
ज्ञानवापीमध्ये मशिदीपूर्वी भव्य मंदिर अस्तित्वात होते; एएसआय सर्वेक्षणामध्ये खुलासा !
१९९०-९१ चा काळ. राममंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात जागृतीची एक लहर उठली होती. त्या वेळची एक घोषणा होती – ‘अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है।’ ती मागणी केवळ एका पक्षाची होती असे मानणारे शहामृगाच्या जातीचे होते. ती सकल हिंदू समाजाच्या अस्मितेची एक चुणूक होती. अयोध्येचा रामलल्ला, काशीचा विश्वनाथ आणि मथुरेचा कन्हैय्या ही हिंदूंच्या श्रद्धेची तीन सर्वोच्च शिखरे होती. तशी ती अनादिकाळापासून होती. म्हणूनच परकीय मुस्लीम राजवटीच्या राज्यकर्त्यांनी अगदी ठरवून, आवर्जून ती तोडली, फोडली आणि त्याच जागांवरती मशिदी उभ्या केल्या. तो केवळ धार्मिक आंधळेपणा नव्हता. तो भारताच्या राष्ट्रीय अस्मितेवर केलेला अगदी हिशोबी आघात होता. असा आघात, ज्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमनाथाचा जीर्णोद्धार झाला. पण राममंदिराला न्यायालयाचे दरवाजे अनेक वर्षे ठोठावावे लागले, तेव्हा कुठे आता, २०२४ मध्ये भव्य राममंदिरात प्राणप्रतिष्ठा समारोह संपन्न झाला. आता काशी विश्वनाथासाठी ,जगत्पालक,द्वारकाधीश श्रीकृष्णासाठी सकल हिंदू समाज न्यायालयाच्या दारात न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे.

ज्ञानवापी… आणि ASI अहवाल…
ज्ञानवापीमध्ये मशिदीच्या सध्याच्या बांधकामापूर्वी भव्य हिंदू मंदिर होते, असा निष्कर्ष भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) सर्वेक्षणामध्ये आल्याचे हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरूवारी रात्री वाराणसी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी संकुलाचे ASI तर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणाचा अहवाल हा सार्वजनिक करून दोन्ही पक्षांना देण्यात यावा, अशी याचिका हिंदू पक्षाने दाखल केली होती. वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाचा दावा मान्य केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा हिंदू पक्षास ८३९ पानी अहवालाची प्रत प्राप्त झाली.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी हिंदू पक्षकारासह रात्रीच पत्रकारपरिषद घेऊन अहवालाच्या निष्कर्षाची माहिती दिली. ते म्हणाले, ASI सर्वेक्षणाच्या निष्कर्षामध्ये म्हटले आहे की, वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे असे म्हणता येते की सध्या असलेल्या ढाच्याच्या बांधकामापूर्वी येथे अतिशय भव्य असे हिंदू मंदिर होते. याचाच अर्थ येथे असलेल्या मशिदीचे बांधकाम होण्यापूर्वी येथे अतिशय मोठे असे हिंदू मंदिर होते, असे विष्णू शंकर जैन यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, तथाकथित मशिदीची पश्चिमेकडील भिंत ही अगोदरच अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग आहे. ही भिंत हिंदू पद्धतीच्या चिन्हांनी सुशोभित करण्यात आल्याचे दिसले आहे. सध्याच्या ढाचाच्या तळघरात हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती आहेत, ज्या मातीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती विष्णू शंकर जैन यांनी दिली आहे.

कोणकोणत्या गोष्टींचं सर्वेक्षण करण्यात आलं?
-सध्या उभ्या असलेल्या संरचनेतला मध्यवर्ती कक्ष आणि मुख्य प्रवेशद्वार
-पश्चिमेकडील कक्ष आणि भिंत
-सध्याच्या संरचनेतील स्तंभ आणि भिंतीवरील खांबांचा पुन्हा वापर झाल्याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं
-सापडलेल्या दगडांवर असलेल्या अरबी आणि पर्शियन भाषेतले शिलालेख
-तळघरातल्या शिल्पांचे अवशेष
-या संरचनेचं स्वरूप एखाद्या हिंदू मंदिरासारखं आहे
अहवालातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :-
-ASI ने ८३९पानांचा अहवाल तयार केला आहे, ज्यात मशिदीपूर्वी तेथे हिंदू मंदिर होते असे नमूद केले आहे.
-सर्वेक्षणात अशा ३२ठिकाणी पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की तेथे पूर्वी हिंदू मंदिर होते.
-ASI ने २ सप्टेंबर १६६९रोजी मंदिर पाडल्याच्या जदुनाथ सरकारच्या निष्कर्षावर विश्वास व्यक्त केला आहे.
-देवनागरी, ग्रंथ, तेलगू आणि कन्नड भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
-एका ठिकाणी महामुक्ती मंडप असे लिहिलेले आहे, जे एएसआयच्या मते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
-मंदिर पाडल्यानंतर त्याचे खांब मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आले. जनार्दन, रुद्र आणि विश्वेश्वराचे शिलालेख सापडले आहेत.
-एका ठिकाणी महामुक्ती मंडप असे लिहिलेले आहे, जे एएसआयच्या मते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिर पाडल्यानंतर त्याचे खांब मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आले.
ASIच्या अहवालानुसार, “या मशिदीच्या खोलीत अरबी-पर्शियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख सापडला. त्यानुसार औरंगजेबच्या कारकिर्दीच्या २० व्या वर्षी (१६७६-७७)मध्ये ही मशीद बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. यावरूनच हे स्पष्ट होतं की याठिकाणी आधीपासून असलेलं बांधकाम १७व्या शतकात औरंगजेबाच्या काळात नष्ट करण्यात आलं होतं.

जुन्या संरचनेतील काही भाग बदलून सध्या उभ्या असलेल्या बांधकामात त्याचा वापर करण्यात आला होता.” सध्याच्या या ASI सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीतील सीलबंद पाण्याच्या टाकीचं शास्त्रोक्त सर्वेक्षण अजूनही व्हायचे आहे.
ASI च्या अहवालात ज्ञानवापी मशीद संकुलात असणाऱ्या सध्याच्या बांधकामाचं वय आणि स्वरूप याविषयी म्हटलं आले की, “सध्याच्या संरचनेत पश्चिमेकडे असणाऱ्या भिंतीवरून हे एखाद्या हिंदू मंदिराचे अवशेष असल्याची कल्पना येते.सध्या तिथे असणाऱ्या वास्तुशिल्पांचे अवशेष, मध्यवर्ती कक्षात असणारे कर्ण रथ आणि प्रति रथ, भिंतींवरच्या सुशोभित मोल्डिंग्ज, पश्चिमेकडील भिंतीवर तोरण बांधण्यात आलेलं एक मोठं प्रवेशद्वार, तिथे असणारं एक छोटं प्रवेशद्वार आणि पक्षी आणि प्राण्यांचं कोरीव काम या सगळ्या गोष्टींवरून हे हिंदू पद्धतीचं बांधकाम असल्याचं दिसतंय”
“कला आणि स्थापत्यशास्त्राच्या आधारावर, सध्या असलेलं ही बांधकाम एखादं हिंदू मंदिर म्हणून ओळखलं जाऊ शकतं.” वैज्ञानिक अभ्यास आणि निरीक्षणानंतर असं सांगण्यात आलं आहे की सध्याची इमारत तयार होण्यापूर्वी तिथे एक मोठं हिंदू मंदिर होतं.
‘दगडावर मशिदीच्या बांधकामाची तारीख नोंदवण्यात आली होती’
ASIने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे त्या मशिदीतल्या एका शिलालेखाचा उल्लेख आहे. याच शिलालेखावर मुघल सम्राट औरंगजेबाच्या (१६७६-७७) काळात ही मशीद बांधण्यात आली होती असं लिहिलं होतं.या अहवालात हेही सांगितलं होतं की सदरील शिलालेखावर मशिदीच्या सहान (अंगण)ची डागडुजी झाल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. या शिलालेखाचा फोटो १९६५-६६एएसआयच्या रेकॉर्डमध्ये आहे. पण एएसआयचं असं म्हणणं आहे की, “या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या एका खोलीतून हा दगड सापडला होता पण या शिलालेखावरील मशिदीच्या बांधकाम आणि विस्ताराची माहिती खोडण्यात आली होती.”
ASI चं असं म्हणणं आहे की मासीर-ए-आलमगिरी नावाच्या औरंगजेबाच्या चरित्रात असं लिहिलं आहे की औरंगजेबाने त्याच्या सर्व प्रांतातील सरदारांना काफिरांच्या शाळा आणि मंदिरं पाडण्याचे आदेश दिले होते.एएसआयच्या म्हणण्यानुसार, १९४७ मध्ये जदुनाथ सरकार यांनी केलेल्या मसिर-ए-आलमगिरीच्या इंग्रजी अनुवादातही याचा उल्लेख आहे.जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकाचा संदर्भ एएसआयच्या अहवालात आहे. त्यानुसार, “२ सप्टेंबर १६६९रोजी बादशाह औरंगजेबच्या आदेशानुसार, त्याच्या अधिकाऱ्यांनी काशीतील विश्वनाथाचे मंदिर पाडल्याची नोंद आहे.”
ज्ञानवापी मशिदीतले शिलालेख..

या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की सध्याच्या मशिदीच्या संरचनेत एकूण ३४ शिलालेख आणि ३२ स्टंपिंग सापडले आहेत आणि त्यांची नोंद करण्यात आली आहे.मशिदीच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या हिंदू मंदिराच्या दगडांवर हे शिलालेख आधीच अस्तित्वात असल्याचं एएसआयने सांगितलं.हे शिलालेख देवनागरी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये आहेत.यामुळे एएसआयने हा निष्कर्ष काढला की आधीपासून अस्तित्वात असलेल्या संरचनेचे काही भाग पाडले गेले आणि विद्यमान संरचनेच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तेच अवशेष वापरण्यात आले.
ASI ने सांगितलं आहे की या शिलालेखांमध्ये जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर या तीन देवांची नावं देखील सापडली आहेत. एएसआयने ‘महामुक्तिमंडप‘च्या तीन शिलालेखांचा शोध अतिशय महत्वाचा असल्याचं या अहवालात सांगितलं आहे. एएसआयच्या म्हणण्यानुसार, मशिदीमध्ये नमाजासाठी त्याच्या पूर्वेकडील भागात एक तळघर बनवण्यात आलं होतं आणि मशिदीमध्ये प्लॅटफॉर्म आणि अधिक जागाही बनवण्यात आली होती जेणेकरून अधिकाधिक लोक तिथे नमाज अदा करू शकतील.
एएसआयने सांगितलं की, मंदिराच्या खांबांचा वापर पूर्वेकडील भागात तळघर बांधण्यासाठी करण्यात आला होता. N2 नावाच्या तळघरात घंटा, दीपस्तंभ आणि शिलालेख असलेले स्तंभ आहेत.S-2 नावाच्या तळघरात मातीखाली गाडलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही सापडल्या.
खांब आणि भित्तीस्तंभ..

ASI च्या अहवालानुसार, मशिदीचा आकार मोठा करण्यासाठी आणि मशिदीतलं अंगण तयार करण्यासाठी, आधीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या खांबांमध्ये किंचित बदल करण्यात आले.मशिदीच्या कॉरिडॉरमधील खांबांची सखोल तपासणी केल्यावर असं दिसून आलं आहे की ते मूळत: पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग होते, हेही एएसआयने या अहवालात सांगितलं आहे.मशीद बांधताना या खांबांचा वापर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये असलेल्या कमळाच्या पदकापुढील आकृत्या काढून टाकण्यात आल्या आणि फुलांची रचना तयार केली गेली.
पश्चिमेकडील कक्ष आणि भिंत..
ASI ने सांगितलं की सध्या असलेल्या मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीचा उर्वरित भाग हे पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं एक हिंदू मंदिर आहे. पश्चिमेकडील ही भिंत, “दगडाने बांधलेली आहे. पूर्वीच्या संरचनेतील भिंतींचा आणि इतर अवशेषांचा वापर करून ही भिंत उभारण्यात आलेली आहे. या भिंतीसोबत असणारा केंद्रीय कक्ष अजूनही तसाच आहे आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या दोन कक्षांमध्ये बदल करण्यात आला आहे.” मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण प्रवेशद्वाराचे पायऱ्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आणि उत्तरेकडील सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्या आजही वापरात आहेत.

मध्यवर्ती सभागृह आणि मुख्य प्रवेशद्वार..
ASI च्या अहवालात असं म्हटलं आहे की मंदिरात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेला एक मोठा मध्य कक्ष आणि प्रत्येकी एक खोली होती. पूर्वीच्या संरचनेचा (मंदिर) मध्यवर्ती कक्ष आता सध्याच्या संरचनेचा (मशीद) म्हणजेच मशिदीचा मध्यवर्ती कक्ष आहे. ASI चा असा विश्वास आहे की मंदिराच्या मध्यवर्ती खोलीचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होते जे दगडी दगडी बांधकामाने अडवलं होतं.
अगदी पूर्वीपासून हिंदू समाज ’सहिष्णू’ म्हणून ओळखला जातो. परिणामी जेव्हा जेव्हा तडजोड करण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा ती हिंदू समाजानेच करावी हा अलिखित नियम झाला होता. हा बोटचेपेपणा हिंदू समाजात इतका खोलवर मुरला होता की त्या आगळे कधी काही घडेल असे कोणालाच वाटले नाही.. पण घडले!
आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता हा समाजही ठाम उभा राहू लागला. ठरावीक विचारसरणीच्या वृत्तपत्रांनी आणि वृत्तसंस्थांनी वर्षानुवर्षे केलेले ’ब्रेनवॉशिंग’ हळूहळू उघडे पडू लागले. सोशलमिडियामुळे कोणत्याही मुद्द्याची दुसरी बाजूही लोकांना आता समजते.एकतर्फी शहाणपण आता कालबाह्य ठरतेय. हा बदल आता सगळ्यांनीच स्वीकारणे भाग आहे. आपण या देशात ’राज्यकर्ते’ होतो हा अहंकार आजच्या मुस्लीम समाजाने कुरवाळण्यात काही अर्थ नाही.

जेव्हा ज्ञानवापीचे व्हिडिओ चित्रीकरण झाले, तेव्हाच वार्याची दिशा कळून चुकलीय. त्याचा पडसाद म्हणून आधी हिंदूंच्या मागण्यांवर टीकेची, तुच्छतेची झोड उठवणारे दीडशहाणे विचारवंत आता बदललेल्या सुरात ‘पूर्वी जे झाले ते झाले. आता तो इतिहास बदलणार आहे का?’ असे विचारू लागलेत. तिकडे समाजाची माथी भडकवणारे नेते ’संपूर्ण देशात आगी लागतील..’ अशा धमक्या उघडपणे देताहेत. त्यांना हे कळत नाहीये की पूर्वीसारखे ‘तू मोठा ना? मग तू गप्प बैस..’ असे सांगून आता हिंदू समाज ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही.
सत्याला मरणही नसते आणि कुठल्याही टेकूची गरजही नसते… आज ज्ञानवापी मशीद ही काशी विश्वनाथ मंदिर पाडूनच बांधण्यात आली आहे हे ASIच्या अहवालाने सिद्ध केले आहे… आता गरज आहे ती फक्त हिंदू समाजाने सुसंघटित होऊन बाबा विश्वनाथ की जय म्हणून ललकारी देण्याची..

हर हर महादेव..