( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )
दीपाजी राणे..
सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बंडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे उत्तम नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.
दीपाजींनी म्हादई नदीच्या किनार्यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले.
इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.
दीपाजींच्या लोकांनी पोर्तुगीज सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या.
२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.
सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.
portuguese palace in panjim..
अश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. दीपाजींनी भेटीचे आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी भेटीचे आमंत्रण घेऊन येणाऱ्या पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेवून घेतले.
दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.
पण शेवटी २८ मे १८५५ रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करुन दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा ‘पराभूत झालो तरी तंगडी वर.’ अश्या पद्धतीची आहे. वटहुकुम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबुल करुन दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरु नये म्हणुन थोडे तरी द्रव्यसाहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला..नाहीतर…
दीपाजींचे बंड तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत ३ वर्षे केले. पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात फंदफितूरी झाली नाही. जनतेने त्याना योग्य साथ दिली.यातच त्यांचे श्रेष्ठत्व. त्यांचे बंड हे जनतेच्या कैवारातुन व त्यांच्या स्वतःच्या हंकावर केलेल्या आघातातुन स्फुरले होते. ते सर्वार्थाने जनतेचे बंड होते.
दीपाजींच्या बंडानंतर गोव्यात स्थानिक पातळीवर लहान लहान उठाव झाले.या वेळेला इतर भारतातही इंग्रजांविरुद्ध लोक हळूहळू उठाव करत होते, आणि गोव्यातील जनता या सगळ्या प्रयत्नांकडे मोठ्या आशेने पाहत होती.
सन १८९४ मधे पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनी बंड केले होते. हे बंड शमविण्यासाठी गोव्यातील शिपायांच्या तुकड्या ३० सप्टें. १८९५ ला आफिकेत पाठवायचा पोर्तुगाल सरकारचा हुकुम २६ ऑगस्ट्ला सुटला. त्यात भर म्हणून शिपायांना नविन पद्धतीची काडतुसे देण्यात येत होती. ती दातांनी उघडावी लागत. त्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी अफवा पसरली. आपणाला आफ्रिकेत पाठवुन बाटवणार असा शिपायांचा समज झाला.
वळवईच्या बंडाचा (सन १८७०) समेट करताना सरकारने वचन दिले होते की, सैनिकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भारताबाहेर पाठविण्यात येणार नाही. पण ते वचन मोडल जात होते. यामुळे हिंदु-मुसलमान सैनिक बिथरले. १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शिपाई आपापली शस्त्रे व दारुगोळा घेउन बाहेर पडले आणि त्यांनी सत्तरीची वाट धरली.गव्हर्नरला हे बंड शमविण्यासाठी शिपायांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.
क्रमशः