HinduismNews

सामाजिक समरसतेचे अग्रणी: – भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग १

sant namdev maharaj

भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या विषयी माहिती सांगणारी ४ भागांची विशेष मालिका

मध्ययुगीन भारतीय संतपरंपरेतील बहुभाषिक संत म्हणून सर्वमान्य झालेल्या संत नामदेवांचे, वारकरी संप्रदायातील स्थान, अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. संत नामदेवांनी आपल्या अमृताहूनी गोड असलेल्या मराठी आणि हिंदी अभंगवाणीने, वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रभावी प्रचार केला. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रांतातून संचार करून, त्यांनी उत्तर भारतात विठ्ठलनामाचे बीज सर्वत्र पेरले. ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा गजर उत्तरेत घुमत राहिला आणि दक्षिणेची संस्कृती उत्तरेत रूजली ती संत नामदेवांमुळेच. ते उत्तम संघटक असल्यामुळे, विठ्ठलनामाच्या भावसूत्रात विविध प्रदेशांतील समाजमने, त्यांनी एकत्र गुंफली.

सामान्यांच्या लोकबोलीतून अभंग गाऊन, धर्ममंदिराचे बंद असलेले दरवाजे त्यांनी उपेक्षितांना वंचितांना उघडून दिले. वर्णभेद, प्रांतभेद, भाषाभेद, व्यवसाय भेद इत्यादी संकुचित कल्पनांचा निरास करून, भक्तश्रेष्ठ नामदेवांनी भक्तीच्या अनुषंगाने, समता आणि मानवता या तत्त्वांचा कृतिशील प्रसार केला. मध्ययुगीन भारताच्या धार्मिक इतिहासाची काही सोनेरी पाने, संत नामदेवांच्या महान कर्तृत्त्वाची साक्ष देण्यासाठी, आजही उत्सुक असलेली आढळतात.

संत कबीर कमालांच्या हिंदी अभंगांतून, शिखांच्या आदिग्रंथातील ‘बाबा नामदेवजी की मुखबानी’तून व उत्तर भारतातील सर्व ठिकाणी परसलेल्या संत नामदेवांच्या शेकडो मठमंदिरांतून, त्यांचे कर्तृत्त्व अक्षर शिल्पित झाले आहे. त्यांच्या मराठी. आणि हिंदी अभंगवाङ्गयातून आणि विविधांगी कार्यातून, त्यांच्या समताशील दृष्टिकोनाची ओळख पटते आणि त्यांच्या समाजाभिमुखतेचा स्पष्ट प्रत्यय येतो. त्यांची भक्ती समाजपराङमुख नव्हती. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे, ही त्यांची धारणा त्यांच्या पुढील अभंग चरणातून उमजून येते..

सर्वांभूती विठ्ठल आहे आहे साचे।
हे तंव वेदींचे वचन जाण ।।
मार्ग हाचिं सोपा गेले मुनिजन।
जनी जनार्दन हाचि भावो ।। (संत नामदेव ११०२)

अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत विठ्ठल भक्तीच्या बळावर, सर्वसामान्य जनतेचे त्यांनी धर्मनेतृत्त्व केले. त्यांचे हे नेतृत्त्व केवळ वैचारिक नव्हते. स्वतः उच्चारलेली सामाजिक सुधारणेची तत्त्वे आचरणात आणून दाखविण्याचे धैर्य, त्यांच्या ठिकाणी होते. संत नामदेवांच्या या समाजकार्याचे स्वरूप समजावून घेतले की पर्यायाने वारकरी संप्रदायाच्या लोकाभिमुखतेचाही उलगडा होतो.

कर्मकांडाचा निरास..

संत नामदेवकालीन सामाजिक जीवन हे प्रामुख्याने धर्माधिष्ठित होते. व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरांवर धार्मिक रूढींचा जबरदस्त पगडा होता. मनुष्याच्या दैनंदिन क्रियांनाही धर्मकर्मांनी व्यापून टाकले होते. धर्माचा आत्यंतिक प्रभाव समाज जीवनावर पडल्यामुळे, कर्मकांडाचे बंड माजले.

व्रतांमुळे कर्मकांडाचा अतिरेक झाला. त्यामुळे कर्मठताही आली. मंत्रापेक्षा तंत्राला श्रेष्ठत्व प्राप्त झाले. लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण झाल्या. धर्मकर्माची चौकट व्यक्तिजीवनाला पडली. त्या चौकटीचे उल्लंघन हे पाप ठरले. त्या पापांच्या क्षालनार्थ प्रायश्चित्तविधी आले. धार्मिक रूढींचे पालन न करणाऱ्यांना समाजबहिष्कृतही करण्यात येत असे. ज्ञानदेवांच्या आईवडिलांना समाजबहिष्कृत करून, देहान्तप्रायश्चित कर्मठांनी दिले होते. संत नामदेवांच्या समोर कर्मकांडाचा हा इतिहास उभा होता.

संतश्रेष्ठ नामदेवांनी धर्माला कर्मकांडाच्या शृंखलातून मुक्त करून भक्तीच्या मार्गाला लावले. विधिनिषेधांच्या आहारी गेल्याने अहंकार वाढतो याची रोकड्या शब्दात, त्यांनी सर्वांना जाणीव करून दिली. या बाबतीतला स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला तो असा…

तत्त्व पुसावया गेलो वेदज्ञांसी।
तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ।।
तया समाधान नुमजे कोणे काळीं।
अहंकार बळी झाला तेथें।।
स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञासी।
तंव भरले तयापाशीं भेदाभेद ।।
एकएकाच्या न मिळती मतासी।
भ्रांत गर्वराशी भुलले सदा।। (संत नामदेव १६१०)

या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विठ्ठलनामाचे सुलभ परमार्थ साधन समाजाला कथन केले ते असे…

अ) तप तीर्थ दान हे सर्व कुवाड।

नाम एक वाड केशवाचें।। (संत नामदेव १०९४)

नाही काही क्लेश न करी सायास दृढ धरी विश्वास हरिनामीं।। (संत नामदेव ११४६)

मंत्रतंत्राचा बडिवार मांडणाऱ्यांना त्यांनी बजावले..

मंत्र यंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परी राम प्रत्यक्ष न करी कोण्ही ।। (संत नामदेव १४७४)

पांडुरंग नामाच्या स्मरणाने मनुष्य शुद्ध होतो आणि त्याचे ऐहिक व पारलौकिक असे दुहेरी कल्याण होते, हा दिलासा सर्वसामान्यांना त्यांनी दिला.

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ।। (संत नामदेव ९७६)

कलियुगात कर्मकांडाचे श्रम न करता, नामाचा आश्रय करा, हा हितोपदेश त्यांनी समाजाला केला.

कलीमाजीं नाम सुलभ सोपारे।
यालागीं आदर नामीं धरा ।।
आणिक साधनें आहेती उदंड।
सेवितां वितंड कष्ट तेथे।। (संत नामदेव १०९०)

सामाजिक कळवळा संत नामदेवांना होता म्हणून तर अनिष्ट रुढीवर प्रहार केले.

क्रमशः

Back to top button