स्वदेश,स्वधर्म, स्व-संस्कृती यांचा अभिमान असणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवाने हजारो वर्षांच्या ख्रिश्चनांच्या आणि इंग्रज राजवटीने आपण “स्वत्व च” विसरलो. किंबहुना आपल्याला ते विसारण्यास भाग पाडले गेले. आपण स्वतंत्र झालो. पण स्व -तंञ विसरलो, स्व अस्मिता लोप पावली.
आपण अजूनही ब्रिटिशांनी घालून दिलेल्या पायंडयाप्रमाणे जगत आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून (?) सुरू झालेले व अनेक दोष असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर (इंग्रजी) आपण आज वापरतो. परंतु आपले पूर्वज भारतीय सौर पंचांग लाखों वर्षापासून वापरत आलेले होते. जे सर्वाधिक मान्यता असलेले व अचूक दिनदर्शिका म्हणून प्रचलित होते, आजही आहे. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा मागे पराक्रम व इतिहास आहे हे आपण विसरता कामा नये.
त्यामुळे 1 जानेवारीला ‘हँपी न्यु ईयर’ म्हणून देशभरात सर्वच क्षेत्रात जो उदोउदो होतो, तो किती बिनबुडाचा, अशास्त्रीय व भंपक आहे याचा कोणीच विचार करत नाही. 1 जानेवारी साजरी करताना माझी कालगणना कोणती आहे? याचा विचार कोणीच विचार करत नाही.
ख्रिस्ती कालगणनेची निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली, ह्याबद्दल तज्ञांत अद्यापि एकमत नाही. तथापि ख्रिस्ती कालाचा शोध इटलीतील डायोनिसिअस एक्झीगस ह्या धर्मगुरुने सहाव्या शतकाच्या सुमारास लावला. त्याची सुरुवात काही लोक रोम शहराच्या उभारणीपासून म्हणजे १ जानेवारी ७५४ ए.यू.सी. (Anno Urbis Conditae) पासून करतात, तर काही येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, म्हणजे इ.स.पू. २५ डिसेंबरपासून गृहीत धरतात. कालगणना करणारे शून्य इसवी वर्ष सन गृहीत धरण्यास तयार नसून ते कालानुक्रमाच्या मोजमापासाठी इ.स.पू. १ किंवा इ.स. १ जानेवारी १ ही तारीख वा वर्ष मोजण्याच्या सुरुवातीस घेऊन तिथून पुढे ख्रिस्ती वर्ष मोजतात.
या कालगणनेतील वर्ष सौर असून त्याची लांबी सूक्ष्म मानाने ३६५ दिवस, ५तास, ४८ मिनिटे, ४५⋅३७ सेकंद एवढी आहे. पण दरवर्षी या वर्षाची लांबी ढोबळ मानाने ३६५ दिवस एवढीच धरीत असल्याने दरवर्षी याचा खरा वर्षारंभ ५ तास, ४८ मिनिटे व ४५⋅३७ सेकंद एवढ्या वेळाने मागे पडतो. हा मागे पडणारा वेळ भरुन काढण्यासाठी दर ४ वर्षांनी ढोबळ मानाने १ दिवस (फेब्रुवारी २९) अधिक धरला जातो. पण यायोगे खरा वर्षारंभ दर ४ वर्षांत सु. ४५ मिनिटे पुढे जातो. ढोबळ वर्ष सूक्ष्म वर्षाच्या जोडीस यावे म्हणून दर १०० वर्षांनी फेब्रुवारीची २९ तारीख धरीत नाहीत. पण यामुळे सूक्ष्म वर्षारंभ १०० वर्षात सु.६ १/४ तास मागे पडतो. हे मागे पडणारे अंतर भरुन काढण्यासाठी दर ४०० वर्षांनी फेब्रुवारीचे २९ दिवस धरावे असे ठरविले आहे. हा सर्व विवेक १५८२ साली करण्यात आला. त्यावेळी सूक्ष्म गणिताने येणारा खरा वर्षारंभ ढोबळ गणिताने येणार्या वर्षारंभाच्या १० दिवस पुढे नेणे आवश्यक झाले. हे अंतर भरुन काढण्यासाठी १५८२ च्या ऑक्टोबर ५ रोजी १५ तारीख मानावी, असा तत्कालीन ख्रिस्ती समाजाचा धार्मिक पुढारी तेरावा पोप ग्रेगरी याने हुकूम काढला. अर्थात नवी कालगणना जुनीच्या दहा दिवस पुढे गेली. या पद्धतीस ‘न्यू स्टाईल’ असे नाव असून जुन्या ढोबळ पद्धतीस ‘ओल्ड स्टाईल’ असे नाव आहे. नव्या पद्धतीची आज्ञा इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड इ. रोमन कॅथलिक देशांनी मानली आणि इंग्लंडसारख्या देशांनी मानली नाही. असा इंग्रजी काल गणनेचा इतिहास आहे.
आपले नवीन वर्ष वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा या दिवशी साजरी करतो. जेव्हा आपण वर्षारंभ, नववर्ष दिन म्हणून साजरा करतो, तेव्हा सृष्टीत महत्वपूर्ण बदल होतात. तसेच, नववर्ष दिन सम्राट विक्रमादित्याने इ. स. पू. 57 मध्ये शकावरील विजयाचे प्रतीक म्हणून विक्रम संवत्स ही कालगणना सुरू केली. त्यावेळी नविन विक्रम संवत्सर (57=वर्ष)हे चैञ शुध्द प्रतिपदेला सुरू होतो. त्यानुसार सध्या विक्रम संवत् २०८१ सुरू होत आहे. राजा विक्रमादित्यच्या दरबारात नऊरत्न होते. त्यापैकी वराहमिर हे खगोल शास्त्रज्ञ होते. त्यांनी ही कालगणना निर्माण केली होती. हीच कालगणना आपण आजही भारतीय कालगणना म्हणून वापरत आहोत.
भारतीय कालगणना इंग्रजी व ख्रिश्चन कालगणनेतील फरक:-
-भारतीय कालगणनेनुसार चैञशुक्ल प्रतिपदा यादिवशी नविन वर्ष सुरू होते. तर इंग्रजी दिनदर्शिके नुसार 1 जानेवारीपासून नविनवर्ष सुरुवात होते.
-भारतीय सौर कालगणनेत चैञ शुध्द ते फाल्गुन असे १२ महिने व एका वर्षात ३६५ दिवस ५ तास ४५•६ सेंकद आहेत. भारतीय कालगणनेत दरवर्षी वर्षांची सुरुवात चैञ महिन्यानेच होते.
-भारतीय कालगणनेत महिन्याची संख्या बदलत नाहीत. इंग्रजी कालगणनेतील महिने, वर्ष व दिवस यात बदल होत असतो.
-ग्रेगोरियन कालगणनेत प्रारंभी १० महिन्यानेच वर्ष होते.
-ख्रिश्चन कालगणनेत रोमन सम्राट नुमा-पाँलिस याने १० ऐवजी १२ महिन्यानेच वर्ष केले. हे करताना ११ वा महिना जानेवारी, १२ वा महिना फेब्रुवारी असा केला..
-आपल्या कालगणनेनुसार/पंचांगानुसार आपले सर्व सण-उत्सव आकाशातील ग्रह, नक्षत्र, चंद्राच्या स्थितीवरुन आपण सर्व सण उत्सव, तिथीनुसार साजरे होतात.
-सूर्य भ्रमणावरुन,चंद्र भ्रमनावरून आपली तिथी, सण-उत्सव, ऋतु बदल आणी दैनंदिन व्यवहार, विज्ञाननिष्ठ सौर कालगणनेनुसार होते.
-चैञ प्रतिपदेला, सुर्य मेष राशीत प्रवेश करतो. सुर्य वसंत संपत या बिंदूवर असतो. यांच दिवशी राञ-दिवस १२ तासाचा असतो.
-चैञ प्रतिपदेला/गुढीपाडवेला सुर्य बरोबर पुर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. धार्मिक, मंगल प्रसंगी, युगाब्द वर्षाची सुरुवात होते. यास युगादि असेही म्हणतात.
इंग्रजी महिन्यांची नावे ..
जानेवारी:- जानेवारी हा शब्द ‘जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्दापासून तयार झाला. ‘जानूस किंवा ‘जेनस’ या रोमन देवाच्या आधारे ‘जॅनरियुस’ हे नाव पडले. या देवाला पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो.
फेब्रुवारी:- ’फेब्रुवारी’ असा ‘फॅबीएरियुस’ हा लॅटीन शब्दाचा अपभ्रंश झाला. ‘फेब्रू’ आणि ‘अरी’ हा त्याचा मूळ धातू असून त्याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो. हा महिना प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये आत्मशुद्धी आणि प्रायश्चित करण्यासाठी मह्त्वाचा मानला जात असल्यामुळे त्याला फेब्रुवारी असे नाव दिले गेले.
मार्च:- ’मार्च’ महिन्याचे नाव रोमन देवता ‘मार्टियुस’ (मार्स) याच्या नावावर पडले.
एप्रिल:- ’एप्रिल’ हा शब्द ‘एप्रिलिस’ या शब्दांपासून तयार झाला. लॅटिन भाषेतील ‘एप्रिल्ज’ या शब्दाचा एप्रिलिस हा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ उद्घाटन करणे, उघडणे, फुटणे असा आहे.
मे:- ’मे’ शब्द ‘मेइयुस’ या लॅटिन शब्दापासून तयार झाला. वसंतदेवी ’मेयस’च्या नावावरून हे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
जून:- जुनियुस’ शब्दाचा जून हा अपभ्रंश आहे. या महिन्याला हे नाव रोमची प्रमुख देवी ‘जूनो’ हिच्या नावावरून दिले गेले. रोमन देवराज जीयस याची ‘जूनो’ ही पत्नी आहे. ‘जुबेनियस’ या शब्दापासून जूनो शब्द तयार झाला. त्याचा अर्थ ‘विवाह योग्य कन्या’ असा होतो.
जुलै:- जुलै महिन्याचे नाव रोमन सम्राट जूलियस सीजर याच्या नावावरून पडले. जूलियस सीजरचा याच महिन्यात जन्म झाला होता. या महिन्याचे नाव त्याच्या जन्मापूर्वी ‘क्वाटिलिस’ असे होते.
ऑगस्ट:- या महिन्याचे नाव जूलियस सीजरचा पुतण्या आगस्टस सीजर याने आपल्या नावावर ठेवले. या महिन्याचे यापूर्वी नाव ‘सॅबिस्टलिस’ असे होते.
सप्टेंबर:- ‘सप्टाम’ शब्दावर आधारित असलेल्या सप्टेंबरचा अर्थ ’७’ असा होतो. ‘सप्टेबर’ महिन्याला प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सातवे स्थान होते. पण त्यात सुधारणा होऊन आता हा वर्षातील नववा महिना आहे.
ऑक्टोबर:- या महिन्याला प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये आठवे स्थान होते. मात्र, हा आता दहावा महिना आहे. याचा अर्थ ’८’ असा होतो.
नोव्हेंबर:- ‘नोव्हेबर’ हे नाव ‘नोवज’ या लॅटिन शब्दावरून पडले. याचा अर्थ ’९’ असा होतो. हा प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये नववा महिना होता.
‘डिसेंबर’ (डिसेंबर) हा शब्द लॅटिन शब्द ‘डेसेम’ पासून तयार झाला. याचा अर्थ १० असा होतो. हा प्राचीन रोमन कॅलेंडरमधील दहावा महिना होता. आता वर्षाचा शेवटचा आणि बारावा महिना आहे.
भारतीय नविनवर्ष साजरे करण्याची पध्दत…
सकाळी उठून, शुचिर्भूत होऊन सहकुटुंब पूजा अर्चना करावी. तोरणे बाधुंन, गुढी उभारून, देवास नैवैद्य अर्पण करून, थोरा मोठ्यांचे, साधू संतांचे आशीर्वाद घेऊन करून सण साजरा करावा.
लेखक : कृष्णा पितलावार, किनवट (जि. नांदेड)
साभार- विश्व संवाद केंद्र, देवगिरी