‘सागरी शिडनौका परिक्रमे’चे उद्घाटन..
दि. २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान मुंबई ते विजयदुर्ग केली जाणार सागरी परिक्रमा…
मुंबई, दि.२७: सागरी सीमा मंच, कोकण प्रांत व शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ डिसेंबर, २०२३ ते १ जानेवारी, २०२४ या कालावधीत शिडाच्या होडीने मुंबई ते विजयदुर्ग ही परिक्रमा केली जाणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात आयोजित या परिक्रमेदरम्यान स्थानिक समाजामध्ये सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण या विषयांवर जनजागृती केली जाईल. परिक्रमेचा उद्घाटन समारंभ काल दि. २७ डिसेंबर रोजी मच्छीमार नगर, कुलाबा येथे पार पडला.
यावेळी शिवशंभू विचार मंच कोकण प्रांताचे संयोजक व मुख्य वक्ते अभय जगताप यांनी समुद्र व त्यालगतच्या किनारपट्टीवरील आक्रमणाचा इतिहास जागवला. जंजिरा, गोवा, इ. ठिकाणावर आक्रमकांनी विध्वंस केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची सत्ता उलथून लावली व ‘ज्याचे आरमार त्याचा दर्या’ हे लक्षात घेऊन आरमाराची उभारणी केली, दोन शतकांनंतर आरमार बांधणारे एतद्देशीय राजे, म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी सांगितले. पोर्तुगिजांनी दर्यावर कब्जा करून ठेवला होता, त्या पोर्तुगिजांना गुडघे टेकून शरण यावयास लावण्याचा पराक्रम मराठ्यांच्या आरमारानी करून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्ती नव्हे, तर ती एक वृत्ती आहे, आपण सर्वांनी आपल्यामध्ये ही वृत्ती जागृत करायला हवी, आपण आपली ताकद विसरलो, म्हणूनच आक्रमक भारतात प्रवेश करू शकले. आता मात्र आपल्यामधील आत्मविश्वास जागा झालेला असून या समाजपुरुषाने आता नृसिंहाचे रूप घेतले आहे, शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात राममंदिराचे निर्माण झाले, हा एक चांगला योग जुळून आला आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. परंतु येणारा काळ हा संघर्षाचा आहे, त्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे व म्हणूनच या सागरी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे, सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत संयोजक केतन अंभिरे, शिवशंभू विचार मंचाचे महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात, श्री. मोरेश्वर पाटील,हे उपस्थित होते. सर्वोदय मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन जयेश भोईर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी यांनी प्रास्ताविक केले.
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या, असा प्रश्न अनेक लोक विचारतात, परंतु हे योग्य नसून, आपल्या घराच्या व गावाच्या रक्षणाची जबाबदारी ही आपलीच आहे, त्यासाठी इतर कोणास दोष देता येणार नाही, असे विठ्ठलराव कांबळे यांनी सांगितले, तर, आम्ही मच्छीमार जागरूक राहून किनार्यावर लक्ष ठेवून असतो, असे जयेश भोईर यांनी सांगितले.
या परिक्रमेत सहभागी होणार्या मोहीमकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. दीपक तांडेल यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
सुरक्षित किनारपट्टी – समृद्ध भारत..