ChristianityNews

गोवा मुक्ती दिन.. भाग 8

goa liberation day

( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )

हुकुमशहाचा उदय…

पोर्तुगालातील पर्यायाने गोवा (goa), दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते.

portuguese dictator salazar

कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्‍यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. तत्कालीन युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळे होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.

गोवा काँग्रेस कमीटी..

free goa magazine

सन १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य (कुन्हा) [टी. बी. कुन्हा] या गोमंतकाच्या सुपुत्राने ‘गोवा काँग्रेस कमिटी’ स्थापन केली. व ती भारतीय काँग्रेसला जोडली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करुन गोचा, दमण ,दीव या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या कमिटीचे उद्दिष्ट होते. गांधींच्या आदेशाप्रमाणे वागून राष्ट्रीय काँग्रेस मार्फतच स्वातंत्र्य मिळेल ही टी. बी. कुन्हांची धारणा होती. ही कमिटी गोव्यात गुप्तपणे काम करु लागली.

१९३५ च्या अधिवेशनात काँग्रेसने ठरविले की आपले कार्यक्षेत्र ब्रिटीश हिंदुस्थानापुरतेच मर्यादित ठेवावे. म्हणुन गोवा काँग्रेस बंद करण्यात आली. याच सुमारास पोर्तुगीजांनाही या संघटनेची माहिती मिळाली. व त्यांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र आरंभले. गोवा काँग्रेस बंद पडली म्हणुन कुन्हा डगमगले नाहीत. ते मुंबईला गेले व तिथुन आपले कार्य सुरुच ठेवले.
१९४५ नंतर दुसऱ्या महायुद्धात जगभर साम्राज्यवादी शक्ती निष्प्रभ होऊन स्वातंत्र्यवादी चळवळींना बळ मिळाले. याचा फायदा गोवामुक्ती संग्रामालाही निश्चितपणे झाला. गोव्यात सुरू झालेली सत्याग्रही चळवळ पोर्तुगीजांनी निर्घृणपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात येऊन ठेपल्यामुळे १९४६ मध्ये काँग्रेसने गोवामुक्तीची लढाई जाहीरपणे लढायचे ठरवले.

पंडित नेहरू यांची संभ्रमाची भूमिका..

Headquarters of the United Nations

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकार गोव्यालाही पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करेल अशी एक भाबडी अशा गोमंतकीय जनतेच्या मनात जागी होऊ लागली. नुकतेच पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मात्र शांतता मार्गाने समेट घडवून आणला पाहिजे अशी भूमिका घेतल्यामुळे गोव्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला. त्यांनाही कोणतीच ठाम भूमिका घेता येईना.

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त आय.पी.एस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी आपल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या आत्मचरित्रात या सगळ्या परिस्थितीचं सविस्तर वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ‘पोर्तुगीज आणि गोवा यांच्यामधील तेढीवर शांततापूर्वक तोडगा काढण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध होतं. त्यामुळे सार्वभौम पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.’

‘एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही’, असंही सिनारी लिहितात. नेहरूंच्या या भूमिकेबद्दल आपल्या पुस्तकात त्यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

प्रभाकर सिनारी म्हणतात, ‘जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.’

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा टिकून ठेवण्याच्या नादात त्यांनी गोमंतकीय जनतेचा विचार केला नाही. नेहरूंच्या धोरणाबद्दल सत्याग्रहींच्या मनात शंका निर्माण झाली. शांततापूर्ण समेट घडवून आणण्याचा पुरस्कार करून ते एका अर्थी पोर्तुगीजांनाच मदत तर करत नाहीत ना असा त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता’, असं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

क्रमशः

Back to top button