१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील एक देदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई !
सन १८५७… भारताच्या स्वातंत्र्य समराच्या इतिहासातील एक सुवर्णपान. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराने भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिकांना एक दिशा मिळाली. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक नररत्नांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. आपल्या शौर्याने, मर्दुमकीने,पराक्रमाने इतिहासात आपले नाव कोरले, यातीलच एक रत्न म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई.
चमक उठी सन् सत्तावन में
वह तलवार पुरानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह
हमने सुनी कहानी थी।
ख़ूब लड़ी मर्दानी वह तो
झाँसी वाली रानी थी॥
“खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी” कवयित्री शुभद्रा कुमारी चौहान यांच्या “झांसी की रानी” या कवितेतील या ओळी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी यथार्थ आहेत. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक म्हटले जाते.
लहानपणी बाजीराव पेशव्यांच्या वाड्यात राणीला लष्करी शिक्षण मिळाले. उत्तम अश्वपरीक्षा करणारी सर्व शस्त्रास्त्रे लीलया हाताळणारी मनकर्णिका तांबे विवाहानंतर झाशीची राणी झाली. विशेष म्हणजे लग्नानंतरही आपल्या लष्करी शिक्षणाचा तसेच अश्वारोहण आदी विद्यांचा सराव तिने चालूच ठेवला. इतकेच नव्हे, तर आपल्या सैनिकांना व इतर महिलांनाही हे शिक्षण दिले.
वैधव्य प्राप्त झाल्यावर राणीने केशवपन केले नाही; तसेच वेळप्रसंगी पुरुषी वेश धारण करण्याचे धाडसही दाखवले. आपल्या राज्यकर्त्याच्या भूमिकेसाठी या दोन्ही बाबी तिला आवश्यक वाटल्या. आपल्या प्रजेच्या जबाबदारीची तिला कायम जाणीव होती व प्रजेलाही राणी बद्दल अपरंपार प्रेम व आदर होता व प्रचंड विश्वास होता.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी होताना विदेशी लोकांचे राज्य भारतावर असता कामाचे नाही; इंग्रजांशी युद्ध करणे आवश्यक आहे, असे तिथे स्पष्ट मत तिने लिहिलेल्या पत्रातून लक्षात येते. जर रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करीन, असे आश्वासन सैनिकांना देऊन त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पत्करणारी राणी एक दुर्मिळ राज्यकर्ती होती.
राणी लक्ष्मीबाई च्या पारिपत्यासाठी आलेल्या युरोज या अधिकाऱ्याला व इंग्रज सैन्याला तिने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले होते. ती स्वतः रणक्षेत्रावर आपले सैन्य घेऊन जाऊन युद्ध करी.
अखेरच्या लढाईत ती शत्रूला सामोरे गेली, तेव्हा तिचा आवेश तलवारबाजीचा वेग व घाव हे सारे सैनिकांना हे अचंबित करणारे होते. तलवारीने वार करत समोरच्या इंग्रजी शिपायाला ती मारूनच टाकत होती. ‘कडकडा कडाडे बिजली। शत्रूंची लक्तरे थिजली। मग कीर्तीरुपे उरली।’, असे वर्णन कविवर्य भा. रा. तांबे यांनी केले आहे. तिच्या वीरमरणानंतर युरोज याने लिहिले, “स्त्री असूनही सर्वात शूर, हिंमतवान, सर्वोत्कृष्ट व सर्वात धोकादायक शत्रू होती’. आणि नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी ‘अद्वितीय स्त्रीरत्न’ अशा शब्दात गौरव केला, तर ‘आझाद हिंद सेने’ची स्त्रीशाखा स्थापन झाल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव देऊन कर्तृत्वाचा गौरव केला. अवघे २७ वर्षांचे आयुष्य; पण अतुलनीय साहस व शौर्य यामुळे झाशीची राणी अजरामर झाली.
लेखिका – अमिता मनोहर