
भारत, जो एकेकाळी जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार म्हणून ओळखला जात होता, तो गेल्या दहा वर्षांत संरक्षण उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात अभूतपूर्व बदल अनुभवत आहे. ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी उपक्रमामुळे आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांमुळे संरक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताचे संरक्षण उत्पादन २०१४-१५ च्या तुलनेत तब्बल १७४% वाढून १.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, तर संरक्षण निर्यात ३० पट वाढून २१,०८३ कोटी रुपयांवर गेली आहे.
भारत आज १०० हून अधिक देशांना लष्करी साहित्य निर्यात करत आहे. आयडेक्स, अदिती, श्रीजन (iDEX, ADITI, आणि SRIJAN) यांसारख्या उपक्रमांमुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळाली असून, संरक्षण क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. हा बदल केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, भारताच्या जागतिक सामरिक दृष्टिकोनातील परिवर्तनाचे द्योतक आहे.
देशाची वाढती आर्थिक शक्ती, जागतिक बाजारपेठेत संरक्षण उत्पादनांची वाढती मागणी आणि संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला चालना देण्यावर सरकारचे लक्ष यांसह अनेक कारणांमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ होत आहे. देशात तांत्रिक कौशल्याचा खजिना असलेला मजबूत संरक्षण उद्योग आहे. योग्य रणनीती आणि अंमलबजावणीसह, भारत संरक्षण उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार बनू शकतो, संरक्षण क्षेत्रातील ही आत्मनिर्भरता निश्चितच कौतुकास्पद आहे.

पीआयबीच्या अहवालानुसार, “मेक इन इंडिया” उपक्रमाच्या प्रभावामुळे भारत आता जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य देशांच्या श्रेणीत स्थान मिळवत आहे. यामुळे विदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी झाले असून, राष्ट्रीय सुरक्षाही अधिक बळकट झाली आहे. तसेच, या लष्करी धोरणामुळे अत्याधुनिक शस्त्र प्रणालींच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे.
आत्मनिर्भर, आत्मभिमानी भारत
- संरक्षण अर्थसंकल्पात वाढ: २०१३-१४ मध्ये ₹२.५३ लाख कोटींवरून २०२५-२६ मध्ये ₹६.८१ लाख कोटींपर्यंत वाढ.
- भविष्यातील लक्ष्य: भारताचे २०२९ पर्यंत उत्पादनात ३ लाख कोटी रुपये आणि निर्यातीत ५०,००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.
- ६५% संरक्षण उपकरणे आज देशांतर्गत उत्पादित केली जातात, विशेष म्हणजे १० वर्षांपूर्वी भारत ६५-७०% लष्करी सामग्री विदेशातून आयात करत होता. म्हणतात ना “वक्त बदलते देर नहीं लगती…”
- १६ संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (DPSU), ४३० हुन अधिक परवाना प्राप्त कंपन्या, आणि १६,००० सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) हे भारताच्या संरक्षण सिद्धतेचा पाया आहेत.
- खाजगी क्षेत्राच्या योगदानामुळे भारताच्या एकूण संरक्षण उत्पादनात २१% ने वाढ.

सर्वाधिक निर्यात होणारी संरक्षण उपकरणे..
- बुलेटप्रूफ जॅकेट, डॉर्नियर (Do-228) विमाने, चेतक हेलिकॉप्टर
- जलद इंटरसेप्टर बोटी, हलके टॉर्पेडो मिसाइल
- रशियन सैन्य आजमितीला जे बूट वापरते ते बिहारमध्ये बनवलेले आहेत.
- भारताच्या आत्मनिर्भरतेच्या वचनबद्धतेमुळे संरक्षण निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे, मागील केवळ दशकभरात ३० पटीने वाढ झाली आहे.
भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, सैन्य सामग्री आयात करणारा देश अशी ओळख पुसून काढत सैन्य सामग्री उत्पादक देश व निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण होतेय. तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप, इनोव्हेशन या गोष्टींच्या बळावर भारत आत्मनिर्भर होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रगती करत आहे.
राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपविता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशात संशोधन व विकास याला चालना मिळत असून, लष्करात देखील त्यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशील लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदी क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे.

सैन्यातील प्रशासकीय बदल, नवीन शस्त्रास्त्रांची क्षेपणास्त्रांची आयात, सैन्यात महिलांना निर्माण झालेली समान संधी, ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करत असलेले सुरक्षा धोरण, दरवर्षी वाढत असलेली सुरक्षा उपकरणांची निर्यात त्याचबरोबर आंतरिक सुरक्षेबाबत सुसज्जता यांसारख्या अनेक प्रगत हालचालीमुळे भारताच्या संरक्षण धोरणाची दखल आज जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
उरी-पुलवामासारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि चीनच्या गलवान खोरे किंवा अरुणाचल प्रदेश येथील घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने त्यांना समजेल अशा भाषेतच उत्तर दिले आहे आणि देत राहणार हे निश्चित.
सुदानच्या यादवीत तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने मध्यरात्री सुदानची राजदानी खार्टुम जवळ ४० किलोमिटर अंतरावरील एका ओबडधोबड धावपट्टीवर रात्रीच्या मिट्ट काळोखात हवाईदलाने विमान उतरवून भारतीय नागरिकांची सुटका केली होती . त्या घटनेची आठवण यावी असा हा भीम पराक्रम आहे.विशेष म्हणजे या धावपट्टीपर्यंतचा रस्ता २००५ साली भारतानेच बनवला होता.
भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक प्रगतीचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी प्रबळ सैन्यव्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर नव्याने उदयास येत असलेल्या बहुध्रुवीय सत्तेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याच गतीने जर आपला सैन्यविकास सुरू राहिला तर, स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तिशाली सेना म्हणून आणि हे भारतराष्ट्र “विश्वगुरू” म्हणून नक्कीच उदयास येईल यात तीळमात्र शंका नाही..
राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मोदी सरकारने आधीच्या काँग्रेस सरकारचे भिकार, दळभद्री, कचखाऊ धोरण मोडीत काढून केवळ सीमाभाग सुसज्ज केला नाही तर संरक्षण क्षेत्र निर्यात प्रधान,आत्मनिर्भर करण्याचा चंगही बांधला आहे. देशात पैसे नसल्यामुळे राफेल आणू शकत नाही, असे सांगणारा ए.के.एण्टनी नावाचा संरक्षण मंत्रीही या देशाने पाहिला आहे.. लष्कराला पायाभूत सुविधांपासून शस्त्रांपर्यंत काहीही कमी पडू देत नाही असा प्रधानसेवकही देश पाहतो आहे.
“War is not only a matter of equipment, artillery, group troops or air force; it is largely a matter of spirit, or morale.”