NewsRSSकोकण प्रान्त

आज एक समिधा धगधगत्या यज्ञकुंडात शांत झाली.

Sagri seema manch kokan prant..

चंद्रकांत भिकू पवार (गिरी) हे चालत फिरत माणूस जोडणार यंत्र . नविन कार्यकर्ता जोडणं,नव्या वस्तीत काम सुरू करण,नवी संकल्पना रुजवण ..या नव्याच्या नवलाईचा कसलाही मुलाहिजा न बाळगता त्यास भिडून आपलस करन यात या माणसाचा हातखंड होता.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जेमतेम साधन दिमतीला घेऊन ही व्यक्ती संघ विचारांचा अलख जागवत सर्वत्र विहार करायची.

देवनार गोवंडीतील दुर्लक्षित अशा सेवा वस्तीत राहून तिथेच संघ शाखेवर दैनदिन कामात त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. खरोखरीच इतक्या विषम परिस्थितीतही विचारांची कास न सोडता .ते दैनंदिन आयुष्यात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न चंद्रकांतजी करत होते. या नित्य संघ संस्कारातून त्यांचं व्यक्तिमत्व आकारास येत होत. सांघिक,वर्ग ,संघ शिबिर यातून ते अधिक खुलत गेल.

संघ प्रशिक्षणातील तृतीय वर्ष ही त्यांनी विशेष श्रेणीतून अलीकडेच पूर्ण केलं.अनेक बाल, तरुण स्वयंसेकांचे ते लाडके शिक्षक होते. या उपाधीने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. कार्यकर्त्यांचे आई वडील ही म्हणायचे की शिक्षक आले. पुढे तर संपर्कात येणारे उच्च शिक्षित कार्यकर्तेही त्यांना शिक्षक म्हणू लागले. नराचा नारायण होतानाची ही प्रकिया खरच विस्मयकारक होती.

आपण आयुष्यभर जे संचित संकलित केलं आहे त्यासाठीच अगदी निष्ठेने आपलं आयुष्य खर्ची घालायचं हा निर्धार त्यांनी फार पूर्वीच करून ठेवला होता. यासाठी शाळेतील नोकरीतून ही त्यांनी २ वर्षे लवकर निवृती घेतली. देहाला जेव्हा ध्येयाची जोड मिळते तेव्हा त्याच बावनकशी सोन होत हे ते जणू नित्य अनुभवत होते. त्याच्या सोबत काम सुरू केलेले त्यांचे समकालीन मित्र आज या ना त्या कारणाने संघापासून दूर आहेत.

आज सर्वबाबतीतली अनुकूलता अनुभवताना काम सुलभ वाटत पण प्रतिकूल परिस्थितीत निर्धाराने उभ राहायला जिगर लागते.
आपल्या जिवनात आलेल्या अनेक आव्हानात्मक विषयात ते तितक्याच ताकदीने उभे राहिले.मग ती अयोध्या कारसेवा असो , वा संघबंदी. या सर्वास नेटाने तोड देत त्यातून ते तावून सुलाखूनच निघाले.

ठाणे ,नवी मुंबई सारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रातही सायकलने प्रवास करत त्यांनी ही परिपाठी अखंड सुरू ठेवली. आपल्या कामातील गतिविधि आयाम या नव्याने सुरू झालेल्या विषयातील एक म्हणजे सागरी किनारपट्टी आणि सुरक्षा (सागरी सीमा मंच) सुरवातीला दैनदिन संघटनात्मक कामाची रुची असलेल्या शिक्षकांनी काहीस नाराज होत हे काम स्वीकारलं. काम कसले आव्हानच होत ते. संघ शताब्दी वर्षात पूर्णवेळ गृहस्थी प्रचारकाच्या भूमिकेत त्यांनी या कामास ठाणे विभाग,मुंबई महानगर आणि पुढे कोकण प्रांतात मुर्त स्वरूप दिले.

सागरी जलदुर्ग, सागरी परिक्रमा हे उपक्रमही सर्वसमावेशक करून एकसंग होत यशस्वी करून दाखविले.गृहस्थी कार्यकर्त्यास दुबार अडचणी असतात. हे यांनाही चुकले नाही पत्नीचे सततचे आजारपण आणि यांचा प्रवास याची जणू जुगलबंदीच असायची. घरचे इतर जेष्ठ लोक सतत दूषण द्यायचे. पण चंद्रकांतजी तेच भूषण म्हणून घेत वावरायचे. उरात राष्ट्रभक्ती आणि आणि मनात कार्याचा संकल्प यातूनच ते समृद्ध होत गेले. त्यांचा जनसंगृह ही दांडगा… किनारपट्टीवर अगदी बिनधास्त त्यांच्यातील एक होऊन समरस झालेला हा कार्यकर्ता.. एका आयुष्यात किती विधायक कार्य करू शकतो याचा आदर्श वस्तुपाठच.

ते कामात सदैव रममाण असले तरी घरच्या परिस्थितीत वहिनींची साथ त्यांनी कधी सोडली नाही.. यावर्षी ऐतिहासिक प्रयाग क्षेत्री सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आग्रहाने सपत्नीक भेट आणि संगमावरील स्नान हे शेवटच ठरलं. जन्मभर तिळ तिळ जळणारी शिक्षक नावाची समिधा आज शांत झाली. आपल्या धारणेनुसार संगमावरील हे स्नान जरी त्यांना मोक्षापर्यंत घेऊन गेले तरी ते झिडकारून हा अवलिया राहिलेले संघकाम पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेईल...

Back to top button