डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३० व्या नामविस्तार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…

१९७७ साली सुरु झालेले विद्यापीठ नामांतर आंदोलन मराठवाड्यात चरम सीमेवर होते. १९७७ ला महाराष्ट्र विधानसभा आणि वरिष्ठ सभागृहाने छत्रपती संभाजीनगर स्थित मराठवाडा विद्यापीठास भारताचे राज्य घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीस मान्यता देवून नामांतर ठराव पारीत केला गेला. वास्तविक लगेच या निर्णयाची अंमल बजावणी होणे आवश्यक आणि स्वाभाविक होते. परंतु मोठे राजकारण झाले. हे नामांतर लगेच होऊ शकले नाही.
मराठवाड्याची प्रादेशिक अस्मिता या गोंडस नावाखाली रात्रंदिवस फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र असा नमाजप करणाऱ्या तथाकथित पुरोगामी समजवादी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यास अनाकलनीय विरोध केला. कॉंग्रेसने त्यात तेल ओतत आग सतत भडकत राहील अशी व्यवस्था केली. मराठवाडा भर त्यामुळे एक सामाजिक अशांतता निर्माण होईल अशी व्यवस्था केली गेली. सर्व प्रकारचा डॉ आंबेडकर विरोधी प्रचार प्रसार करण्यात आला. मराठवाड्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. समाज मन कलुषित झाले. समाजातील दलित द्वेष प्रचंड वाढविण्यात आला. हे पाप करण्यात जे दिग्गज सामील झाले त्यांचे नावं जरी समतावादी चळवळीतील अग्रणी म्हणून घेतल्या जात होते तरी ही समतेच्या चळवळीचे प्रणेते असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करणारे ही हेच होते. हे अनाकलनीय म्हणावे असे चित्र होते.

या उलट संघ परंपरे (जातीभेद विरहीत हिंदू समाज निर्मिती) नुसार नामांतर ठराव पारीत झाला तेंव्हा पासून संघ, सामजिक समरसता मंच, विहिंप, अभाविप, भाजपा यांनी मात्र नामांतराचे समर्थन केले. या समर्थनार्थ जनमानस तयार व्हावे या साठी सक्रीय सहभाग दिला. अभाविपच्या त्या काळातील जवळपास सगळ्या अधिवेशनात विद्यापीठ नामांतर समर्थन ठराव पारीत करण्यात आला. लॉंग मार्च मध्ये संघाचे तत्कालिन जिल्हा संघचालक श्री सुधीर तुकाराम उपाख्य आबासाहेब देशपांडे सह्भागी झाले.
सोलापूर ला विश्व हिंदू परिषदे ने पत्रकार परिषद घेवून विद्यापीठ नामांतरास पाठींबा दिला. अभाविपने संवाद पथकांच्या माध्यामतून गावो गावी जावून नामांतर समर्थना साठी जनमत तयार केले. माजी मंत्री आणि माजी विधान सभा अध्यक्ष आमदार श्री हरिभाऊ नाना बागडे, अखिल भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दादा लाड यांच्या सह अनेकानी गावोगावी फिरून ग्रामीण भागात वंचित दलित बांधवांवर अन्याय होणार नाही अशी काळजी घ्रेतली. असे सगळे असून ही जातीयतेचा आरोप मात्र संघावर केला गेला. या साऱ्या सामाजिक ताणतणाव पूर्ण स्थितीची दखल तत्कालीन संघ अधिकारी घेत होते.
समाजातील सोहार्द बंधुभाव बिघडू नये यासाठी सर्व प्रयत्न सूरु होते. काही तरी वेगळे काम करू अशा निर्णयाप्रत पोहचलेल्या डॉक्टर मंडळींच्या ही हे सारे होते. एक सेवा संस्था स्थापन करून एकाच छताखाली दर्जेदार आणि स्वस्त आरोग्य सेवा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध करून द्यावी असा मानस व्यक्त होत होता. पूर्ण चर्चे अंती अशी संस्था स्थापन करावी हे ठरले. या संस्थेला नाव काय असावे अशी चर्चा झाली.
श्री प्रल्हादजी अभ्यंकर,पद्मभूषण डॉ अशोक कुकडे, श्री दामू अण्णा दाते, श्री मुकुंदराव पणशीकर ,श्री भैय्याजी जोशी, श्री दादा इदाते, श्री गिरीश प्रभुणे, श्री रमेश पतंगे, श्री नाना नवले ही शिर्षस्थ मंडळी या प्रक्रियेत सहभागी होती. डॉ नरेंद्र कुलकर्णी, डॉ भारत देशमुख, डॉ ज्योस्त्ना क्षीरसागर, डॉ राजेंद्र क्षीरसागर, डॉ मंजुश्री कुलकर्णी ही वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स तर डॉ सतीश कुलकर्णी, डॉ अश्विनीकुमार तुपकरी, डॉ उपेंद्र अष्टपुत्रे हे छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यावसायिक डॉक्टर्स सहभागी होते. श्री अनिल भालेराव, श्री देवजीभाई पटेल, श्री बलराम येरमे, श्री सुधीर तुकाराम तथा आबासाहेब देशपांडे या सर्वांच्या सामूहिक चिंतनातून संस्थेस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला.
शासन जेंव्हा विद्यापीठास नाव देईल तेंव्हा देईल आपण मात्र आपण संघ म्हणून आपल्या संस्थेस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देवून सामाजिक समतेच्या दृष्टीने पाऊल टाकण्याचे ठरविण्यात आले. १९८८-८९ साली मराठवाड्याच्या केंद्र स्थानी असलेल्या शहरात “डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान” ही संस्था स्थापन झाली.
महापुरुषांना जातीत बंदिस्त करून संकुचित करण्याच्या आणि नामांतर आंदोलना मुळे दुभंगलेल्या स्थितीत असलेल्या समाजात घडलेली ही घटना समाजातील जातीय विद्वेष कमी करण्यात आणि बंधुभाव युक्त वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरली. १९९४ साली झालेल्या नामविस्तारास मराठवाडयातील सकल समाजाने आनंदाने स्विकारले. त्यात रा. स्व. संघ आणि संलग्न संस्था संघटनाचा हा महत्वाचा सहभाग होता. शोषण मुक्त, समता युक्त, दोष मुक्त समरस समाज निर्मिती हे ध्येय गाठण्यासाठी रा.स्व. संघ आणि संघ प्रणित संस्था संघटना सतत आपले योगदान देत आल्या आहेत. देत राहतील.
लेखक :- डॉ दिवाकर कुलकर्णी
अध्यक्ष, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
छत्रपती संभाजीनगर.
संदर्भ-
१) नामांतर ते नामविस्तार – लेखक श्री सुखदेव नारायण तथा नाना नवले
२) नामविस्तार लढा – अभाविप आणि नामांतर लढा संपादक श्री दिलीप धारूरकर