HinduismNewsSpecial Day

संत कबीर आणि इस्लाम..भाग १

sant kabir das and islam

संत कबीरांचे इस्लाम विषयक विचार मांडणारी ३ भागांची विशेष मालिका.. 

मध्ययुगात भारतीय संत परंपरेत संत कबीरांचे स्थान अनन्य साधारण असे आहे. सुमारे पंधराव्या शतकापासून भारतीय समाज जीवनावर आपल्या दोह्यांच्या द्वारे प्रभाव टाकणारा हा संत आध्यात्मिक, भौतिक, सामाजिक जीवनात अनेकांना दिशा देण्याचे काम करताना दिसतो. त्यामुळेच रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर अनेकांना कबीर आपले वैचारिक गुरु वाटतात.

रवींद्रनाथ टागोरांनी कबीरांच्या दोहनांचे इंग्रजीत अनुवाद करुन ते जगभर पोहचविले. मा. गांधीच्या विचारांच्या मुळांशी कबीरांच्या संस्कारांची शिकवणी दिसते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु मानले होते. ज्या पध्दतीने महाराष्ट्रातून प्रत्येक घरात ज्ञानोबा ते तुकोबा या संतांचे अभंग मोठ्या श्रध्देने रोज म्हटले जातात त्याप्रमाणे उत्तर भारतात भराभरात कबीरांचे दोहे मोठ्या भक्तीभावाने म्हटले जातात.

संत कबीर आणि इस्लाम यावर येण्या अगोदर आपण कबीरांविषयी माहिती जाणून घेऊया..

संत कबीराचा जन्म

संत कवीरांचा जन्म हा अनेक दंतकथा, लोककथा यांनी व्यापलेला आहे त्यांच्या जन्माविषयी व जन्म तारखे विषयी अनेक मतमतांतरे आहेत.

काही लोकांच्यामध्ये असे मानतात की कबीर विधवा बाईच्या पोटी जन्माला आले. तिने जननिदेखातर त्या बालकास तळ्याकाठी ठेऊन दिले. तळ्याकाठी सोडून दिलेले हे बालक निरु व निमा या मुस्लिम विणकर पतीपत्नीस सापडले. व पुढे त्यांनी त्याला वाढविले,सांभाळ केला.

कबीरांच्या जन्माप्रमाणे त्याच्या जन्मतारखेविषयी ही मतमतांतरे आहेत. कबीरांच्या जन्मतारखा तीन प्रकारच्या सांगितल्या जातात. रवींद्रनाथ टागोर इ.स.१४४० मध्ये कबीराचा जन्म झाला असे मानतात. कबीरांचे भक्तगण त्यांचा जन्म सन १३९८ मध्ये काशी क्षेत्री झाला असे मानतात. त्यासाठी पुरावा म्हणून कबीराचा पुढील दोहा ग्राहय मानतात-

चौदह सौ पचपन साल गए।

चंद्रवार इक ठाठ उए।

जेठ खुदी बरसायत को।

पुरन मासी प्रगट भए।

विक्रम संवत १४५५ (इ.स.१३९८) सोमवार वट सावित्रिच्या ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा या दिवशी कबीरांचा जन्म झाला असे कबीरपंथी या दोड्याच्या आधारे मानतात व याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेस कबीर जयंती साजरी करतात..

कबीरांचे शिक्षण

कबीरांच्या कालखंडात समाज जीवनात प्रत्येक पातळीवर भेदभाव मानला जात असे. गोरगरीब तसेच वंचित वर्गातील लोकांना त्यांच्या लेकरांना शिक्षणाची दारे उघडली जात नसत. कबीर तर ‘निरु निमा’ सारख्या मुस्लिम विणकरांच्या घरात वाढत होते. साहजिकच पारंपारिक शिक्षणापासून दूर रहावे लागणे स्वाभाविक होते.

समाज जीवनाचे सखोल निरीक्षण, अनुभव व बहुश्रुतता या जोरावर लौकीकार्थाने निरक्षर असणाऱ्या कबीरांनी समाजाला अध्यात्माचा, बंधुतेचा, माणुसकीचा मार्ग दाखविला. आपल्या शिक्षणाविषयी सांगताना कबीर म्हणतात ‘मी शाई वा कागदाला स्पर्श ही केला नाही कधी लेखणीही हातात धरली नाही. पण चारही युगातील ज्ञान मी केवळ ऐकून प्राप्त केले. आपल्या दोहत्रामध्ये कबीर म्हणतात…

मसि कागद छुयो नहीं, कलम गहि नहीं हाथ।

चार ही युग की महातम, मुखहि जनाई बात।

कबीरांना लिहिता वाचता येते नव्हते. अनुभवातून,सत्संगातून त्यांनी ज्ञान प्राप्त केलेले होते. आपले विचार ते दोहे, साखी या माध्यमातून बोलून दाखवत व त्यांचे शिष्य ते लिहून ठेवत. हे विचार बानी, वचन, आदेश या नावाने ओळखले जातात. कबीरांचे शिष्य भगवानदास यांनी कबीरांच्या ६०० पदांचा संग्रह तयार करुन ठेवलेला आहे. तो ‘बीजक’ या नावाने ओळखला जातो. कबीरपंथीय लोक ‘बीजक‘ हा आपला धर्म ग्रंथ मानतात.

कबीर ग्रंथावली हा देखील एक महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात कबीराचे ४०० दोहे व ८०० साख्या व इतर पदांचा समावेश आहे. कबीरांची भाषा पुरवी हिंदी आहे. या भाषेत अवधी, व्रज, भोजपुरी, खडीवाले, अरबी, फारशी अशा तत्कालीन सर्व भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांच्या भाषेला ‘सुधुक्कडी’ असेही म्हटले जाते.

कबीरांच्या अनेक रचनांचा समावेश ‘श्री गुरु ग्रंथ साहेब ‘ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

क्रमशः

Back to top button