंवा त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता येत नाही.भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक प्रगतीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी प्रबळ सैन्यव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नव्याने उदयास येत असलेल्या बहुध्रुवीय सत्तेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याच गतीने जर आपला सैन्यविकास सुरू राहिला तर, स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तिशाली सेना म्हणून आणि हे भारतराष्ट्र “विश्वगुरू” (vishwaguru) म्हणून नक्कीच उदयास येईल यात तीळमात्र शंका नाही..
नुकताच भारत 4 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाला आहे.. जो देश दहा वर्षांपूर्वी लष्करी साहित्य आयात करणारा म्हणून जगत विख्यात होता आज तोच देश लष्करी साहित्य निर्यात करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे..एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आता वेगळ्याच वर्णावर येऊन ठेपला आहे दुसऱ्या बाजूला इजराइल हमास युद्धामुळे संपूर्ण जग व्यथित चिंतातूर असताना भारत मात्र आपल्या “स्व” चे जागरण करून प्रगतीच्या,विकासाच्या,उन्नतीच्या म्हणजेच विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर गुलामगिरीची मरगळ झटकून वेगाने घोडदौड करीत आहे..
अर्थव्यवस्थेने कंगाल झालेल्या आपल्या शेजारी राष्ट्राच्या (नाव घ्यायची देखील इच्छा होत नाही) काळजीवाहू पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, “आम्ही कश्मीर साठी भारतासोबत 300 युद्ध लढू शकतो..” आमच्या सख्या शेजाऱ्यांनी आता खरोखर मनन ,आत्मचिंतन,आत्मपरीक्षण करावे,आता आम्ही तुमचे नाव देखील उच्चारणे सोडून दिले आहे.भारताच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत अश्या नापाक चिखलात पाय रुतवून बसणे आता आम्ही सोडून दिले आहे. “मायबाप” चीनच्या खांद्यावर बसून आम्हाला डोळे दाखवणे आता बंद करावे.बिना स्फोटकांच्या ब्राम्होस मिसाइलने तुमच्या तोंडचे पाणी पळवले होते, हे कदापि विसरू नये..
यदा कदाचित भविष्यात भारताला शेजारी शत्रूराष्ट्रांशी महाभारताचे युद्ध प्रत्यक्ष रणांगणावर खेळावे लागले तर आपल्याकडे नाग, त्रिशूल, ब्राम्होस, अग्नी,रुद्र,पृथ्वी,अस्त्र,आकाश,शौर्य,प्रहार.. ही अस्त्रे सज्ज आहेत. मात्र एकाचवेळी ४ लक्ष्यांवर आघात करणारे “आकाश ” आपल्याकडे आहे हे पाहूनच शत्रू माघार घेऊनच कदाचित होऊ घातलेले महाभारत टळू शकेल..
भारत राष्ट्रासाठी अविश्रांत मेहनत करणाय्रा शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.. !!!
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ॥