पाकिस्तानमधील १२०० वर्षे जुन्या प्राचीन हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार
पाकिस्तानच्या लाहोरमधील १२०० वर्ष जुन्या मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईच्या यशानंतर या मंदिरात अवैधरित्या राहत असलेल्या रहिवाशांना हुसकावून लावण्यात आले आहे. पाकमधील अल्पसंख्याक समाजाच्या प्रार्थनास्थळांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘द इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ (ETPB) या संस्थेने गेल्या महिन्यात या प्राचीन वाल्मिकी मंदिराचा ताबा मिळवला. लाहोरच्या प्रसिद्ध अनारकली बाजाराच्या परिसरात हे मंदिर आहे. लाहोरमध्ये कृष्ण मंदिराव्यतिरिक्त केवळ हे एकच मंदिर भाविकांसाठी सुरू आहे.
गेल्या दोन दशकांपासून हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करणारे ख्रिश्चन कुटुंब केवळ वाल्मिकी समुदायातील नागरिकांनाच मंदिरात प्रवेश देत होते. न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू, शिखांसह ख्रिश्चन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते. हिंदू धर्मियांकडून यावेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने धार्मिक विधी करण्यात आला. मंदिरात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच लंगर आयोजित करण्यात आला होता.
ईटीपीबीच्या सूत्रांनुसार मंदिराची जागा या बोर्डाच्या महसूल खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. या मंदिराच्या जागेवर मालकी हक्क असल्याचे सांगत ख्रिश्चन कुटुंबाने २०१० साली दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. १२ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराच्या जागेबाबत खोटे दावे केल्याबाबत या ख्रिश्चन कुटुंबाला न्यायालयाकडून फटकारण्यात आले.
१९९२ साली अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर लाहोरमधील या मंदिराची संतप्त जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेने मंदिर तर मोडकळीस आलेच मात्र लगतची दुकानेदेखील आगीत उद्ध्वस्त झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला अनेक दिवस लागले होते. यावेळी मूर्तींच्या विडंबनेसह मंदिरातील सोन्याचा जमावाने ताबा घेतला होता.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीने या मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. मात्र, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने मंदिर उभारणीच्या कामामध्ये अडथळा येत होता. मात्र, आता न्यायालयीन लढ्याला यश आल्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे.