भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या विषयी माहिती सांगणारी ४ भागांची विशेष मालिका
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा..
संत नामदेवप्रणित नामसंकीर्तनाच्या सोप्या साधनामुळे, परमार्थाची वाट सुगम झाली. भोळीभाबडी जनता जगण्याचा नवा उत्साह घेऊन, या वाटेवरून निघालेल्या पांडुरंगाच्या दिंडीत सामील झाली. पंढरीच्या सीमेवर येताच या जनतेला दिसले की-
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा।
उभारूनि भुजा वाट पाहे।। (संत नामदेव ११३९)
हे दृश्य अपूर्व होते. भक्ताच्या भेटीसाठी जीव टाकणारा भगवंत इथे साक्षात उभा होता. त्याने भक्तालिंगनासाठी बाहू पुढे केलेले होते. भक्त पुढे येताच
देऊनि अभय करें कुरवाळी । करीत सावली पितांबरे ।। (संत नामदेव ८०८)
विटेवरच्या विठ्ठलाला संत नामदेवांनी सर्वसामान्य जनतेच्या हवाली केले. तो विठ्ठल मंदिरात न राहता जनसामान्यांच्या घराघरात वावरू लागला.
आपणचि नांदे भक्ताचिया घरी ।
आपणचि करी सर्व कृत्ये ।। (संत नामदेव २००९)
भक्तांची घरकामे तो करू लागला. “झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।” असा हा भक्ताची सेवा करणारा परमेश्वर घडवून, त्यांनी पारंपारिक, धार्मिक जीवनच वारकरी संप्रदायात बदलले. संत नामदेवांच्या अशा प्रकारच्या समाजसुधारणेच्या सर्व विचारांना विठ्ठलाने प्रतिसाद दिला आहे. समाजात एकता प्रस्थापित होण्यासाठी, भावनिक आधार मिळाला. संत नामदेवांनी विठ्ठलाला समाजजीवनात समरसून टाकले.
शुद्ध केले खटनट…
श्रद्धाशील समाजाच्या भावभोळ्या भक्तीचा गैरफायदा दांभिक लोक घेत असतात. धार्मिक सोंगढोंग माजवून बाह्य भक्तीचा देखावा करणाऱ्यांवर संत नामदेवांनी आपल्या उपहासवाणीचे प्रहार केले आहेत.
अ) सोवळीं पिळुनी कां घालिशी ।
मुद्रेने आंग कां जाळिसी ।।
कासया केली खोडी ।
काया विटंबिली बापुडी ।। (संत नामदेव १८७३)
आ) काय चाड आम्हां बाहेरल्या वेषं
सुखाचें कारण असे अंतरी तें ।।
भीतरीं पालट जंव नाहीं झाला ।
तोंवरी न बोली जाणपणें ।। (संत नामदेव १८७९)
- वैराग्य हे बाहेरून आणता येत नाही. मनातून त्याचा उदय व्हावा लागतो. प्रासंगिक वैराग्य अनुभवाच्या कसोटीवर टिकत नाही, याची जाणीव संत नामदेवांनी पुढील अभंगात दिली आहे –
आ) संन्यासाची सोंगे आणिताति सांग ।
परि वैराग्याचे अंग आणितां नये ।।
नामा म्हणे कीर्तन करिताति सांग ।
परि प्रेमाचे तें अंग आणितां नयें ।। संत नामदेव १८५६
संत नामदेवांनी समाजात शुद्धाचार निर्माण व्हावेत, यासाठी लोकमानस जागृत केले. सामाजिक जीवनातील दोष त्यांनी दूर केले ते सांगतात..
आम्ही परीट चोखट । शुद्ध केले खटनाट ।।
बोध साबण लावूनि ठायीं । डाग उडविला पाहीं ।।
शांति शिळेवरी धुतलें। ज्ञानगंगे निर्मळ झाले ।।
परब्रह्म होऊनी ठेलों । नामा म्हणे सुखरूप झालों ।। (संत नामदेव १८१२)
संत नामदेवांनी सामाजिक जीवन विशुद्ध करण्याची सतत चिंता वाहिली. संतश्रेष्ठ नामदेव सामाजिक जीवनाला सतत सामोरे गेले. चमत्कारांचे भांडवल न करता ‘भूतीं दया धरा भक्तिभाव करा’, असा लोकोपदेश त्यांनी केला. विठ्ठलाच्या एकेश्वरवादाची प्राणप्रतिष्ठा त्यांनी केली. त्यांच्या काळात शैव- वैष्णवात पराकोटीचे कलह निर्माण झालेले होते. तेव्हा त्यांनी ‘नामा म्हणे शिवविष्णूमूर्ति एक।’… ‘भजन करा रे हरिहरा नारायणा शिवशंकरा। माझें बोलणे अवधारा। भेद न करा दोघांचा ।।’ असे आपल्या अभंगवाणीने घोषित केले आणि शैव-वैष्णवातील तीव्र संघर्ष मिटवून, त्यांच्यात ऐक्य घडवून आणले.
उत्तर भारतात भ्रमण आणि वास्तव्य करीत असताना, त्यांनी आपल्या हिंदी अभंगवाणीतून, ‘संतमता’चे म्हणजे हिंदीतील ‘निर्गुण भक्तिसंप्रदाया’चे प्रवर्तन केले. त्यांच्यापासूनच हिंदी संतपरंपरेचा आणि हिंदी भक्तिकाव्याचा शुभारंभ झाल्याचे साधार प्रतिपादन, हिंदी संतवाङ्गय संशोधकांनी आणि अभ्यासकांनी केले आहे. संत कबीर आणि गुरू नानकदेवांना आपापल्या धर्मसंप्रदायाच्या निर्मितीची काही प्रेरणाबीजे, संत नामदेवांच्या हिंदी अभंगांतून मिळाल्याचे, कबीरवाणीतून आणि गुरू नानकदेववाणीतून कळून येते.
उत्तर भारतात भक्त बोहरदास-विष्णुस्वामी-जाल्हण लध्धा-केसो कलंधर असा त्यांचा शिष्यपरिवार होता. या उत्तर भारतीय शिष्यांच्या परंपरागत वंशजांनी, संत नामदेवांचे ‘सद्गुरूत्व’ आजही भक्तिभावाने जपले आहे. संक्षेपतः मध्ययुगीन संतपरंपरेतील श्रीनामदेवांचे अलौकिक चरित्र, त्यांचे लोकप्रबोधक मराठी हिंदी अभंगवाङ्गय आणि अतुलनीय कार्यकर्तृत्व हे जसे आपल्या महाराष्ट्राचे- मराठी जनतेचे सांस्कृतिक वैभव आहे, तसेच ते आपल्या भारताचेही सांस्कृतिक ऐश्वर्य आहे यात तिळमात्र शंका नाही..!
समाप्त.