NewsRSS

मेरी आवाज ही पहचान है..

ameen sayani indias undisputed king of radio signs off

२०२४ मध्ये भारतात रेडिओ प्रसारणाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यातील जवळ पास ५० वर्ष गाजवली, ती अमीन सयानी (ameen sayani) यांनी!

‘भाईयो और बहनो, अगले पायदान पर हैं ये गाना….‘ असे आपल्या खुमासदार शैलीत कित्येक दशके सिलोन रेडिओवर ‘बिनाका गीतमाला‘ हा कार्यक्रम सादर करणाऱ्या, अमीन सयानी यांचे नुकतेच वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rashtriya swayamsevak sangh) नेहमीच आपल्या कार्यक्रमात समाजातील प्रथितयश व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नेहमीच आमंत्रित करत असतो त्यात क्रांतिकारी पांडुरंग सदाशिव खानखोज्यांपासून ते भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपर्यंत अनेक नावे सांगता येतील. १९९८ साली अमीन सयानी संघाच्या गुरुदक्षिणा उत्सवात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांनी हे निमंत्रण आनंदाने स्वीकारले.

अमीन सयानी आपल्या उद्बोधनात म्हणतात की,“एकम सत् विप्रह बहुदा वदन्ति’ असे वेदांमध्ये सांगितले आहे. म्हणजेच सत्य एकच आहे, याचे विद्वान वेगवेगळ्या शब्दांत वर्णन करतात. कुराणही तेच सांगते.”

पुढे ते म्हणाले की, ‘मला अभिमान वाटतो की माझ्यासारख्या मुस्लिमाला संघाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आणि तेही विशेष पाहुणे म्हणून. मी आयुष्यात प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि येथील वातावरण आणि प्रमुख वक्त्यांची मते ऐकून मी खूप प्रभावित झालो आहे.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ‘विवेक‘ साप्ताहिकाचे संपादक श्री. रमेश पतंगे म्हणाले होते की , ‘डॉ. हेडगेवार म्हणायचे की संघात नेता नाही, अनुयायी नाही. सर्व स्वयंसेवक आहेत. प्रत्येक स्वयंसेवकच संघ आहे. प्रत्येक स्वयंसेवकाने सदाचरण करावे त्यामुळे संघाचे, पर्यायाने समाजाचे आणि राष्ट्राची उन्नती होईल.

याच विषयावर पुढे बोलताना श्री. सयानी म्हणाले, ‘फक्त संघाचे स्वयंसेवकच का, समाजातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक व्यक्तीने सदाचरण करणे आवश्यक आहे..

आज काळाच्या पडद्याआड हा सदाबहार आवाज निघून जरी गेला असला, तरी त्यांचे शब्द कानात कायम रुंजी घालत राहतील.. अमीनजी नेहमी म्हणत, रेडिओवर तुमची ओळख तुमच्या आवाजाने होते. पण, ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी, तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व ओळखून तुमची स्वतःची शैली निर्माण करावी लागते. जर तुम्ही अगदी मनापासून लोकांचे प्रबोधन,मनोरंजन कराल, तर श्रोते तुम्हाला कधीही विसरणार नाही.

अमीन सयानी यांनी आपल्या हृदयस्पर्शी आवाजामुळे सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांना विश्व संवाद केंद्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

Back to top button