९ ऑगस्ट (श्रावण शु. ५) विष्णु बुवांचे द्विशताब्दी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने विष्णुबुवांची महती सांगणारी ५ भागांची विशेष मालिका..
ख्रिस्ती मिशनऱ्यांचे एकमेव ध्येय आहे आणि ते म्हणजे गैर ख्रिस्त्यांचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनविणे आणि संपूर्ण जगात येशूचे राज्य आणणे. मुस्लिमांचेही संपूर्ण जगात इस्लामचे राज्य आणण्याचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी असंख्य मार्ग अवलंबिले आहेत आणि पुढेही असेच करतील. परंतु त्यांच्या एक गुणाचे कौतुक करायला हवे ते म्हणजे त्यामागील त्यांची तीव्र प्रेरणा. या प्रेरणेपोटी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्वतःचा देश सोडून हजारो मैल दूरच्या देशात येऊन स्थानिक भाषांचा अभ्यास केला, प्राविण्य मिळविले, प्रचारासाठी देशी भाषांमध्ये स्वतःचे धर्मग्रंथ आणि पुस्तके लिहिली.
सन १८०० मध्ये कोलकात्यात आलेला मिशनरी विल्यम केरी भारतात १२ भाषा शिकून आला होता, त्यातील ५ भारतीय भाषा होत्या. त्याने १८०५ मध्ये मराठी व्याकरणाचे पुस्तक प्रकाशित केले. ३३ भारतीय भाषांमध्ये बायबलचे भाषांतर केले. सन १८२९ मध्ये मुंबईत आलेला मिशनरी जॉन विल्सन मराठी भाषा शिकण्यासाठी दापोलीजवळील हर्णे या गावी वर्षभर जाऊन राहिला. मिशनऱ्यांनी हिंदू धर्मग्रंथ, भाषा, संस्कृती, परंपरा, आचारविचार, सवयी शिकून घेतल्या आणि त्यांचा वापर वेदोक्त हिंदू धर्माला सुरुंग लावून उध्वस्त करण्यासाठी केला आहे.
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे आधी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी लढणाऱ्यांमध्ये बाळशास्त्री जांभेकर, मोरोभट दांडेकर, नारायण राव, कृष्णशास्त्री साठे यांची विशेषत्वाने नोंद घ्यावी लागेल. या मंडळींनी आपला व्यवसाय, आपले लौकिक जीवन सांभाळून वेदोक्त हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. विष्णुबुवांची मात्र वेदोक्त हिंदू धर्म रक्षण आणि प्रसार हे आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय ठरवून त्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांनी कोणताही अन्य व्यवसाय केला नाही व्किंवा लौकिक जीवन जगले नाहीत. परकीय आणि स्वकीयांकडून होणाऱ्या टीका आणि निंदा नालस्तीची अजिबात चिंता केली नाही. याउलट ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या मनात त्यांच्या नावाची धास्ती निर्माण झाली होती. आपल्या इप्सित जीवन ध्येयाशी एकनिष्ठ राहून त्यासाठी अविरत संघर्ष केला.
विष्णुबुवांचे समकालीन म्हणजे धर्मांतरित झालेले रेव्ह. नारायण शेषाद्री , बाबा पदमजी. त्यांचे नंतर ख्रिस्ती झालेल्या पंडिता रमाबाई. या सर्वांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, जातीभेद, महिलांवरील अत्याचार, अस्पृश्यता आणि हिंदू धर्मातील फोलपणा यांना कंटाळून हिंदू धर्माचा त्याग केला असे म्हटले जाते. ख्रिस्ती धर्म हा अधिक चांगल्या प्रकारे मुक्ती देणारा वाटल्याने त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला असेही म्हणतात. मला आश्चर्य वाटते की ज्यांना हिंदू धर्म ग्रंथातील फोलपणा लक्षात आला त्यांना बायबलमधील फोलपणा कसा लक्षात आला नाही. येथे अजून एक मुद्दा महत्वाचा आहे. त्यावेळी ब्रिटिश (ख्रिस्ती) राजसत्ता असल्याने मिशनऱ्यांना त्यांचा आश्वासक पाठिंबा होता. त्यामुळे राजसत्तेला जो ख्रिस्ती मार्ग जवळचा होता तो पत्करून प्रतिष्ठा, मोठेपण आणि पैसा मिळणे सोपे होते.
https://www.evivek.com/Encyc/2023/7/29/Vishnubuva-Brahmachari-Biography-And-Life-History.html
ब्रिटिशांची सत्ता असल्याने हव्या तेवढ्या जमिनी मिळत होत्या आणि त्यामुळे चर्च, शाळा, वसतिगृह, आश्रम काढणे सोपे होते. सेवाकार्यांचा बुरखा पांघरून धर्मांतरे घडवून आणि राज्यकर्त्यांची मर्जी राखून पारितोषिके मिळण्यासारखे होते. याउलट विष्णुबुवांनी पत्करलेला मार्ग संघर्षाचा, मिशनऱ्यांच्या आणि साहजिकच राज्यकर्त्यांच्या विरोधात असल्याने खूप कठीण होता आणि येथे पारितोषिके मिळणार नव्हती.
त्यामुळे रेव्ह. नारायण शेषाद्री, बाबा पदमजी, पंडिता रमाबाई आणि तत्सम मंडळी स्वतः ख्रिस्ती झाली आणि हिंदू धर्मियांना बाटवून समाज सुधारणा घडविण्याचा (?) सोपा मार्ग पत्करला. त्यांच्या या कृतीने समाजाचा आणि देशाचा किती लाभ झाला याचा विचार भारतीय ख्रिस्ती बांधवानी करायला हवा. याचे कारण म्हणजे आपल्या देशासमोर असलेल्या अनेक समस्या मिशनऱ्यांनी घडविलेल्या हिंदूंच्या धर्मांतरामुळे उद्भवल्या आहेत. या मंडळींनी हिंदू धर्मातच राहून जर संघर्ष केला असता तर देशाचा लाभ झाला असता.
विष्णुबुवांची ख्याती अजून एका गोष्टीतून स्पष्ट होते. रेव्ह. जॉर्ज बोवेन याने त्यांना बायबल नेऊन दिले होते. त्याचा कयास होता की विष्णुबुवा बायबल वाचून इतरांसारखे बायबलवासी होतील आणि त्यांच्या मागोमाग हजारोंच्या संख्येने हिंदू समाज ख्रिस्ती होईल. परंतु तसे झाले नाही. विष्णुबुवांनी बायबलच्या – जुना करार आणि नवा कराराचा अभ्यास करून त्यातील फोलपणा, भंपक गोष्टी, अंधश्रद्धा जाहीरपणे जनतेसमोर मांडल्या आणि मिशनऱ्यांना ते मान्य करावे लागले. यामुळे हिंदू आणि पारशी धर्मियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि ख्रिस्ती झालेली मंडळीं परावर्तन करून आपल्या मूळ धर्मात आणि पारशी धर्मात परतली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मांतराचे जे एक वादळ निर्माण केले होते त्याचा विष्णुबुवांनी बिमोड केला.
रेव्ह. जॉर्ज बोवेनने त्याच्या आईला आणि बहिणींना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. १८५६ आणि १८५७ मध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये त्याने विष्णुबुवांचा हिंदुधर्मरक्षक म्हणून वर्णन केले आहे. या पत्रांमधील वर्णनातून विष्णुबुवांची विलक्षण बुद्धिमत्ता, अफाट कार्य आणि विजिगीषु वृत्ती प्रकर्षाने दिसून येते.
या देशात राहणारा संपूर्ण समाज एकरूप आणि एकरस असला पाहिजे, असे निरंतर प्रयत्न वेदोक्त धर्माचे पालन करणाऱ्या आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी केले. वर्ण, वंश, आचार पद्धती इत्यादी गोष्टींचा अडसर निर्माण न करता समरस समाज निर्माण केला. सद्यस्थितीत त्या उज्वल स्वरूपाचा लोप झाल्यामुळेच आपण भारतवासीय अशा हीन स्थितीला येऊन पोहोचलो, तेव्हा त्या तेजस्वी धर्माची पुनर्स्थापना झाल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही अशी त्यांची शिकवण होती. अशा सामाजिक हिंदुत्वाच्या विचारांची मांडणी विष्णुबुवांनी आयुष्यभर आपल्या साहित्यातून आणि व्याख्यानांमधून केली आणि त्यानुसार आचरण केले. ज्या जातिभेदांमुळे एकेकाळी बलशाली असणारा आपला समाज पारतंत्र्याच्या खाईत लोटला गेला, ते जातीभेद दूर सारून सर्वानी संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या स्वामी दयानंद आणि स्वामी विवेकानंद यांचे ते पूर्वसुरी आणि सामाजिक हिंदुत्वाचे उद्गाते होते, असे म्हणणे योग्य ठरेल.
हिंदूंच्या धर्मांतरातून आपल्या देशावर आघात करणाऱ्या सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणाला चारीमुंड्या चीत करून वेदोक्त हिंदू धर्माची ग्वाही देण्यासाठी विष्णुबुवांचे चरित्र, विचार आणि कार्यपद्धती समजून घेऊन त्याप्रमाणे आपण आचरण करायला पाहिजे. .
जनहोतुंह्मीसंसारकरा II परीतारकराममनीस्मरा II
नरदेहाऐसाअमोलदुसरा II पुन्हादेहमिळेना II ((भावार्थ सिंधू , ५/७६)
डॉ. फ्रॅंक कॉनलॉन यांच्या मते “ True to his given name, he remained Vishnu – the preserver. “ वेदोक्त हिंदू धर्मरक्षणाचे महान कार्य करून विष्णुबुवांनी आपले ‘ विष्णू ‘ (संरक्षक) हे नाव सिद्ध केले.
‘विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र’ साहित्य, प्रबोधन आणि सेवेच्या माध्यमातून विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे.
समाप्त.
लेखक : – सुरेश गोखले
अधिक माहितीसाठी :