HinduismNewsSevaWorld

हिंदुत्व जागरणातील मैलाचा दगड..

vishwa hindu parishad foundation day

“विश्व हिंदू परिषद” म्हटलं की आपल्याला राम जन्मभूमी आंदोलन आठवतं. एखादा आंदोलन एखाद्या संघटनेची ओळख व्हावी इतकं मोठं आणि यशस्वी आंदोलन विश्व हिंदू परिषदेने उभे केलेले होते. देशामध्ये अनेक आंदोलने होत असतात. परंतु काही आंदोलने तात्कालीक असतात तर काही दीर्घ जीवी असतात. परंतु फार थोड्या आंदोलनांना यशस्वी होण्याचे भाग्य लाभतं. दीर्घ जीवी आंदोलनांच्या नशिबी तर बरेच वेळा असे भाग्य येत नाही. परंतु रामजन्मभूमीचे आंदोलन हे मात्र याला अपवाद आहे.

1925 साली ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्यावेळेस लोक असं म्हणायचे की चार हिंदू एकाच दिशेने त्याच वेळेला जातील जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर आडवा असेल. परंतु हे चित्र 06 डिसेंबर 1992 ला ज्यावेळेला बाबरी ढाचा तुटला त्यावेळेला पूर्णतः पालटलेलं होत. दहा लाख लोकांपेक्षा अधिक संपूर्ण भारतातील लोक, ज्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, ज्यांची भूषा वेगळी आहे, ज्यांची भोजन पद्धती वेगळी आहे असे सर्व लोक आपल्या जाती पंथ, उपासना पद्धती या सर्वांना बाजूला सारून केवळ हिंदुत्वाच्या नावावर रामललासाठी एकत्र आले होते. हिंदुत्वाच्या इतिहासातील ही फार मोठी घटना आहे. एव्हढे मोठे आंदोलन उभे करून त्याला यशस्वी करण्याचे श्रेय निर्विवादपणे विश्व हिंदू परिषदेला द्यावे लागते.

29 ऑगस्ट 1964 कृष्ण जन्माष्टमी या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजी गोळवलकर यांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनातून विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. स्वामी चिन्मयानंद,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे साधुसंत सुद्धा या स्थापनेमागे होते. भारतामध्ये लाखो साधुसंत,हजारो मठ व संप्रदाय आहेत. ही खूप मोठी शक्ती भारतामध्ये आहे. या सर्व शक्तीला एकत्र करणे गरजेचे होते. अस्पृश्यता ही गोष्ट हिंदू धर्मातील कुठल्याही ग्रंथांमध्ये सांगितलेली नसून सुद्धा ती लोकांच्या आचरणात होती. त्यामुळे हिंदू समाजाचे विघटन वर्षांनुवर्षांपासून सुरू होते. त्यामुळे 1969 साली उडुपी येथे हिंदू धर्म संमेलन झाले. यामध्ये चारही पिठांचे शंकराचार्य एकत्र आले व त्यांनी सर्व हिंदू एकमेकांचे भाऊ आहेत कोणीही अस्पृश्य नाही अशा पद्धतीची घोषणा केली. ज्यामुळे देशामध्ये एक मोठा संदेश गेला.

कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य

पूजनीय जयेंद्र सरस्वती यांनी तर तामिळनाडूतील अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांमध्ये जाऊन सुद्धा हा समानतेचा संदेश दिला. काशीमध्ये गंगेच्या घाटावर प्रेत जाळणाऱ्या चांडाळ लोकांची संख्या मोठी आहे. त्या चांडाळांचा जो राजा आहे त्याचे नाव डोमराजा. 1994 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोकजी सिंहल,महंत अवैद्यनाथ, पूजनीय रामचंद्र दास महाराज हे त्या डोमराजाच्या घरी गेले व त्यांनी त्याच्या घरी भोजन केले. व यातून कुठलाही हिंदू अस्पृश्य नाही अशा पद्धतीचा संदेश दिला गेला. सामाजिक समरसेच्या दृष्टिकोनातून विश्व हिंदू परिषदेने उचललेले हे एक फार मोठा पाऊल होते.

1981 मध्ये तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम येथे अनुसूचित जातीच्या लोकांनी सामूहिक धर्मांतरण करून इस्लामचा स्वीकार केला. त्यामागे इतर समाजाकडून त्यांना मिळणारी अस्पृशतेची वागणूक हे कारण होते. त्याच तामिळनाडूमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सामाजिक समरसतेच्या साठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. ज्या समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्या समाजातील 20 हजारापेक्षा अधिक पुजाऱ्यांना प्रशिक्षित करून विविध मंदिरामध्ये पुजारी बनण्यासाठी पात्र करण्यात आले. सामाजिक समरसतेच्या क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषदेने करून दाखविलेले हे एक मोठे परिवर्तन होते.

कोणीही हिंदू धर्म परिवर्तन करून इतर धर्मात जाऊ नये यासाठी व ज्यांनी धर्म परिवर्तन केलेले आहे त्यांनी पुन्हा स्वधर्मात परत यावे यासाठी विश्व हिंदू परिषदेने घरवापसीचे कार्यक्रम देशभर घेतले. परधर्मात गेलेल्या लोकांना सुद्धा सन्मानाने स्वधर्मात आणल्या गेले. ज्या ज्या ठिकाणी हिंदूंवर धार्मिक अत्याचार करण्यात येत होते त्या त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने जशास तसे उत्तर देऊन धार्मिक कट्टर वादाचा सामना केलेला आहे. ज्या हिंदू मुलींना फूस लावून लव जिहादच्या नावाखाली पळून नेले जाते अशा अनेक प्रकरणां मध्ये मुलीच्या आई वडिलांच्या बाजूने व मुलीच्या बाजूने सुद्धा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी नेहमीच उभी राहते. देशभरामध्ये आजपर्यंत अशा हजारो मुलींना पुन्हा एकदा परत आणण्याचे कार्य विश्व हिंदू परिषदेने केलेले आहे.

वनवासी गिरीवासी जनते करता एकल विद्यालय, शिक्षा प्रकल्प, स्वास्थ प्रकल्प, पीडित लोकांना आश्रय,गोरक्षण अशा पद्धतीचे कार्य संपूर्ण देशभर सुरू आहे. एक मात्र विश्व हिंदू परिषद आहे की जिचे कार्यकर्ते कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंना अडवतात व त्यांची रवानगी गोरक्षणात करतात. ठिकठिकाणी चालणाऱ्या गोरक्षण कार्यासोबतच गोविज्ञान अनुसंधान हे सुद्धा कार्य विश्व हिंदू परिषदेतर्फे चालविले जाते.

गावागावांमध्ये जी खूप मोठी युवाशक्ती आहे त्या युवाशक्तीला बजरंग दलाच्या नावाने एकत्र करून त्यांना हिंदुत्वाचे संस्कार देण्याचे कार्य बजरंग दलाने केलेले आहे.याचाच परिणाम म्हणून गोहत्या, कट्टरवाद,लव्ह जिहाद, धर्मांतरण इत्यादी सर्व स्थानिक समस्यांसाठी बजरंग दलाचे तरुण हे नेहमीच अग्रेसर होऊन समाजाची सेवा व रक्षण करण्याचे कार्य करीत असतात.

पाश्चिमात्य संकल्पना ही स्त्रीमुक्तीची आहे. परंतु दुर्गा वाहिनीच्या द्वारे स्त्री शक्ती चा प्रत्यय समाजाला येतो आहे. शौर्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुण-तरुणींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य बजरंग दल व दुर्गा वाहिनी करीत आहे. सेक्युलरिझमच्या दुष्प्रचारामध्ये या देशातला तरुण, तरुणी केवळ भौतिक वादाचे,उपभोक्तावादाचे बळी ठरू नये त्यांना हिंदुत्वाचे संस्कार मिळावे व हिंदू आता मार खाणार नाही हा संदेश सर्व अहिंदू लोकांपर्यंत जावा या उद्देशाने हे कार्य सुरू आहे. हिंदू समाजाच्या बलसंपन्नतेसाठी चालणारे हे कार्य आहे. हिंदू समाज एकजूट व्हावा, संस्कारित व्हावा, सामर्थ्य संपन्न व्हावा यासाठी चालणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यामध्ये आपण ही सहभागी झाले पाहिजे.

लेखक :- अमोल पुसदकर

Back to top button