( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )
विसावे शतक सुरु झाले. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध ४ शतके गोमंतकीय जनता झुंजत होती.पण आक्रमणाशी मुकाबला करताना त्याच्या सामर्थ्याचा , आयुधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणुन गोमंतकीय हिंदू पोर्तुगीज शिक्षणाकडे वळले.
सन १९०७ मधे सरकारने प्राथमिक शिक्षणात “ख्रिश्चन डॉक्ट्रिन” हा विषय अंतर्भूत केला आणि हिंदूंना सरकारी शाळेत शिक्षक होण्यास बंदी घातली. तोपर्यंत गोव्यात सरकारी प्राथमिक शिक्षकांपैकी फार थोडे हिंदू होते. ही बंदी म्हणजे आपल्यावरील हक्कांवरचे आक्रमण याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी एकजूटीने आवाज उठविला गोमंतकीय जागृत होत असल्याची ती निशाणी होती. ही बंदी १९१० मधे पोर्तुगालात प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंत चालू राहिली.
१९०८ मधे उर्वरित भारतात व गोव्यातही अनेक वैशिष्ट्यपुर्ण घटना घडल्या.
मुजफ्फराबाद येथे पहिला बाँब टाकण्यात आला, खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी जस्टिस किंग्ज्फॉर्डची गाडी समजून तीवर बाँब फेकला. पण तो त्यात नसल्याने बचावला. त्यातल्या २ गोर्या स्त्रिया ठार झाल्या. या बाँबफेकीची तरफदारी करुन लेख लिहिले म्हणुन टिळकांना पकडुन त्यांना ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगायला मंडालेस पाठविण्यात आले.
याच वर्षी पोर्तुगालात फेब्रुवारी महिन्यात राजा दो कार्लुश, व युवराज दों फिलीप ह्यांना गोळ्या झाडुन ठार करण्यात आले. राजपुत्र दो मानुएल राजमातेमुळे थोडक्यात बचावला. व नंतर राजा बनला.
या घटनांचा परिणाम गोमंतकीय तरुणांवर झाला गोमंतकात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होऊ लागले.भारतात क्रांतीकारी संघटना निर्माण झाल्या. त्यांना ब्रिटीश सरकार पकडण्याची शर्थ करु लागले. त्यातील काही क्रांतीकारक भूमिगत होउन गोव्यात आले.. केरीचे रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य यांनी शाळा उघडून त्यांना शिक्षक म्हणून नेमले. ही शाळा म्हणजे फोंड्यातले आजचे ए जे डी आल्मेदा हायस्कूल.
दादा वैद्य…
रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य
एवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.
दों मानुएल
गोमंतकात या घटनेचे उत्स्फुर्त स्वागत झाले. विशेषतः हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले. ४०० वर्ष राजकिय व सांस्कृतिक आक्रमणाचा प्रतिकार करीत जो छळ सोसला होता,त्याचा अंत होईल म्हणुन जनता आनंदित होती. हिंदुंना केवळ आनंदच झाला नाही तर त्यांनी आपली प्रगती करण्यासाठी कंबर कसली. या प्रयत्नांचे दृश्य स्वरुप ४ क्षेत्रांत प्रकर्षाने दिसुन आले.
१) नियतकालिके २) शैक्षणिक संस्था ३) सांस्कृतिक संस्था ४) राजकिय पक्ष
नियतकालिके..
१९०० मध्ये O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत प्रसिद्ध होऊ लागले.
गोमंतकियांना जागृत करुन कार्यप्रवृत्त करण्यात नियतकालिकांचा सिंहाचा वाटा आहे. आत्माराम सुखटणकरांच्या देशसुधारणेच्छुने मराठी माध्यमातुन शिक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा व पोर्तुगीजांच्या राजकीय धोरणावर टीकासत्र आरंभ केले. गोवा-मित्र (संपादक- सुब्राय नायक-मडगांव), journal daa Novas Conquistaa (संपादक गोविंद भास्कर पार्सेकर- पेडणे) यासरखी मराठी-पोर्तुगीज नियतकालिके १८८० च्या सुमारास लोकजागृती करत असत. मराठीतुन हिंदुंना जागविणे व पोर्तुगीजमधुन हिंदुंच्या भावना स्थानिक ख्रिश्चन व युरोपियनांपर्यंत पोचविण्याचे काम ही नियतकालिके करत. गोवा-मित्र वर १८८३ मधे बंदी आणली. मग म्हापश्यातुन आर्यबंधु व गोवा पंच , मडगावातुन गोवात्माही नियतकालिके सुरु झाले ३-६ महिनेच टिकली. दरम्यान दादा वैद्य पथ्यबोध नावाचे आरोग्यविषयक नियतकालिक चालवत.
१८८९ पासुन अजुन भर पडतच गेली न्यायचक्षु, गोमंतक सुविचार्, अशी मराठी तर A voz do Povo (जनतेचा आवाज), Mandovy (मांडवी) सारखी पोर्तुगीज नियतकालिके सुरु झाली.१८९४ मधे अतिशय जहाल असे साप्ताहिक पणजी शहरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे नाव O Brado Indiano. म्हणजे भारतियांनी मारलेली दु:खाची आरोळी.हे साप्ताहिक पोर्तुगीजांवर जहाल टीका करत असे. या साप्ताहिकाचे संस्थापक व प्रेरणाशक्ती फादर आल्व्हरिश होते. पाद्री आल्वारिश यांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती पुरी भिनली होती.ह्या साप्ताहिकाला केवळ १० महिन्याचे आयुष्य लाभले परंतु तेवढ्यात परक्या फिरंग्यांबदल जनतेच्या मनात क्षोभ निर्माण करण्यात ब्रादु इन्दियानु यशस्वी ठरला.
१९०० मध्येO Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले. हे गोमंतकातील पहिले दैनिक त्याच्या संपादक मंडळात त्यावेळचे विचारवंत, तेजस्वी तरुण मंडळी होती. आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतुन वर काढण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. लोकजागृतीचे व समाजप्रभोधनाचे कार्य या दैनिकातुन मोठ्या तडफेने होऊ लागले. या तरुणांच्या धडपडीकडे सरकारचे लक्ष गेले नसते तरच नवल . येराल्डो हे संपादक डॉ. आंतानियु कुन्य(कुन्हा) यांना अटक झाली. व आग्वादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले.
सांस्कृतिक पुनरज्जीवनाच्या काळात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. ‘हळदकुंकु’ व ‘सौभाग्यसंभार’ नावाची मासिके बायका चालवत. याच्या संपादिका होत्या सौ. सरुबाई रामचंद्र वैद्य. (दादा वैद्यांच्या पत्नी)
शैक्षणिक संस्था
गोमंतकीयांमधे राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या, जोपासण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या कामात मराठी शाळांचा व शाळामास्तरांचा सिंहाचा वाटा आहे. गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले.पण हिंदुंनी जशी आपली दैवते जपुन ठेविली, तशी मराठी भाषा व संस्कृती जीवापाड जतन केली. देवळांच्या अग्रशाळांमधे व धनिकांच्या घरात पंतोजी मराठीचे वर्ग चालवित असत. शिक्षणाची संधी सार्वत्रिक नव्हती. अभ्यासक्रम असलेली पहिली मराठी शाळा म्हापसा शहरात १८८५ साली रामचंद्र दत्ताजी आजरेकर यांनी स्थापन केली. आजुबाजुच्या गावांमधेही २०-२५ शाळा त्यांनी सुरु केल्या.
पणजीत त्याच सुमारास एक शाळा सुरु होती. तिला धेप्यांची शाळा म्हटले जाई कारण त्या शाळेचा खर्च श्रीमंत धेंपे करीत शाळेला संस्थेचे रुप देऊन तिचे नामकरण करण्याची प्रथा १९०५ नंतर सुरु झाली.५ ऑक्टोबर १९०८ रोजी पणजीत मुष्टीफंड संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक खांकेला झोळी लावुन दारोदार फिरत. प्रत्येक घरातुन मूठ-दोन मूठी तांदुळ त्यांच्या झोळीत पडे . या तांदळांच्या विक्रीतुन येणार्या पैशाने श्री महालक्ष्मी विद्यालय व सरस्वती विद्यालय या दोन मराठी शाळा संस्थेने सुरु केल्या. २००८ साली ह्या शाळेचा शतकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चर्चच्या आवारात पाद्रीही शाळा चालवत. को़कणी भाषेत, ज्या भाषेत गोव्याचे दैनंदिन व्यवहार चालत त्या भाषेत. फक्त त्यांनी कोकणीला रोमन भाषेचा साज चढविला.
गोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.
मुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.
सांस्कृतिक संस्थांचे कार्य :-
विद्यादायिनी सरस्वती माता
पुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व राष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.
१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन आणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.
गोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.
क्रमशः