IslamNational SecurityNews

हिजाबचे षडयंत्र..

World hijab day...

दरवर्षी ०१ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा ‘वर्ल्ड हिजाब डे’ वरकरणी निरूपद्रवी वाटत असला तरी अशा माध्यमातूनच इस्लामिक संस्कृती, प्रथा परंपरा रुजविण्याचे प्रयत्न केले जातात, यावर प्रकाश टाकणारा लेख..

कुणी तरी एका ब्लॉगरने आपल्या ब्लॉगवर लिहीले की , ” हिजाब घालणे हे शालीनतेचे प्रतीक आहे. यावर बंदी घालणे हे मुस्लिम स्त्रियांना हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे आहे. तसेच हिजाब बंदी म्हणजे जगातील सर्व स्त्रियांच्या पेहराव निवडीच्या स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे. म्हणून जगातील सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन ही स्त्री स्वातंत्र्याची लढाई भारतासारख्या पर्दा प्रथा नसलेल्या देशातील हिंदू स्त्रियांनी देखील लढायला पाहिजे “. ‘ हिजाब वापरण्याने स्त्रीयांचे सबलीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट होते म्हणून मुस्लिमेत्तर स्त्रीयांनी हिजाब वापरायला हवा. ‘

एखाद्या टाकाऊ प्रथेचे उदात्तीकरण या पेक्षा चांगल्या पद्धतीने करता येत नाही. त्यातही ज्या प्रथेचा जन्मच मुळात स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या उद्देशाने झाला आहे, अशा प्रथेचे उदात्तीकरण करीत जगातील स्त्री शक्तीला एखाद्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करणे हे, शुध्द गुलामगिरीची मानसिकता जोपासण्याचे निदर्शक मानले पाहिजे. दुर्दैवाने इस्लाम मधे विचार स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य, आहार विहार स्वातंत्र्य याना मागील दोन हजार वर्षांपासून स्थान नाही. त्यामुळे मुस्लिम उच्च शिक्षीत व्यक्ती देखील आज स्वतंत्र विचार करताना दिसत नाही. त्यातही जेव्हा जागतिक पातळीवर इस्लामला त्यातील प्रथा परंपरां व मानसिकते सहीत टिकेचे लक्ष केले जात असलेल्या या काळातही कुठेही दृष्टीला दिसत नाही. किंबहुना मुस्लिम स्त्रियांच या विषयावर दुभंगलेल्या दिसतात.

हिजाब हा आज जगभरात चर्चेचा विषय झालेला दिसतो. ९/११ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर दहशतवादी हल्ल्यात जवळजवळ ३००० लोकं मृत्यूमुखी पडले. अमेरिकेवर होणारा पहिलाच दहशतवादी हल्ला हा एवढा मोठा होता की त्यानंतर अमेरिकन समाजमनात एक भयगंड निर्माण झाला. त्यातुन मग इस्लामिक संस्कृती, खानपान, आचरण, पेहराव याविषयी संशय निर्माण झाला. इस्लामिक स्त्रीयांच्या पेहरावावर मग शंका घेतल्या जाऊ लागली. हिजाब म्हणजे स्त्रीयांनी सर्व शरीर झाकण्यासाठी वापरले जाणारे एक वस्त्र. या हिजाबला मुस्लिम धर्मात एक विशिष्ट महत्व देखील आहे. त्यामागे स्त्री चे सौंदर्य आच्छादण्याचा उद्देश आहे . स्त्री सौंदर्य परपुरषांच्या नजरेला ते पडू नये हा उद्देश होता. पुरूषांनी आपला मानसिक तोल सांभाळला पाहिजे याकडे इस्लाम दुर्लक्ष करतो. किंवा स्त्री संरक्षणाची वेगळी व्यवस्था निर्माण न करता, इस्लाम स्त्रीलाच बंधनात अडकवतांना दिसतो.

हिजाब वापरण्याचे शारीरिक, मानसिक व आरोग्य दृष्टीने अनेक दुष्परिणाम आहेत. तसेच केस आणि चेहरा झाकण्यामुळे त्या स्त्रीची ओळख देखील झाकली जाते हे लक्षात घेतले पाहिजे. ९/११ चा दहशतवादी हल्ला हा मुस्लिम अतिरेक्यांनी केलेला असल्याने, मुस्लिम व्यक्तीच्या ओळखीला त्यानंतर विशेष महत्त्व प्राप्त झाले. या हिजाबचा किंवा बुरख्याचा वापर मुस्लिम अतिरेकी करू शकतात हे लक्षात घेऊन मग अनेक देशांमध्ये हिजाबच्या वापरावर निर्बंध घातले गेले. फ्रांस, डेन्मार्क, स्पेन, बेल्जियम अशा देशांमधे हिजाब वापरण्यावर बंदी घातली गेली. काही ठिकाणी हिजाब वापरणाऱ्या मुस्लिम स्त्रीयांना अपमानित केले जाऊ लागले. या सामाजिक आणि राजकीय वादाला प्रति उत्तर देण्यासाठी २०१३ पासून अमेरीकेत हिजाब वापरणे हा स्त्रीयांचा अधिकार आहे अश्या स्वरूपाची चळवळ उभी केली गेली.

वोक विचारसणीच्या ताब्यात असलेल्या माध्यमांनी लागलीच ही चळवळ उचलून धरली. आणि त्यातून आता १ फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड हिजाब डे म्हणून साजरा करून जगातील गैर इस्लामिक स्त्रीयांना गोडीगुलाबीने वा जबरदस्तीने एक दिवस इस्लामिक पेहराव चढवण्याचे षडयंत्र आकाराला आलेले दिसते. मुस्लिमेत्तरांना इस्लाम मधील हिजाब प्रथेविषयी माहिती देणे. या पोशाखात त्यांना कसे सुरक्षित वाटते याचा अनुभव देणे ( की पटवून देणे ). वर्षातून एक दिवस एक वेगळा पोशाख, वेगळी फॅशन असे या चळवळीचे गोंडस आणि वरकरणी निरूपद्रवी उद्देश सांगितले जातात.

त्याच वेळी इस्लामिक राष्ट्र इराण मधे मात्र हिजाबच्या सक्ती विरोधात आंदोलन छेडले गेले आहे. इराण मधे सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि ढिलेढाले कपडे असणे स्त्रियां करीता अनिवार्य आहे. असे कपडे न घातल्यास त्या देशात दंड आणि कैद अथवा फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. हिजाब सक्तीच्या विरोधात तीथे चळवळ फोफावते आहे. ही आंदोलने / चळवळी ‘ व्हाईट वेनेस्डे ‘ तसेच ‘ माय स्टिल्थी फ्रिडम ‘ या नावाने जगभरात ओळखल्या जातात. हिजाब विरोधी आंदोलनात एका विद्यार्थीनीचा इराण पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्यावर हे आंदोलन अधिकच चिघळतांना दिसते. अनेक तरूणी आपला विना हिजाब फोटो समाज माध्यमांवर टाकून हिजाब विरोधी आंदोलनात सहभागी होताना दिसतात.

एखाद्या विशिष्ट पोशाखाची किंवा पोशाख पध्दतीची सक्ती ही कोणत्याही व्यक्ती समूहाच्या स्वातंत्र्याचा विलोप करणारेच असते. एकीकडे इराण सारख्या इस्लामिक देशात हिजाब विरोधी चळवळ मुळ धरतांना दिसते. तर त्याच वेळी अमेरिकेसारख्या अवास्तव व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या देशातून हिजाब डे सारख्या प्रतिगामी प्रथा जगभर पसरतांना दिसून येतात. दोन्ही चळवळी एकाच काळात घडत असताना इतरत्र यावर काय भूमिका घ्यावी यावर समाज संभ्रमात दिसतो. त्यामुळे भारतासारख्या हिंदू बहुल देशातील समाजाने यावर वेळीच निश्चित भूमिका घेणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला विशिष्ट पोशाख घालण्याची सक्ती करणे हे आधुनिक स्त्रीवादाच्या आणि तथाकथित उदारमतवादाच्याही विरोधात जाणारे आहे. त्यामुळे ‘हिजाब डे’ आणि ‘व्हाईट वेनेस्डे’ या दोन चळवळी वरवर परस्परविरोधी वाटत असल्या, तरी त्यामध्ये- स्त्रियांना पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे ही समान मागणी आहे. आणि हेच आजच्या सांस्कृतिक मार्क्सवादाचे वैशिष्ट्य आहे.

दोन परस्परविरोधी चळवळींचा वापर करून एकाच वेळी अनेक ठिकाणी अराजक माजवणे हेच यांचे उद्दिष्ट होय. तर त्याच वेळी कोणत्याही प्रकारे इस्लामी प्रथा भारतीय हिंदू स्त्रीयांमधे रूजवण्याचे इस्लाम आणि वोक विचारसरणीचे हे कारस्थान आहे. ज्या देशात हिजाब प्रथा कधीच अस्तित्वात नव्हती. ज्या देशातील वातावरण या प्रथेला कोणत्याही प्रकारे अनुकूल नाही. अशा हिंदू बहुल देशात हिजाब डे किंवा व्हाईट वेनेस्डे चे कोणतेही प्रयोजन असूच शकत नाही. त्यामुळे असल्या प्रथा, फॅशनच्या नावाखाली, हिंदू स्त्रीयांमधे रूजवण्याचा हा प्रयत्न आहे. याच पद्धतीने हलाल प्रथा या देशात रूळवली गेली. तर कपाळी कुंकू किंवा गंध लावण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याची सुरुवात झाली.

मुसलमानांना मशिदीतुन ध्वनिक्षेपकाद्वारे नमाजासाठी बांग देण्याची पध्दत देखील अशीच या देशात रूजवली गेली. ज्या गोष्टींची येथील नैसर्गिक वातावरणात आणि समाजात आवश्यकताच नाही अशा वरकरणी निरूपद्रवी गोष्टींचा वापर इस्लामिक संस्कृती, प्रथा परंपरा रूजविण्यासाठी केला जातो. ज्या देशात स्त्री ला आचार, विचार, आहार, आणि वस्त्र निवडीचे संपूर्ण स्वतंत्र आहे, अशा भारतात फॅशन वा कोणत्याही नावाखाली, कोणत्याही कारणाने अश्या दिवसांच्या आयोजनाचे कोणतेही औचित्य असत नाही.

प्रश्न आहे तो हा की, सह अस्तित्व आणि इतर धर्मांप्रती सन्मान राखण्याच्या नादात मुस्लिम समाजाचा दबाव आम्ही स्विकारायचा का ? या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूनी आपली अत्यंत उदात्त आणि उदार संस्कृती विकृत करायची का ? जर या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर हिजाब डे आणि व्हाईट वेनेस्डे आम्ही आजच नाकारले पाहिजे. आजच शाळा, महाविद्यालये, कार्यालये यातून सर्व समाजाने या इस्लामिक थेरांना स्पष्ट आणि उच्चरवाने नाही म्हटले पाहिजे. मागील काही शतकांपासून या देशावर सातत्याने होत असलेले सांस्कृतिक आक्रमण हे अनेकदा खुलेपणाने तर अनेकदा छुपेपणाने झाले आहे.

दुर्दैवाने बहुसंख्य हिंदू , संख्येने अल्प असलेल्या मुस्लिम समाजा विरोधात वा मुस्लिम धर्म संस्कृती विरोधात आपला नकाराधिकार खणखणीत पणे वापरण्यात ढीसाळपणा करतात किंवा कच खातात , असा इतिहास आहे. हिजाब डे सारख्या छुप्या आक्रमणाला वेळीच खुलेपणाने हिंदू समाजाने नाकारणे ही काळाची गरज आहे. विशेषतः महाविद्यालयातील हिंदू तरूणाईने ठामपणे हिजाबला नकार दिलाच पाहिजे.

लेखक :- डॉ. विवेक राजे.

Back to top button