कोरेगाव भीमा..बाबासाहेब आंबेडकर..आणि..अर्बन नक्षल..
koregaon bhima babasaheb ambedkar
कोरेगाव भीमा हा देशाच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर आला आहे, तोच मुळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या १ जानेवारी २०१८ च्या जातीय दंगलीमुळे , हे दुर्दैवच म्हणावे लागेल. हे सर्व घडवून आणले गेले यात शंकाच नाही , यामागे वेगवेगळ्या राष्ट्रविघातक शक्तींचे हितसंबंध आहेतच, ते नक्की कोण? त्याचा तपास सुरु आहे.
अर्बन नक्षलवादी म्हणजेच शहरी नक्षलवादी यामागे असावेत, असा पोलिसांचाही कयास आहे. कारण वेगवेगळे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींनी , बंदी घातलेल्या CPI माओवादी गटाच्या कबीर कला मंचने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाडा येथे केलेले आयोजन , वाटण्यात आलेली पत्रके व देशभरातील नक्षलवादी वक्त्यांची भडकाऊ भाषणं आणि दिशाभूल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारी . हे एक जाणीवपूर्वक रचण्यात आलेल्या षडयंत्राचा भाग असल्याचे धागेदोरे भारतभरातील शहरी नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचलेले आहेत , हे पोलिस तपासातून निष्पन्न होत आहे.
१ जानेवारी १९२७..
इंग्रजांच्या या जातीवादी धोरणाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ ला कोरेगाव जयस्तंभ इथे सभा घेतली. त्याबाबतीत धनंजय कीर यांच्या पुस्तकातील संदर्भ पुढीलप्रमाणे, (प्रकरण ५- बंडाचे निशाण उभारले)
“सन १९२७ साल उजाडले. आंबेडकरांनी त्या वर्षातील कार्याचा आरंभ कोरेगाव युद्ध स्मारकासमोर भरलेल्या सभेने केला. त्या सभेस अस्पृश्य समाजातले काही नामवंत पुढारी उपस्थित होते. त्या सभेत भाषण करताना आंबेडकरांनी कृतघ्न ब्रिटिश सरकारचा जळजळीत शब्दात निषेध केला. ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी अनेक लढायांत सरकारला यश मिळवून दिले, त्या महार जातीच्या तरुणांना सैन्यात प्रवेश नाकारून सरकारने त्यांचा (महार जातीचा) विश्वासघात केला आहे असे त्यांनी आपले मत उघडपणे बोलून दाखविले. ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे; पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का ? स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्यामांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून ! पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की, महारांवरील लष्कर-प्रवेश-बंदी ब्रिटिश सरकारने उठवावी. जर सरकारने ती गोष्ट केली नाही तर सरकारविरुद्ध चळवळ करावी”
पुढे अस्पृश्यांच्या लष्करी भरतीच्या मागणी संदर्भात ८ जून १९२८ रोजी दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे मिलिटरी पेन्शनर्सच्या सभेत अध्यक्ष म्हणून बोलताना डॉ. आंबेडकरांनी इंग्रज सरकारच्या कृतघ्नपणाचा इतिहास सांगून सरकारच्या धोरणांवर कडक टीका केली.
तत्कालीन संदर्भ व डॉ. आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट अभ्यासला असता इंग्रजांनी महार जातीला सैन्यात भरती करून घेण्यास बंदी घातली. इंग्रजांना ह्या जातीवादाचा जाब विचारण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ची सभा बोलावली होती.
महार रेजिमेंट आणि अपप्रचार..
१८१८च्या कोरेगाव भीमा लढाईच्या निमित्ताने ‘महार रेजिमेंट’ बद्दल देखील सत्याचा जाणूनबुजून विपर्यास करून अपप्रचार केला जातो. १८१८ कोरेगाव भीमा लढाईमध्ये इंग्रजांतर्फे ३ युनिट्स लढल्या..
१. ‘सेकंड बटालियन फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री’ जी आज भारतीय लष्करामध्ये ‘२ ग्रेनेडिअर’ नावाने कार्यरत आहे.
२. ‘द पूना ऑक्सिलरी हॉर्स’ जी आज भारतीय लष्करामध्ये ‘द १७ पूना हॉर्स’ या नावाने कार्यरत आहे.
३. ‘मद्रास आर्टिलरी सपोर्टिव्ह’ जी एक सहाय्यक तुकडी होती.
यामध्ये कुठेही महार रेजिमेंटचा उल्लेख समकालीन संदर्भामध्ये मिळत नाही. अर्थातच त्यावेळेस अशी महार रेजिमेंट अस्तित्वात नव्हती.१९४१ साली तत्कालीन संरक्षण समितीचे सदस्य असताना डॉ. आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांनी ‘महार रेजिमेंट’ची स्थापना झाली. महार रेजिमेंट आणि कोरेगाव भीमा लढाईचा काहीही प्रत्यक्ष संबंध नाही.
कोरेगाव भीमा – जातीअंताची लढाई नव्हे, मराठा-इंग्रज युद्ध
कोरेगाव भीमा – इंग्रजांचा जातीवाद
कोरेगावच्या लढाईतील पूना ऑक्सिलरी हॉर्स पलटण बांधणीच्याच वेळी इंग्रजांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये “Men of low caste not to be admitted (खालच्या जातीच्या सैनिकांना प्रवेश नाही)”, असे म्हटले होते. (संदर्भ ” पूना हॉर्सेस ” हे पुस्तक) तसेच जयस्तंभ इन -चार्ज नेमण्यासाठी परवारी (म्हणजेच महार) जातीचा प्रतिनिधी नको” असे इंग्रजांच्या समकालीन कागदपत्रात आहे. यावरून इंग्रजांचा जातीवाद दिसून येतो.
“डॉ. बाबासाहेबांचे समाजावर, या देशावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या सुवचनांची मोडतोड करून आपल्या स्वार्थासाठी वापर करणारे काही विकृत महाभाग आहेत. बाबासाहेबांची ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ ही राष्ट्रत्वाची संकल्पना अशा छद्मी पुरोगाम्यांना मान्य नाहीच.
भारतात निर्माण होत असलेल्या जातीय सलोख्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्र विघातक शक्तींनी चालवले आहे , असे अभ्यासाअंती आढळून येते. जर खरा इतिहास समोर आला तर अनुसूचित जाती आणि तथाकथित उच्चवर्णीय यांच्यात संघर्ष पेटता ठेवणे त्यांना शक्य होणार नाही, याची जाणीव राष्ट्राविघातकी शक्तींना आहे. त्यामुळे पुन्हा खोटे नाटे आरोप करून अनुसूचित जातीच्या तरुणांची डोकी भडकवण्याचे काम ही अर्बन नक्सल मंडळी करत आहेत.
शिकलेला अनुसूचित जाती चे तरुण आज सर्व समाजाबरोबर मुख्य प्रवाहात खांद्याला खांदा लावून काम करत असताना समरस झालेला आहे. जातीपातीच्या भिंती या आंतरजातीय व्यवहारातून मोडून पडत आहेत .त्यामुळे हळूहळू जातीअंताकडे समाजाचे मार्गक्रमण सुरु आहे. परंतु असे झाले तर ज्यांची रोजी रोटी यावर सुरु आहे ,त्यांच्यासाठी हे मोठे नुकसानकारक ठरणारे आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि तथाकथित उच्चवर्णीय हा संघर्ष कायम राहावा , यासाठी खोटा इतिहास सातत्याने सांगून माथी भडकवत ठेवण्याचे काम ही मंडळी करताहेत.
षडयंत्रपूर्वक अनुसूचित जातीच्या चळवळीचा ताबा त्यात घुसून काही शहरी नक्षलवादी मंडळी घेत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा ची जखम भळभळती राहील, याची खबरदारी ही मंडळी घेत असतात. त्यामुळे खरा इतिहास पुढे येणार नाही याची काळजी ते घेत असतात अन्यथा रोहन माळवदकर यांच्या या पुस्तिकेतील आवाहनाला पुराव्यानिशी उत्तर देता आले असते. पण तसे करणे अजूनही छद्मी पुरोगाम्यांना जमलेले नाही.
एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत,बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आज सर्व समाजाला शिक्षणाची कवाडं उघडी झाली आहेत . सर्व समाज शिक्षित झालेला आहे, होतो आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग खरे काय आणि खोटे काय? हे तपासण्यासाठी आपणच केला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी कोणी आपला वापर तर करून घेत नाही ना? एवढे भान तर आपण राखायलाच हवे. अत्यंत चतुराईने सामान्य भाबड्या समाजाच्या मनात विष कालवून, देशाच्या कानाकोपऱ्यात आज जातींच्या पलीकडे जाऊन जो सलोखा निर्माण झाला आहे. तो डोळ्यात खुपणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींच्या इकोसिस्टीमला आपण व आपला भोळा समाज बळी पडणार नाही,याचे भान राखले पाहिजे.
‘मूलनिवासी दलित मुस्लीम भाई भाई, हिंदू कोम कहासे आई’ अशा घोषणा देण्यात ज्यांचे आयुष्य गेले. आपण सगळे भारतीय आहोत, आपला इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीयत्व एक आहे, या संकल्पनेवर कपटी नक्सलींचा कधीही विश्वास नसतोच.
“जय भीम जय मीम” करणारे आमच्या आया बहिणींचे राजरोसपणे तुकडे करताना आपण बघतो आहोत . लांडगे कोणत्या रुपात येऊन आपल्या कळपात( म्हणजे अनुसूचित जातीच्या चळवळीत) घुसताहेत, हे सतर्क राहून हाणून पाडले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा मार्ग अनुसरुनच न्याय मिळवला पाहिजे.अन्यथा आपणच घटनाविरोधी /संविधान विरोधी ठरु.
अनुसूचित जातींमधील ब्राह्मण द्वेषाच्या विद्रोहावर सतत फुंकर मारुन,हा विस्तव धगधगता ठेवणा-यांचे मनसुबे आता ओळखायला हवेत. बाबासाहेबांनी सर्व समाजाला सोबत घेऊन अस्पृश्यांसाठी लढा दिला. आपण कोणाच्याही हातातले बाहुले बनणार नाही, याची अनुसूचित जातीच्या बांधवांनी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच जातीय सलोखा दृष्टीक्षेपात असताना आणि सर्व समाज समरस होत असताना, धर्मांध,जिहादी राष्ट्रविघातक शक्तींच्या कपटी कारस्थानाला बळी न पडता, ही विद्वेषाची जखम भळभळती ठेवू इच्छिणा-यांच्या मनसुब्यांना उधळून लावणे प्रत्येक देशभक्त नागरिकाचे इष्ट कर्तव्य आहे.