ChristianityHinduismNews

योद्धा संन्यासी.. “विष्णुबुवा ब्रह्मचारी”.. भाग २

Vishnubawa Brahmachari

९ ऑगस्ट (श्रावण शु. ५) विष्णु बुवांचे द्विशताब्दी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने विष्णुबुवांची महती सांगणारी ५ भागांची विशेष मालिका..

मुंबईस प्रयाण –

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रवास केल्यानंतर दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात द्वारकेला जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे, अशी ओढ त्यांना लागली. त्या हेतूने ते १८५६ च्या सप्टेंबर महिन्यात मध्ये मुंबईत काळबादेवीला आले. तत्पूर्वी बुवांची कीर्ती साऱ्या शहरभर पसरली होती. त्यामुळे या तेजस्वी आणि वलयांकित व्यक्तिमत्वाची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मुंबईकरांची पावले गणेशवाडीच्या दिशेने पडू लागली. त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा आणि वादविवाद करण्यासाठी लोकांचे थवेच्या थवे त्यांच्या बिऱ्हाडी येऊ लागले. बुवांचे रूप, त्यांचे तेज, खंडनमंडन करण्याची त्यांची तडफ, लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची पद्धत पाहून हा कोणी अवतारी पुरुष आपल्या गावी आलेला आहे, असा लोकांना विश्वास वाटू लागला.

ब्रिटिश राजसत्तेच्या आशीर्वादाने भारतात आलेले ख्रिस्ती मिशनरी (ख्रिस्ती ध्रमोपदेशक) सेवा आणि शिक्षणाच्या नावाखाली हिंदू आणि पारशी समाजाचे धर्मांतर करीत होते. हिंदुधर्मातील जातीपाती, विषमता, विसंगती यावर ते टीका करीत. ख्रिश्‍चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मग्रंथांच्या हस्तलिखितांमधून ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्याला उपयोगी पडतील अशी हिंदू धर्मातील दोषस्थळे निवडून काढलेली होती आणि त्या आधारे ते हिंदू धर्मावर खोडसाळ टीका करत होते. याच्या उलट सर्वांना समान मानणारा खिस्तीधर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत. त्यांचा हा कुटील डाव विष्णु बुवांनी ओळखला.

वेदोक्त मंडन आणि परमत खंडन..

विष्णुबुवांनी ख्रिश्चनांच्या टीकेचे खंडन करण्यासाठी लहान मोठया बैठका घ्यायला सुरूवात केली. प्रत्येक शनिवारी गिरगावातील प्रभू सेमीनरीत त्यांची व्याख्याने होत असत. २० सप्टेंबर १८५६ पासून दर शनिवारी गिरगावातील प्रभू जातीच्या विद्यालयात (प्रभू सेमिनरी) सभा आयोजित केल्या जात. या सभांना इतकी प्रचंड गर्दी उसळत असे की सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी एक आणा प्रवेशमूल्य (तिकीट) आकारण्यात आले होते. भारताच्या इतिहासात व्याख्यानासाठी तिकीट आकारण्याची ही पहिलीच घटना असावी. या व्याख्यानमालेच्या व्यवस्थापनात विद्यालयातील सोकर बापूजी त्रिलोकेकर, शामराव मोरोजी त्रिलोकेकर आणि आत्माराम सदानंद या शिक्षकांचा पुढाकार होता.

मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. धाकजी दादाजी, श्री. सखारामजी यांच्या घरी आणि इतरत्रही चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत असे. या सभांना अनेक जातींचे विविध मतांचे लोक उपस्थित राहत. अनेक श्रोते वेगवेगळ्या प्रश्नांचा भडिमार करत असत. उत्तरे देताना बुवा त्यांच्या प्रश्नांचा एका फटक्यात फडशा पाडत असत. बुवांकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असे, प्रत्येक शंकेचे समाधान ते करीत. निरुत्तर होण्याचा प्रसंग त्यांच्यावर येत नसे. विष्णुबुवांचे वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य अत्यंत प्रभावी होते. रेव्ह. जॉर्ज बोवेन या सभांना उपस्थित राहात असे. त्याने विष्णुबुवांना प्रश्न विचारल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.

विष्णुबुवांचे चरित्रकार श्री. रामचंद्र पांडुरंग आजरेकरशास्त्री यांनी या सभांचा वृत्तांत चरित्रात लिहिला आहे. ते लिहितात, ‘वाहव्वा, वाहव्वा असे बोलत सभेतील मंडळी चकित आणि स्तंभित होत. त्यांच्या मुखाकडे टक लावून पाहत. एकाग्र चित्ताने कान लावून ऐकत. कोणास प्रश्न सुचत नसे. तर्क – कुतर्क करण्यास अवकाश मिळत नसे. त्यांच्या वाक्प्रवाहापुढे इतरांची भाषणे व प्रश्न फिके दिसू लागत. कोणी हुं की चूं देखील करत नसल्याने सभा चित्राप्रमाणे निश्चेष्ट होऊन जात असे.’ अशा एकूण ५० सभा झाल्या. या सभांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत होता. उदंड म्हणजे इतका प्रचंड प्रतिसाद की त्यामुळे व्याख्यानांसाठी या जागा कमी पडू लागल्या. या सभांमध्ये हिंदू धर्मांतरित मंडळींना प्रवेश नसे. म्हणून विष्णुबुवांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेण्यास सुरुवात केली.

समुद्रकिनारीचा वादविवाद –

१५ जानेवारी १८५७ ते २८ मे १८५७ या कालावधीत प्रत्येक गुरूवारी संध्याकाळी ५.०० वा. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या ख्रिश्‍चन मिशनऱ्यांसोबत २० जाहीर वादविवाद सभा झाल्या. या सभांना अस्पृश्य, ख्रिस्ती आणि इतर सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेश असे. मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मांचे लोक विष्णुबुवांना ऐकण्यासाठी येत असत. मुंबईचा पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेट स्वतः पोलिसांना घेऊन या सभांच्या बंदोबस्तासाठी उपस्थित राहत असे.

ख्रिश्चनांच्या बाजूने रेव्ह. जॉर्ज बोवेन, रेव्ह. हेनरी बॅलेन्टाईन, रेव्ह. वॉलेस , रेव्ह. नारायण शेषाद्री, रेव्ह. विल्सन, रेव्ह. दाजी पांडुरंग, हरी केशवजी असत. विष्णुबुवांच्या मुंबई येथील कार्यात श्री. जगन्नाथ शंकरशेट, शेट मंगळदास नथूभाई, शेट वरजीवनदास, शेट रामलाल, कृष्णशास्त्री साठे, दादाभाई नौरोजी, भवानी विश्वनाथ कानविंदे, रामचंद्र पांडुरंग आजरेकर शास्त्री, आत्माराम बापुजी दळवी, सर जमशेटजी जिजीभाई, पेस्तनजी फ्रामजी कामा आणि कॅप्टन फेल्प्स, खानु बबर्जी, रमता फकीर या महानुभावांनी विष्णुबुवांना सहकार्य केले.

क्रमशः

लेखक : – सुरेश गोखले

अधिक माहितीसाठी :

https://www.vishnubuvabrahmachari.com/

Back to top button