भगवद्गीतेच्या श्लोकाने डॉक्टरकीचा धर्म पाळण्यास प्रेरित झालेले समाजसेवी डॉक्टर
२० रुपयांत उपचार, १५ हजार जणांना मोफत कोरोना लस
स्वधर्म अर्थात आपला धर्म सोडून इतर दुसरा धर्म स्वीकारू नये, असे आपल्या भगवद्गीतेत म्हटले आहे. त्याच अनुषंगाने वर्षानुवर्षे मेहनत करून मिळालेला डॉक्टरी पेशा न सोडता रुग्णांची सेवा करावी, या उद्देशाने आपले डॉक्टरी जीवन आयुष्यभर गरीब रुग्णांवर केवळ २० रुपयांत उपचार करणारे कर्नाटकमधील कलबुर्गी येथील डॉ. मल्हार मल्ले यांच्या जीवनाची कीर्ती उंचावत गेली आहे. केवळ इतकेच नाही तर त्यांनी आतापर्यंत १५ हजार जणांना मोफत कोरोना लस मोफत दिली आहे.
अशी झाली सुरुवात
डॉ. मल्हार सांगतात, १९७४ साली एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर ते बरीच वर्षे प्रॅक्टिस करत होते. त्या दरम्यान आपण आपले प्रोफेशन बदलून वकिलीचे शिक्षण घ्यावे, असा विचार मनात आल्याने त्यांनी त्यानुसार अभ्यास करून वकिलीची पदवी घेतली आणि तशी प्रॅक्टिसही सुरु केली. पेशाने वकील असलेल्या त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाचे असे प्रोफेशन बदलणे अयोग्य वाटले. म्हणून त्यांनी डॉ. मल्हार यांना भगवद गीतामधील धर्माला अनुसरून असलेल्या एका श्लोकाचे उदाहरण दिले आणि त्यांना पटवून दिले की डॉक्टरी पेशा सोडून वकिली करू नये. वर्षानुवर्षे हाती घेतलेले कार्य सोडून दुसरे कार्य हातात घेणे, हे योग्य नाही, ते आपल्या धर्मात बसत नाही. एका डॉक्टराचे समाजाप्रती खूप मोठे दायित्व असते, असेही ते सांगत. वडिलांच्या सांगण्यावरून भारावलेले डॉ. मल्हार पुन्हा डॉक्टरी पेशाकडे तर वळलेच पण पुढे त्यांच्या जीवनाची दिशाही बदलत गेली. आजाराने ग्रासलेला, दुःखी, कष्टी गरीब रुग्ण हा आधीच पैशाने खंगलेला असतो त्यात एखाद्या आजाराने त्याला ग्रासले तर तो त्याच्या जीवालाही वैतागलेला असतो. अशा परिस्थितीत अशा लोकांना समजून घेणारा, त्यांच्यासाठी पैशांना कमी महत्व देऊन त्यांना त्याच्या आजारातून मुक्त करणारा डॉक्टर हवा असतो. आपल्याला तसे व्हायचे आहे, हा निश्चय मनाशी घट्ट करून डॉ. मल्हार यांनी अत्यंत कमी पैशांत त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला केवळ ३ रुपयांत उपचार
डॉ. मल्हार सांगतात कि सुरुवातीला ते केवळ रुग्णांकडून फक्त ३ रुपये शुल्क घ्यायचे. मात्र त्यानंतर महागाईचा फटका बसत असल्याने १९९५ सालापासून त्यांनी आपले शुल्क वाढवून त्यांनी रुग्णांकडून १० रुपये घेण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०२० पर्यंत ते रुग्णांकडून १० रुपये शुल्क घेत होते. आता त्यात वाढ करून ते सध्या २० रुपये घेत आहेत.
डॉ. मल्हार यांनी रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेसोबत जनसेवादेखील केली आहे. डॉ. मल्हार महाविद्यालयाती विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे धडे देतात. आतापर्यंत चार लाख विद्यार्थ्यांना त्यांनी हे धडे दिले आहेत. अपंगांना वेगवेगळ्या स्वरूपातील मदतही ते करीत असतात. त्यांचे छंदही जोपासत असतात. यांना त्यांच्या कामासाठी अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. उत्कृष्ट सेवेकरिता त्यांना इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी १४२ रक्तदान शिबीर आणि ६२ आरोग्य शिबीर आयोजित केले आहेत. त्यांनी स्वतः ५४ वेळा रक्तदान केले आहे.
डॉ. मल्हार यांचे वय ७५ वर्षे आहे. तरीही ते अर्धवेळ आपल्या रुग्णांवर उपचार करीत आहेत. सध्याच्या या महामारीच्या काळात डॉक्टरांची कंसल्टेशन फी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचली असताना डॉ. मल्हार यांचे नाममात्र पैसे घेऊन लोकांवर उपचार करीत आहेत. इतकेच नाही तर ते कोरोना लसही मोफत स्वरूपात देत आहेत. आतापर्यंत १५ हजार जणांना त्यांनी मोफत लस दिली आहे.
कोरोनाच्या या संकटात सगळेच त्रस्त आहेत पण गरीब जनतेला अधिक सामोरे जावे लागत आहे. या लॉकडाउन मध्ये महागाईच्या नावाखाली अनेक जण लुबाडत आहेत. या संधीचा फायदा घेत आहेत. पण दुसरीकडे असेही लोक आहेत. जे केवळ समाजासाठी , आपल्या देशबांधवांसाठी काम करीत आहेत. त्यातीलच एक म्हणजे डॉ. मल्हार मल्ले. त्यांच्यासारख्या डॉक्टरांची दुःखी, गरीब समाजाला नितातं आवश्यकता आहे. आपल्या समाजाच्या सेवेसाठी अतोनात मेहनत करणाऱ्या डॉ. मल्हार यांचे आयुष्य प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
**