NewsSpecial Day

हिंदूंच्या सुडाची यशोगाथा.. “राक्षसभुवनची लढाई”..

Battle of Rakshasbhuvan...

“The third battle of Panipat was not that much fatal to the Maratha empire than the early death of Peshwa Madhav Rao in 1772.”-Grant Duff..

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील गोदावरी काठच्या गेवराई तालुक्यात राक्षसभुवन हे गाव आहे. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासातील भूषणीय असा एक रणसंग्राम या ठिकाणी घडला. १० ऑगस्ट ई.स १७६३ रोजी राक्षसभुवन येथे पेशवा माधवराव आणि हैदराबादच्या निजामअली मध्ये ही लढाई झाली यास राक्षसभुवनची लढाई देखील म्हणतात. निजामाचे सैन्य दिवाण विठ्ठल सुन्दरच्या नेतृत्वात लढत होते जे या युद्धात मारले गेले.राजनीती, युद्धकला आणि शौर्य ह्यांचा संगम असलेली लढाई म्हणजे “राक्षसभुवनची लढाई”..

इ. सन १७५९ मध्ये सदाशिव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी सेनेने उदगीरच्या भुईकोट किल्ल्यावर आक्रमण करून निजाम अलीचा मोठा पराभव केला होता. या लढाईत निजामाच्या मोठ-मोठ्या सरदारांना भाऊंनी यमसदनी धाडले होते.हिंदूंकडून मोठा पराभव निजामाला पत्करावा लागला होता. उदगीरच्या लढाईत गमावलेला सर्व प्रदेश हैदराबादच्या निजामाला काहीही करून परत मिळवायचा होता.

पानिपतच्या रणसंग्रामानंतर चहुबाजूच्या शत्रूचे लक्ष हिंदू साम्राज्यावरती केंद्रित झाले होते. विश्वासराव पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली,त्यावेळी माधवरावांचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्यांचे काका रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा हे सर्व कारभार पाहू लागले. जरी माधवराव अल्पवयीन असले तरीही बुद्धिचातुर्याने राज्य कारभार स्वतः चालवण्याची धमक त्यांच्यात होती.

याच काळात हिंदवी साम्राज्यात चार असामान्य व्यक्तिमत्त्वांनी आपली छाप त्या काळावर उमटवली, त्यांना साडेतीन शहाणे असं नाव मिळालं. या चार जणांमध्ये सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस यांचा समावेश होतो. बोकील, चोरघडे आणि विठ्ठल सुंदर हे मुत्सद्दी तर होतेच पण ते योद्धेही होते त्यामुळे त्यांना पूर्ण शहाणे म्हणत. तर नाना फडणवीस हे फक्त मुत्सद्दी असल्यामुळे त्यांना अर्थे शहाणे म्हटले जाते. अर्धे शहाणे असं नानांना म्हटलं असलं तरी इतिहासातील एका मोठ्या काळावर त्यांचा पगडा होता. तत्कालीन अनेक महत्त्वाचे निर्णय, घडामोडी केवळ त्यांच्या निर्णयांमुळे झाल्या.

पानिपतानंतर विखुरलेल्या हिंदवी सैन्याला पुन्हा एकवटून संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हायचे होते. पेशव्यांमधील गृहकलह व सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष सुरू झाला होता. याचवेळी निजाम व हैदर अली यांच्या हिंदू साम्राज्याविरुद्ध छद्मी डावपेच,हालचाली सुरू झाल्या. हैदराबादच्या निजामाने पुण्यापर्यंत मजल मारली होती. निजामा प्रमाणेच हैदर अलीने ही या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलुख हस्तगत केला. माधवराव पेशवे यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत निजामाला तोंड द्यावे लागले. निजामाने पुण्याच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर माधवरावांनी निजामाच्या प्रदेशात हल्ला करून मोठी आगेकूच केली.

निजामाला अगदी कोंडीत पकडल्यावर मात्र रघुनाथरावांनी एकदम निर्णय बदलला. निजामाचा पूर्ण बीमोड करण्याऐवजी त्याला स्वराज्याचा २७ लाखांचा भाग तोडून दिला. निजामाचे सहाय्य मिळावे म्हणून रघुनाथराव यांनी निजामाचा पूर्वी जिंकलेला सर्व प्रदेश त्यास परत केला परंतु एवढ्याने निजामाचे समाधान होईना. निजामाने पुण्यावर पुन्हा हल्ला करून पुण्याची खूप मोठी नासधूस केली. यावेळी मात्र पेशव्यांना सर्व कुटुंब कबिल्यासह सिंहगड व लोहगड या किल्ल्यांच्या आश्रयास जावे लागले. नागपूरकर भोसले यांनी निजामाची बाजू धरलेली असताना निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असे समजतास भोसल्यांनाही आपली चूक उमगली व ते ही निजामाविरुद्ध सज्ज झाले. निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असल्यामुळे आता त्याचे खरे रुप रघुनाथरावास देखील कळाले होते. अंतर्गत कलह विसरून सर्वांनी एकजुटीने प्रतिकार करण्याचा निर्धार यावेळेस केला.

माधवरावांनी खुद्द निजामाच्या प्रदेशावर हल्ला चढविला आणि भाग्यनगर पर्यंत त्यांनी आक्रमण करून तो प्रदेश लुटला. पुण्यावर हल्ला करत असलेला निजाम ही बातमी ऐकून माघारी परतला पण मराठ्‌यांनी एकत्रितपणे त्यास गनिमी युद्ध तंत्राने वाटेत जेरीस आणले. या लढाईमध्ये निजामाबरोबर ३५ हजार सैन्य तसेच इस्माईल खान पन्नी, राघोजी जाधवराव, नानासाहेब निंबाळकर खर्डेकर आणि फ्रेंच सैन्याचा जनरल बुसी यांचे सैन्य देखील निजामाच्या मदतीस आले होते. मराठ्यांचे नेतृत्व श्रीमंत थोरले पेशवे माधवराव करत होते त्यांच्यासोबत होते रघुनाथराव पेशवे, जानोजी भोसले, विसाजी त्र्यंबक, सरदार नारो शंकर दाणी, बाबूजी नाईक सरदार, मालोजी राजे तिसरे घोरपडे आणि मुधोळचे सरदार यशवंतराव व संताजी राव वाबळे. जवळजवळ पाच ते सहा महिने हा रणसंग्राम सुरू होता.

राक्षसभुवन रणसंग्राम :-

निजाम गोदावरी ओलांडून संभाजीनगराकडे कुच करणार आहे अशी वार्ता माधवरावांना वाटेत असताना समजली. आतापर्यंत निजामाला त्याच्याच मुलखात झुंजवत ठेवले होते. सगळेच राजकारण धुळीस मिळणार होते.मग काय कुठल्याही परिस्थितीत निजामाला गोदावरी पार करू द्यायचे नाही अशी जिद्द बाळगून माधवरावांनी व्यूहरचना आखली.निजामाला कोंडीत पकडून मारावे असा बेत ठरला.आषाढ वद्य अमावस्येला माधवराव हुजुरातीसह राक्षसभुवन पासून आठ कोसांवर येऊन पोहचताच त्यांना बातमी मिळाली की, स्वतः निजाम आणि निजामाचे अर्धे सैन्य गोदावरी पार झाले आहे, परंतु निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर २५ हजार सैन्य तथा निवडक तोफांसह मागे राहिला आहे. हे कळताच अधिक दिरंगाई न करता हिंदवी सैन्याने कूच केले मग काय १७६३ साली श्रावणाच्या पहिल्या दिवशी पहाटे लढाईला सुरुवात झाली.

अचानक मराठ्यांचा हल्ला झालेला बघून निजामाच्या फौजांनी युद्धाची सिद्धता केली त्यांनी आपल्या तोफांना बत्ती दिली परंतु काही वेळातच निजामाच्या दारू गोळ्याला प्रचंड मोठी आग लागली मग काय पुरंदरे आणि विठ्ठल शिवदेव यांनी आपल्या तलवारीची चमक दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या मागे राघोबा दादा हत्तीवरून आवेशाने पुढे सरकू लागले.निजामाचे दिवाण असलेल्या विठ्ठल सुंदरने स्वतःला सावरले आणि युद्धात आपले सर्व सैन्य उतरवले.

निजामाचा मारा वाढताच हिंदवी सैन्य मागे सरकू लागले राघोबा दादांना निजामाच्या सैन्याने घेरले..पराजय आता समोर दिसू लागला. पानिपत व्हायची चिन्हे दिसू लागली.पानिपतात झालेल्या पराभवातून हिंदवी सेनेने एक शिकवण जरूर घेतली होती ती म्हणजे “राखीव सैन्य”.

राघोबा दादा घेरले जाताच,माधवरावांनी हुजुरातीची मांड उठवली. नव्या दमाचे सैन्य येताच निकराचा लढा सुरू झाला मग काय आसमंत ‘हर हर महादेव’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. भगवा ध्वज हाती घेतलेल्या सैन्याचा रुद्रावतार पाहून निजामाचे सैन्य वाट दिसेल तिकडे पळू लागले,माधवरावांनी पराक्रमाची शर्थ केली. प्रचंड लांडगेतोड सुरु झाली या कापाकापीत निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर गोळी लागून ठार झाला.

निजाम गोदावरीच्या पलीकडच्या टेकडीवरून रणसंग्राम पाहत होता पण तो काहीही करू शकला नाही. गोदामाईने निजामाला वाचवले अन्यथा थोडा वेळ आणखी मिळाला असता तर निजामशाही त्याच दिवशी संपली असती. मग त्याच विठ्ठल सुंदरच्या अंबारीत बसून माधवराव आपल्या मुक्कामावर गेले. रात्र झाली होती अंधाराचा फायदा घेऊन निजाम तोफा हत्ती जड सामान तेथेच टाकून तेथून कसाबसा सटकला आणि संभाजीनगर शहराच्या आश्रयाला गेला. त्याला पूर्ण खात्री होती की आता आपलं पारिपत्य निश्चित आहे. पुढे ८ दिवसांनी गोदावरीचे पाणी उतरताच माधवरावांनी संभाजीनगर शहराला वेढा दिला. मग काय निजाम नाक घासत शरण आला..

६ महिने चाललेल्या या युद्धाला युद्धविराम मिळाला आणि छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) इथे माधवराव आणि निजाम यांच्यामध्ये एक तह झाला ज्यामध्ये निजामाला ६२ लक्ष चा प्रदेश मराठ्यांना द्यावा लागला. देऊळगाव आणि लिंबागणेश हे भागही मराठा साम्राज्य मध्ये समाविष्ट करण्यात आले.तसेच युद्ध खर्च म्हणून अतिरिक्त २० लक्ष उत्पन्नाचा प्रदेशावर निजामाला पाणी सोडावे लागले.

राक्षस भुवन च्या लढाईमध्ये निर्णायक विजयश्री प्राप्त करत हिंदवी साम्राज्य अधिक शक्तिशाली बनले.हिंदू राजांचा राक्षसी इस्लामी शासकांवर विजय म्हणून राक्षस भुवनची लढाई इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे.

Back to top button