नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका..
नौदलाच्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा…
भारतीय नौदलाची ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा. महाराजांनी सर्वांत आधी आरमाराचे महत्व ओळखले, ते सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. कान्होजी आंग्रे यांचे नौदलात मोठे योगदान असल्याची उदाहरणे इतिहासात वाचायला मिळतात.
वसुबारस १६५७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी देवीच्या साक्षीने याच दुर्गाडी किल्ल्यावर स्वराज्याच्या आरमाराची मूर्तमेढ रोवली होती. पोर्तुगीज नौदल अभियंत्यांकडून गनिमी काव्याने जहाज बांधणी शिकून घेतलेल्या स्वराज्याच्या कुशल कामगारांनी पुढे आपले “आत्मनिर्भर” सुसज्ज व बलाढ्य आरमार उभे केले. छत्रपती शिवरायांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात दीर्घकाळ, स्वराज्याच्या या आरमाराने पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच अशा त्यावेळच्या सगळ्या बलाढ्य फिरंगी आरमारांना विलक्षण धाकात ठेवले होते.
छत्रपती शिवरायांनी समुद्रामार्गाचे महत्त्व जाणून समुद्र मार्गातील सुरक्षेवर करडी नजर ठेऊन शत्रूला रोखण्याचे काम केले. भौगोलिक रचनेनुसार ७५१७ किमी समुद्र किनारा आपल्या देशाला लाभला आहे. पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. समुद्र किनारा हा आपल्याला तिन्ही बाजूंनी लाभला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या, ब्रिटिश वसाहतवादाच्या आठवणींच्या बेड्यांमधून मुक्त होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय नौसेनेने त्यांचे ‘शं नो वरुण:‘ हे ब्रीदवाक्य कायम ठेवून, ब्रिटिश सेंट जॉर्ज क्रॉस असलेले अधिकृत चिन्ह बदलून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या भारताच्या पहिल्या नौदलाला मानवंदना म्हणून, शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेचा आधार घेत नवीन Ensign अर्थात अधिकृत चिन्ह / मुद्रा प्रसारित केली आहे.
भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिशा, गोवा, अंदमान निकोबार, तामिळनाडू, तेलंगाणा, गुजरात, केरळ, पोंडीचेरी, दिव-दमन व लक्ष्यद्वीप हे राज्य किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत. तसेच पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि आग्नेयला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.जगातील जवळपास ८० टक्के व्यापार आपल्या हिंदी महासागरातून होतो. त्यामुळे भारतीय नौदलावर संरक्षणाची मोठी जबाबदारी आहे.
एकीकडे धूर्त,दगाबाज चीन, दुसऱ्या बाजूला कपटी कारस्थानी पाकिस्तान असताना आपल्याला कायम युद्धसज्ज रहावेच लागणार आहे..एक सशक्त संरक्षण आणि सामरिक शक्ती म्हणून भारत देश पुढे येत असतानाच, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उरावर बाळगलेली ब्रिटिशांची मानसिक गुलामगिरी झुगारून द्यायला ह्या निमित्ताने सुरुवात होते आहे.
आत्मनिर्भर नौदलाची आगेकूच..
“Organized force alone enables the quiet and the weak to go about their business and to sleep securely in their beds, safe from the violent without or within.” ― Alfred Thayer Mahan
अमेरिकेचे सर्वोत्तम सामरिक तज्ज्ञ म्हणून गणल्या जाणाऱ्या अडमिरल महान यांचे शतकभरापूर्वीचे हे उद्गार आजही जगभरातल्या सामरिक दलांना लागू पडतात आणि भविष्यातही ते त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही.
भारतीय नौदल जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नौदल आहे. हिंदी महासागरातील भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा, तसेच लोकसंख्या व अर्थव्यवस्था यांमुळे जागतिक उलाढालींमुळे भारताला प्राप्त होत असलेले महत्त्व, यांचा विचार करता भारतीय नौदलाचे सामर्थ्य येत्या काळात वाढते राहणे याला काहीही पर्याय नाही. अमेरिका, फ्रान्स, रशिया व अन्य देशांच्या नौदलांचा हिंदी महासागरातील संचार ही आवश्यकता अधोरेखित करतो. एखाद्या देशाच्या नावाने महासागर ओळखला जाण्याचे तसेच सात देशांच्या सागरी सीमांशी आपल्या सागरी सीमा भिडलेल्या असणे अशी आणखी दोन वेगळी वैशिष्ट्ये आहेत जी जपण्यासाठीही भारतीय नौदलाने सामर्थ्यसंपन्न होणे अत्यावश्यक बनले आहे.
एडनच्या आखातातून मलाक्का सामुद्रधुनीमार्गे जाणारे तसेच, केप ऑफ गुड होपला वळसा घालून मलाक्काच्या सामुद्रधुनीमार्गे जाणारे असे जगातले महत्त्वाचे प्राचीन सागरी व्यापारी मार्ग सारे हिंदी महासागरातून जातात. त्यांची सुरक्षितताही अखेरीस भारतीय नौदलावरच अवलंबून असणार आहे.
‘आत्मनिर्भर भारता’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानास यशस्वी करण्यासाठी लष्कराने नेहमीच साथ दिली आहे. लष्कराच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त ऑर्डर्स या भारतीय कंपन्यांना देण्यात येतात. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणे सहज शक्य आहे.
INS विक्रांत पहिली स्वदेशी विमानवाहू नौका :-INS विक्रांत ही भारतात बांधलेली, स्वदेशी पहिली विमानवाहू नौका आहे. ही नौका केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (cochin shipyard ltd-CSL) मध्ये बांधण्यात आली होती. या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव भारतातील पहिल्या विमानवाहू वाहक INS विक्रांतच्या नावावरून ठेवण्यात आले. ४५,०००टनाची INS विक्रांत २०,००० कोटी रुपये खर्चून बांधली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ती नौदलात सामील झाली होती.
Hindustan Aeronautics Limited:-
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड १९४२ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय हवाई दल तसेच लष्कर आणि नौदलासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि एव्हीओनिक्सचे उत्पादन, डिझाइन आणि निर्मितीबरोबरच भारतीय लष्करी विमानांसाठी ओव्हरहॉलिंग, अपग्रेडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच अतिरिक्त पुरवठा अविरतपणे करत आहे.हेलिकॉप्टर निर्मितीच्या क्षेत्रात, एचएएलने सुरुवातीला चेतक, चिता, लान्सर, चीतल आणि चेतन अशा हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि पुरवठा तर केलाच, त्याबरोबरीने नंतर त्यांच्या प्रगत आवृत्यांवरही काम केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ची निर्मिती, जे तिन्ही सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले गेले.
भारतीय उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, सैन्य सामग्री आयात करणारा देश अशी ओळख पुसून काढत सैन्य सामग्री उत्पादक देश व निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण होतेय. तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप, इनोव्हेशन या गोष्टींच्या बळावर भारत आत्मनिर्भर होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रगती करत आहे.
राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपविता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशात संशोधन व विकास याला चालना मिळत असून, लष्करात देखील त्यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशील लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदी क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे.
सैन्य सुधारणांवर भर..
सैन्यातील प्रशासकीय बदल, नवीन शस्त्रास्त्रांची क्षेपणास्त्रांची आयात, सैन्यात महिलांना निर्माण झालेली समान संधी, ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत असलेले सुरक्षा धोरण, दरवर्षी वाढत असलेली सुरक्षा उपकरणांची निर्यात त्याचबरोबर आंतरिक सुरक्षेबाबत सुसज्जता यांसारख्या अनेक प्रगत हालचालीमुळे भारताच्या संरक्षण धोरणाची दखल आज जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
उरी-पुलवामासारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि चीनच्या गलवान खोरे किंवा अरुणाचल प्रदेश येथील घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने त्यांना समजेल अशा भाषेतच उत्तर दिले आहे आणि देत राहणार हे निश्चित.
मागीलवर्षी सुदानच्या यादवीत तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने मध्यरात्री सुदानची राजदानी खार्टुम जवळ ४० किलोमिटर अंतरावरील एका ओबडधोबड धावपट्टीवर रात्रीच्या मिट्ट काळोखात हवाईदलाने विमान उतरवून भारतीय नागरिकांची सुटका केली होती .त्या घटनेची आठवण यावी असा हा भीम पराक्रम आहे.विशेष म्हणजे या धावपट्टीपर्यंतचा रस्ता २००५ साली भारतानेच बनवला होता.
नवीन जागतिक परिस्थितीत, जेव्हा आपण स्वावलंबी होऊ तेव्हाच आपण जागतिक शक्तींशी स्पर्धा करू शकू, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी होईल.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत सातत्याने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. आणि भारतामध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल झाले आहेत आणि या कारणास्तव भारताची अर्थव्यवस्था आज आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
संरक्षण,शेतीपासून अंतराळापर्यंत, दळणवळण क्रांतीपासून ट्रेन बनवण्यापर्यंत कोणत्याही क्षेत्रात असो, भारत प्रत्येक कामात स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल करत आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक प्रगतीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी प्रबळ सैन्यव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नव्याने उदयास येत असलेल्या बहुध्रुवीय सत्तेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याच गतीने जर आपला सैन्यविकास सुरू राहिला तर, स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तिशाली सेना म्हणून आणि हे भारतराष्ट्र “विश्वगुरू” म्हणून नक्कीच उदयास येईल यात तीळमात्र शंका नाही..
भारतीय नौदलाला मनःपूर्वक शुभेच्छा !