ब्रह्मांड निर्मितीसाठी विविध युगामध्ये सृजन आणि निर्मितीचे आविष्कार हळूहळू झाले. सृष्टीची निर्मिती करण्यासाठी विविध विषयांची निवड केली गेली. वास्तुशिल्प, नगररचना, शस्त्रनिर्मिती, धातुशिल्प, कला, साहित्य, संगीत, सौंदर्यशास्त्र, भांडी आणि आभूषणे. या सगळ्या क्षेत्रांतील ज्ञान परंपरेने विकसित होत गेले. या क्षेत्रातील आद्य उद्गात्यांमध्ये विश्वकर्मा होते, ज्यांना निर्मितीच्या देवतेचे रूप मानले गेले आणि ते खऱ्याअर्थाने अभियंते होते.
आपली कला ग्रामीण आणि नागरी जीवनात उपयोगी पडावी, यासाठी सेवा म्हणून समर्पित गट भारतभर प्रवास करत होते. विविध राजांचा राजाश्रय मिळत गेला, आणि त्यांना पुरस्कृत केले गेले. आजच्या काळातही विज्ञानाला अचंबित करणारे वास्तुविशारद, शिल्पज्ञ, यंत्रकार, संशोधक, निर्माते आणि रचनाकार सेवा देत आहेत.
ओतारी, पाथरवट, वडार, मातीटकारी, गवंडी, कंजारभाट, लमाण, बंजारा, वंजारी, सुतार, कुंभार, कास्तकार, लोहार, सोनार, चित्रकार, विणकर आणि पटवेकरी यांसारख्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण जीवनाची आवश्यकता भागवली. त्यांच्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक संशोधन केले गेले. शेतीला उपयोगी ठरलेले सूर्यप्रकाश, पाऊस, हवामान आणि इतर निसर्गनिर्मित आपदांमध्येही काळाच्या कसोटीला उतरलेल्या या फिरत्या वेधशाळा होत्या.
केवळ पैसा मिळवून पोट भरणे हा मर्यादित हेतू नव्हता. त्यांचा देव, देश आणि धर्माप्रती असलेला सेवाभाव होता. या सर्व कर्मवीरांनी परकीय आक्रमकांना तोंड दिले. स्वाभिमान न सोडता गावोगाव सतत भटकंती केली आणि समाजाचे जागरण केले. वासुदेव, पिंगळा, नंदीबैलवाले, डोंबारी, कोल्हाटी आणि अन्य स्वराज्याच्या कार्यात मदतनीस ठरले. पिंगळा, वासुदेव, देवीचा पोतदार, भराडी, भोपे, येळकोट, भराडी गोंधळी, वाघ्या मुरळी, गुरव, गिरी, डवरी गोसावी, बिरोबा चे, विरोबाचे भैरव हे सण, उत्सव आणि नवरात्रीत सेवा देत.
किर्तनकार, कथेकरी रामदासी, भक्तीचे धडे देत, वाकळे, घोंगड्या तयार करणारे धनगर, विणकर, पद्मशाली, स्वकुळ साळी दैनंदिन जीवनात सेवा देत. मरिआईवाले, पोतराज, कुडमुडे जोशी, ग्रामजोशी, रायरन, बहुरुपी, पावरी, डोंबारी, विदूषक, चित्रकथी, कोल्हाटी, पहलवान, मनोरंजनयुक्त कसब दाखवित. वैदू, शाहीर, वादक, गायक विविध विषयांसाठी उपयोगी पडत. कोळी, भोई, घिसाडी, लोहार, सोनार दागिन्यांपासून तोफगोळ्यांपर्यंत तरबेज होते.
यज्ञवेदींच्या रचनांसाठी, खगोलीय ग्रह आणि नक्षत्र गोलांचे वेध घेऊन भविष्याची भाकिते मांडणारे जोतिषी, जलदुर्गाचे रक्षण करणारे तांडेल, भांडारी आणि तोडकर हे गडांचे रक्षक असत. महादेव कोळी, पावरी, कातकरी, पारधी, मसणजोगी, शिकालकरी डोंगरदर्यातले, गोंड, भिल्ल, गायपारधी, रानपारधी, डोंबारी, शिकारी, रानोमाळ भटकून उदरनिर्वाह करत असत.
हजारो वर्षांचा वारसा घेऊन संस्कृती सनातन ठरली. नंतरच्या मुघलांसारख्या जिहादी आणि इंग्रजांसारख्या परकीय आक्रमकांच्या कुटील कारवायांच्या बळी ठरली. कला, साहित्य, कौशल्यावर आधारित ही विश्वकल्याणाची कामना करणारी रुपे मध्ययुगीन कालखंडानंतर कधी परागंदा झाली, कधी स्थलांतरित झाली. परंतु स्वाभिमानाने धर्म न सोडता भटकत राहिली. तीच मंडळी स्वाभिमानी, धर्मनिष्ठ कर्मवीर भटके विमुक्त म्हणून आज जीवन व्यतीत करत आहेत.
आज सृष्टीच्या निर्मितीचा आदिदेवांचे स्मरण करताना समाजातील जिवंत जागते विश्वकर्मा अशा या भटक्यांच्या उत्थानासाठी संघटीत हिंदू बांधवांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि त्यांनी हिंदू संस्कृतीवर केलेल्या उपकारांचे स्मरण करणे आवश्यक आहे. आजचा दिवशी जगभर विखुरलेल्या विविध भटक्या बांधवांच्या प्रती सन्मानाने हृद्य कर्तव्यपूर्तीच्या दृढ संकल्पाने समरस हिंदू समाज निर्मितीचा संकल्प करुयात, समाजपुरुष होई जागृत असे जगाला आवाहन करुयात..
भारताचिया महारथाला सारे मिसळुनी ओढूया.
पायी गती अन् हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया.
लेखक – श्री अभय जामगांवकर.
(भटके विमुक्त विकास परिषद)