
आज विजया एकादशी पूजनीय गोळवलकर गुरुजींची जयंती…..विनम्र अभिवादन !!
१९०६ च्या विजया एकादशीला नागपूर येथे जन्म झालेल्या श्रीगुरुजींना ६७ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यापैकी ३३ वर्षे गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. डॉ. हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाला एक अभेद्य संघटनेचे रूप प्राप्त करून देतानाच संघाचे वैचारिक अधिष्ठान स्पष्टपणे समाजासमोर मांडण्याचे अलौकिक कार्य श्रीगुरुजींनी केले.
नागपूर ही संघाची जन्मभूमी. मात्र नागपूर येथे जन्म होऊन देखील श्रीगुरुजींचा संघाशी प्रथम संपर्क मात्र काशी विश्वविद्यालयात आला हे खूपच कमी जणांना माहिती आहे. हेच ते काशी विश्वविद्यालय ज्याची स्थापना महामना पंडित मदन मोहन मालवीय यांनी १९१६ ला वसंत पंचमीच्या दिवशी केली होती. काही दिवसांपूर्वी वाराणसीला गेलो असताना काशी विश्व विद्यालयात जाण्याचा योग आला. त्यावेळी मुद्दाम विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात आणि श्रीगुरुजी ज्या ब्रोचा छात्रालयात राहत होते ही दोन्ही स्थाने बघण्यात आली. याच ब्रोचा छात्रालयातील ३०९ क्रमांकाच्या खोलीत माधव सदाशिव गोळवलकर नावाचा विद्यार्थी ज्ञानार्जन करत होता. श्रीगुरुजींसारखे अलौकिक व्यक्तीत्व ज्या परिसरात घडले… वावरले तो परिसर पाहताना एका वेगळ्या अनुभूतीने मन थरारून आले.
नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून विशेष प्राविण्यासह इंटर सायन्सची पदवी प्राप्त केल्यानंतर १९२४ ला गुरुजींनी काशी विश्व विद्यालयात बी.एस्सी. साठी प्रवेश घेतला. कारण त्यांचा ओढा हा प्राणीशास्त्राकडे अधिक होता. त्याकाळी काशी विश्व विद्यालयाची ख्याती देशभरात पोहोचलेली होती. प्राणीशास्त्र विषयात एम. एस्सी. होईपर्यंत म्हणजे १९२८ पर्यंत गुरुजींचे या विद्यापीठात वास्तव्य होते. त्यावेळी काशी विश्व विद्यापीठ म्हणजे एका अर्थाने लघुभारत होता. देशाच्या जवळपास सर्व राज्यांमधून बुद्धिमान विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असत. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड असे ग्रंथालय होते. त्यामुळे गुरुजींचा बराचसा काळ याच ग्रंथालयात जात असे. याच कालावधीत गुरुजींनी अफाट वाचन केले. प्राचीन भारतीय संस्कृती, ज्ञान – विज्ञान परंपरा, विविध दर्शने, काव्य शास्त्र, वेद, पुराणे, रामकृष्ण – विवेकानंद जीवन चरित्र याचा सखोल अभ्यास गुरुजींनी याच विद्यापीठाच्या ग्रंथालयात केला.

एम. एस्सी. झाल्यानंतर मत्स्यशास्त्र या विषयात शोधकार्य करण्यासाठी गुरुजींना मद्रास येथे जावे लागले. मात्र आर्थिक कारणाने हे शोधकार्य अर्धवट सोडून त्यांना परत नागपूरला यावे लागले. याच दरम्यान काशी विश्व विद्यालयात त्यांच्याच प्राणीशास्त्र विभागात निदेशक म्हणून सेवा करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे आला. त्यांनी तो सहर्ष स्वीकारला. १९३१ ला ते काशी विश्वविद्यालयात रुजू झाले. पुढे प्रशासनाने त्यांना बी.ए.साठी इंग्रजी आणि राज्यशास्त्र शिकवण्याची संधी दिली. शिक्षक म्हणून ते काही काळातच इतके विद्यार्थीप्रिय झाले की त्यांना सर्वजण गुरुजी म्हणू लागले. एका अर्थाने याच विश्वविद्यालयात प्राध्यापक माधव सदाशिव गोळवलकर यांचे रूपांतर ‘श्रीगुरुजी’ मध्ये झाले असे म्हणता येईल.
१९३१ ला डॉ.हेडगेवार यांनी बाबाराव सावरकर यांच्या सूचनेवरून काशीला भेट दिली. जवळपास वीस दिवस त्यांनी संघ कामानिमित्त काशीमध्ये प्रवास केला. अनेक व्यक्तींना ते भेटले. काशी विश्वविद्यालयात देखील विद्यार्थी, प्राध्यापकांच्या अनेक बैठका त्यांनी घेतल्या. त्यांच्या भेटीचा प्रभाव म्हणून अनेक कार्यकर्ते संघाकडे आकृष्ट झाले. त्यातच श्रीगुरुजींचा देखील समावेश होता. विद्यार्थ्यांसोबत हॉकी, टेनिस खेळणे, गंगा स्नान करणे अशा कामांमधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विश्वविद्यालयातील संघ कामात श्रीगुरुजी हळूहळू लक्ष घालू लागले. असे असले तरी देखील डॉक्टर आणि गुरुजींची पहिली भेट मात्र नागपुरात झाली.
तसे गुरुजींच्या संघकार्यातील सहभागाची माहिती डॉक्टरांना मिळत होतीच, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. एकदा विद्यापीठाला सुट्टी लागताच श्रीगुरुजी नागपूरला आले असताना एक दिवस ते रस्त्याने चालले होते. योगायोगाने डॉक्टरांनी त्यांना पाहिले आणि त्यांना थांबवून आपले नाव माधवराव गोळवलकर काय? असा प्रश्न केला. अर्थात हा एका अर्थाने अंदाजानेच विचारलेला प्रश्न. मात्र या प्रश्नाला होकार मिळताच डॉक्टरांनी सवडीने माझ्या घरी अवश्य या अशी विनंती गुरुजींना केली. गुरुजी देखील डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना भेटले. हीच या दोघांमधील पहिली भेट.
संघाच्या कार्याचे यथार्थ दर्शन व्हावे यासाठी डॉक्टर दरवर्षी नागपूरच्या दसरा उत्सवासाठी विविध व्यक्तींना मुद्दाम आमंत्रित करत. १९३२ ला झालेल्या दसरा उत्सवात काशी शाखेतून श्री. सदगोपालजी आणि प्रा. माधवराव गोळवलकर यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांचाही ‘काशी शाखेतील उत्साही कार्यकर्ते’ असा परिचय करून देत डॉक्टरांनी दोघांचेही पुष्पहार घालून स्वागत देखील केले होते. या दोघांनाही नंतर उमरेड आणि भंडारा या दोन शाखा दाखविण्याची योजना बनविण्यात आली होती. एका अर्थाने डॉक्टरांनी नवा सरसंघचालक घडविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

मात्र १९३६ ला श्रीगुरुजी हे एकाएकी घरातून निघून सारगाच्छी येथे स्वामी अखंडानंदांच्या सेवेत गेल्याची वार्ता डॉक्टरांना कळाली. अर्थात श्रीगुरुजींचा अध्यात्माकडे असलेला ओढा लक्षात घेता डॉक्टरांना ही वार्ता अनपेक्षित नव्हती, मात्र एक कर्तृत्ववान, उच्चशिक्षित, बुद्धिमान कार्यकर्ता अशाप्रकारे निघून जातो याचे दुःख देखील त्यांना होते. मात्र सहा महिन्यांनी अखंडानंदांनी देह ठेवल्यानंतर श्रीगुरुजी परत नागपूरला आले.
हळूहळू पुन्हा एकदा डॉक्टरांशी आणि नागपूर मधील संघ कामाशी त्यांचा नियमितपणे संपर्क सुरू झाला. १९३७ ला लाहोरच्या संघ शिक्षा वर्गासाठी डॉक्टर श्रीगुरुजींना आपल्या सोबत घेऊन गेले होते. त्यावेळी पुन्हा एकदा काशी विश्वविद्यालयात तीन दिवस त्यांचे वास्तव्य होते. या वास्तव्यात अनेक ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये डॉक्टरांनी स्वतः भाषण न करता गुरुजींना बोलावयास लावले. त्यांच्यातील अध्ययनशीलता, विचारातील स्पष्टता,भारतीय परंपरा,संस्कृती बद्दलचे त्यांचे प्रगाढ ज्ञान, आत्मविश्वास पाहून त्यांना प्रसन्नता वाटली.
पुढच्या दोन-तीन वर्षात श्रीगुरुजी डॉक्टरांच्या एकूण समर्पित व्यक्तिमत्त्वामुळे एवढे प्रभावित झाले की डॉक्टरांची जवळपास सावली बनून ते वावरले. श्रीगुरुजींची निष्ठा, समर्पण भाव, त्यांची आध्यात्मिक उंची, हिंदू परंपरा – संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रगाढ श्रद्धा हे पाहून डॉक्टरांनी श्रीगुरुजींच्या रूपाने आपला उत्तराधिकारी जवळपास नक्की केला होता. दुर्दैवाने २१ जून १९४० हा दिवस मात्र लवकर उगवला, ज्या दिवशी संघाच्या रूपाने हिंदू संघटनेची एक मजबूत अशी मुहूर्तमेढ रोवून डॉक्टर हेडगेवार नावाचा एक सूर्य अवघ्या ५१व्या वर्षी संपूर्ण सनातन राष्ट्र प्रकाशमान करून अस्तंगत झाला.
डॉक्टरांच्या निधनानंतर पुढची तेहतीस वर्षे श्रीगुरुजींनी सरसंघचालक या नात्याने संघकार्याची नौका ज्या कुशलतेने पुढे नेली तो एक दैदिप्यमान असा इतिहास आहे. श्रीगुरुजींनी जेव्हा सरसंघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली तेंव्हा त्यांचे वय अवघे ३४ वर्षे होते. गांधी हत्त्येमध्ये खोट्या आरोपावरून संघाला संपविण्याचे जे प्रयत्न या देशात झाले, त्यातून संघाचे निर्दोषत्व सिद्ध करत तावून सुलाखून सुखरूपपणे बाहेर काढण्याचे कार्य श्रीगुरुजींसारखे अलौकिक व्यक्तिमत्व असल्यानेच शक्य झाले हे वास्तव आहे.
लेखक:- महेश काळे